स्तोत्रसंहिता
धडा 31
1 परमेश्वरा, मी तुझ्यावर अवलंबून आहे, माझी निराशा करु नकोस मला वाचव व माझ्यावर दया कर.
2 देवा, माझे ऐक त्वरीत येऊन मला वाचव माझा खडक हो. माझे सुरक्षित स्थळ हो. माझा किल्ला हो. माझे रक्षण कर.
3 देवा, तू माझा खडक आहेस तेव्हा तुझ्या नावाखातर पुढे हो व मला मार्गदर्शन कर.
4 माझ्या शत्रूंनी माझ्यासमोर सापळा रचला आहे. त्यांच्या सापळ्यापासून मला वाचव तूच माझी सुरक्षित जागा आहेस.
5 परमेश्वरा आम्ही विश्वास ठेवू शकू असा देव तूच आहेस. मी माझे आयुष्य तुझ्या हाती सोपवले. मला तार!
6 जे लोक खोट्या देवाची पूजा करतात त्यांचा मी तिरस्कार करतो. मी केवळ परमेश्वरावर विश्वास ठेवतो.
7 देवा, तुझा दयाळूपणा मला आनंदी बनवतो तू माझे कष्ट पाहिले आहेस. तुला माझ्या संकटाची जाणीव आहे.
8 तू माझ्या शत्रूंना मला घेऊन जाऊ देणार नाहीस तू मला त्यांच्या सापळ्यातून मुक्त करशील.
9 परमेश्वरा, माझ्यावर खूप संकटे आली आहेत. म्हणून माझ्यावर दया कर. मी इतका दुखी कष्टी झालो आहे की माझे डोळे क्षीण झाले आहे माझ्या पोटासह माझे आंतले अवयव दुखत आहेत.
10 माझ्या आयुष्याचा दु:खात शेवट होणार आहे माझी वर्षे सुस्कार टाकण्यात निघून जाणार आहेत. माझी संकटे माझी शक्ती पिऊन टाकत आहेत. माझी शक्ती मला सोडून जात आहे.
11 माझे शत्रू माझा तिरस्कार करतात आणि माझे सगळे शेजारी सुध्दा माझा तिरस्कार करतात माझे सगळे नातेवाईक मला रस्त्यात बघतात तेव्हा ते मला घाबरतात आणि मला चुकवतात.
12 मी हरवलेल्या हत्यारासारखा आहे लोक मला पूर्णपणे विसरुन गेले आहेत.
13 लोक माझ्याबद्दल जे भयंकर बोलतात ते मी ऐकतो. ते लोक माझ्याविरुध्द गेले आहेत ते मला मारण्याची योजना आखत आहेत.
14 परमेश्वरा माझा तुझ्यावर विश्वास आहे. तूच माझा देव आहेस.
15 माझे जीवन तुझ्या हाती आहे. मला माझ्या शत्रूंपासून वाचव. काही लोक माझा पाठलाग करीत आहेत त्यांच्यापासून माझे रक्षण कर.
16 कृपा करुन तुझ्या सेवकाचे स्वागत कर आणि त्याचा स्वीकार कर. माझ्यावर दया कर आणि माझे रक्षण कर.
17 परमेश्वरा, मी तुझी प्रार्थना केली कारण मला निराश व्हायचे नव्हते. वाईट लोक निराश होतील. ते मुकाटपणे थडग्यात जातील.
18 ते वाईट लोक गर्व करतात. आणि चांगल्या माणसांविषयी खोटे सांगतात. ते वाईट लोक अतिशय गर्विष्ठ आहेत परंतु खोटं बोलणारे त्यांचे ओठ लवकरच गप्प होतील.
19 देवा, तू तूझ्या भक्तांसाठी खूप अद्भुत गोष्टी लपवून ठेवल्या आहेस. तुझ्यावर जे विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी तू सर्वांसमोर चांगल्या गोष्टी करतोस.
20 वाईट लोक चांगल्या माणसांना त्रास देण्यासाठी एकत्र येतात. ते दुष्ट लोक भांडणे सुरु करण्याचा प्रयत्न करतात. परंतु तू चांगल्या लोकांना लपवतोस आणि त्यांचे रक्षण करतोस. तू त्यांचे तुझ्या निवाऱ्यात रक्षण करतोस.
21 परमेश्वर धन्य आहे! त्याने त्याचे माझ्यावरील खरे प्रेम, शहर शत्रूंनी वेढलेले असताना अत्यंत आश्चर्यकारक रीतीने व्यक्त केले.
22 मी घाबरलो आणि म्हणालो, “देव मला पाहू शकणार नाही अशा जागेत मी आहे.” परंतु देवा, मी तुझी प्रार्थना केली आणि तू माझी मदतीसाठी मोठ्याने केलेली प्रार्थना ऐकलीस.
23 देवाच्या भक्तांनो, तुम्ही परमेश्वरावर प्रेम करा. परमेश्वर त्याच्यावर विश्वास टाकणाऱ्या लोकांचे रक्षण करतो. परंतु जे लोक स्वतच्या सामर्थ्याचा गर्व करतात त्यांना तो शिक्षा करतो. परमेश्वर त्यांना योग्य अशीच शिक्षा देतो.
24 परमेश्वराच्या मदतीची वाट बघत असणाऱ्या लोकांनो बलवान व धैर्यवान व्हा.