स्तोत्रसंहिता
धडा 25
1 परमेश्वरा, मी स्वतला तुझ्याकडे सुपूर्द करतो.
2 देवा, माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि माझी निराशा होणार नाही. माझे शत्रू मला हसणार नाहीत.
3 एखाद्याने तुझ्यावर विश्वास टाकला तर त्याची निराशा होणार नाही परंतु दगाबाज मात्र निराश होतील. त्यांना काहीही मिळणार नाही.
4 परमेश्वरा तुझे मार्ग आत्मसात करण्यासाठी मला मदत कर. मला तुझे मार्ग शिकव.
5 मला मार्ग दाखव आणि मला तुझे सत्य शिकव तू माझा देव आहेस, माझा तारणारा आहेस मी रोज तुझ्यावर विश्वास टाकतो.
6 परमेश्वरा, माझ्याशी दयाळू राहायचे लक्षात असू दे तुझ्याजवळचे नेहमीचे कोवळे प्रेम मला दाखव.
7 माझे पाप आणि तरुणपणी मी ज्या वाईट गोष्टीकेल्या त्या लक्षात ठेवू नकोस परमेश्वरा, तुझ्या चांगल्या कीर्तीसाठी माझी प्रेमाने आठण ठेव.
8 परमेश्वर खरोखरच चांगला आहे. तो पापी माणसांना जगण्यासाठी योग्यमार्ग दाखवतो.
9 तो दीन माणसांना त्यांचे मार्ग दाखवतो तो त्यांचे न्यायीपणाने नेतृत्व करतो.
10 जे लोक परमेश्वराचे करार आणि वचने पाळतात त्यांच्याशी तो सच्चा आणि दयाळू असतो.
11 परमेश्वरा, मी अनेक चुकीच्या गोष्टी केल्या. परंतु तुझा चांगुलपणा दाखवण्यासाठी तू मला त्याबद्दल क्षमा केलीस.
12 जर एखाद्याने परमेश्वराच्या मार्गाने जायचे ठरवले तर देव त्याला उत्तम रीतीने कसे जगायचे ते दाखवील.
13 तो माणूस चांगल्या गोष्टींचे सुख उपभोगील आणि त्याची मुले देवाने त्याला जी जमीन द्यायचे वचन दिले होते त्या जमिनीचे मालक बनतील.
14 परमेश्वर त्याचे रहस्य त्याच्या भक्तांना सांगतो. तो त्याच्या भक्तांना त्याचे करार शिकवतो.
15 मी नेहमी परमेश्वराकडे मदतीसाठी दृष्टी वळवतो. तो नेहमी माझी संकटातून मुक्तता करतो.
16 परमेश्वरा, मी दु:खा एकाकी आहे. माझ्याकडे वळ व मला दया दाखव.
17 माझी माझ्या संकटांतून मुक्तता कर. माझ्या समस्या सोडवण्यासाठी मला मदत कर.
18 परमेश्वरा, माझ्या यातांनकडे व संकटांकडे पाहा. मला माझ्या सर्व पापांबद्दल क्षमा कर.
19 माझ्या सर्व शत्रूंकडे नजर टाक. ते माझा तिरस्कार करतात व मला दुख देतात.
20 देवा, माझे रक्षण कर आणि मला वाचव. माझा तुझ्यावर विश्वास आहे, तेव्हा माझी निराशा करु नकोस.
21 देवा तू खरोखरच चांगला आहेस. माझा तुझ्यावर विश्वास आहे म्हणून तू माझे रक्षण कर.
22 देवा, इस्राएलाच्या लोकांचे त्यांच्या सर्व शत्रूंपासून रक्षण कर.