स्तोत्रसंहिता
धडा 18
1 तो म्हणाला, “परमेश्वरा, तू माझे सामर्थ्य आहेस मी तुझ्यावर प्रेम करतो.”
2 परमेश्वर माझा खडक माझा किल्ला माझी संरक्षक जागा आहे. माझा देव माझा खडक आहे. मी माझ्या रक्षणासाठी त्याच्याकडे धाव घेतो. देव माझी ढाल आहे. त्याची शक्ती नेहमी माझे रक्षण करते.परमेश्वर माझी उंच डोंगरावरची लपण्याची जागा आहे.
3 त्यांनी माझी चेष्टा केली. परंतु मी ज्याची स्तुती केली जावी अशा परमेश्वराचा धावा केला आणि शत्रूंपासून माझे रक्षण झाले.
4 माझे शत्रू मला मारण्याचा प्रयत्न करीत होते. मृत्यूच्या दोऱ्या माझ्या भोवती होत्या मृत्युलोकात नेणाऱ्या पुरात मी सापडलो होतो.
5 थडग्याच्या दोऱ्या माझ्या भोवती होत्या. मृत्यूचा सापळा माझ्या पुढ्यात होता.
6 सापळ्यात अडकल्यावर मी परमेश्वराचा धावा केला. होय, मी देवाला माझ्या मदतीसाठी बोलावले. देव त्याच्या मंदिरात होता. त्याने माझा आवाज ऐकला. त्याने माझी मदतीची हाक ऐकली.
7 पृथ्वी हादरली आणि कंपित झाली. स्वर्गाचा पाया हादरला. का? कारण परमेश्वर क्रोधित झाला होता.
8 देवाच्या नाकातून धूर आला देवाच्या तोंडातून अग्रीच्या ज्वाळा निघाल्या. त्याच्या अंगातून ठिणग्या उडाल्या.
9 परमेश्वराने आकाश फाडले आणि तो खाली आला तो घट् काळ्या ढगावर उभा राहिला.
10 परमेश्वर उडत होता तो उडणाऱ्या करुबावर आरुढ होऊन वाऱ्यावर उंच उडत होता.
11 परमेश्वर त्याच्या सभोवती तंबूसारख्या पसरलेल्या काळ्या ढगात लपला होता. तो गडगडणाऱ्या दाट ढगात लपला होता.
12 नंतर देवाचे चमचमते तेज ढगातून बाहेर पडले. तेथे गारा पडल्या आणि विजांचा चमचमाट झाला.
13 परमेश्वराने ढगामधून गडगडाट केला, त्या सर्वशक्तिमान देवाने आपला आवाज ऐकवला तेथे गारा पडल्या आणि विजांचा कडकडाट झाला.
14 परमेश्वराने त्याचे बाण सोडले आणि शत्रूची दाणादाण उडाली परमेश्वराने विजेचे लोळ फेकून लोकांची त्रेधा उडवली.
15 परमेश्वरा, तू धमकावून बोललास आणि सोसाट्याचा वारा तुझ्या मुखातून बाहेर पडला पाणी हटवले गेले आणि आम्हाला समुद्राचा तळ दिसू शकला. आम्हाला पृथ्वीचा पाया बघता आला.
16 परमेश्वर वरुन खाली आला आणि त्याने माझे रक्षण केले. परमेश्वराने मला धरले आणि खोल पाण्यातून (संकटांतून) बाहेर काढले.
17 माझे शत्रू माझ्यापेक्षा शक्तिमान होते. ते लोक माझा तिरस्कार करीत होते माझे शत्रू मला खूप भारी होते म्हणून देवाने माझे रक्षण केले.
18 मी संकटात असताना शत्रूंनी हल्ला केला. परंतु माझ्या मदतीसाठी परमेश्वर तेथे होता.
19 परमेश्वर माझ्यावर प्रेम करतो. म्हणून त्याने माझी सुटका केली. तो मला सुरक्षित जागी घेऊन गेला.
20 मी निरपराध असल्यामुळे परमेश्वर मला माझे बक्षीस देईल मी काही चूक केली नाही म्हणून तो माझ्यासाठी चांगल्या गोष्टी करेल.
21 का? कारण मी परमेश्वराची आज्ञा पाळली मी माझ्या देवाविरुध्द पाप केले नाही.
22 परमेश्वराच्या सर्व निर्णयांची मी नेहमी आठवण ठेवतो. मी त्याचे नियम पाळतो.
23 मी त्याच्या समोर स्वत ला शुध्द आणि निरपराध राखले. मी वाईट गोष्टींपासून स्वतला राखले.
24 म्हणून परमेश्वर मला माझे फळ देईल. का? कारण मी निरपराध आहे. देव पाहातो की मी काहीच चूक करीत नाही म्हणून तो माझ्यासाठी चांगल्या गोष्टी करील.
25 परमेश्वरा, जर एखादा माणूस तुझ्यावर खरोखरच प्रेम करत असेल तर तू त्याला तुझे खरे प्रेम दाखवशील. जर एखादा माणूस तुझ्याशी खरा वागला तर तू देखील त्याच्याशी खरा वागशील.
26 परमेश्वर, जे लोक चांगले आणि शुध्द असतात त्यांच्याशी तू चांगला आणि शुध्द असतोस परंतु अगदी नीच आणि कुटिल असणान्यांना तू नामोहरण करतोस.
27 परमेश्वरा, तू दीनांना मदत करतोस पण तू गर्विष्ठांना खाली पाहायला लावतोस.
28 परमेश्वरा, तू माझा दिवा लावतोस देव माझ्या भोवतालचा अंधार उजळतो.
29 परमेश्वरा, तुझ्या मदतीने मी सैनिकांबरोबर पळू शकतो. देवाच्या मदतीने मी शत्रूच्या भिंतीवर चढू शकतो.
30 देवाची शक्ती परिपूर्ण आहे. परमेश्वराच्या शब्दांची परीक्षा घेतली गेली आहे. जे त्याच्यावर विश्वास टाकतात त्यांचे तो रक्षण करतो.
31 परमेश्वराखेरीज इतर कुठलाही देव नाही. आपल्या देवाखेरीज इतर खडक इथे नाहीत.
32 देव मला शक्ति देतो शुध्द जीवन जगण्यासाठी तो मला मदत करतो.
33 देव मला हरणासारखे जोरात पळण्यासाठी मदत करतो. तो मला उंचावर स्थिर ठेवतो.
34 देव मला युध्दाचे शिक्षण देतो. त्यामुळे माझे हात शक्तिशाली बाण सोडू शकतात.
35 देवा, तू माझे रक्षण केलेस आणि मला जिंकायला मदत केलीस तू मला तुझ्या उजव्या हाताने आधार दिलास माझ्या शत्रूचा पराभव करण्यासाठी तू मला मदत केलीस.
36 माझ्या पायांना आणि घोट्यांना तू शक्ती दिलीस. त्यामुळे मी न पडता चालू शकलो.
37 नंतर मी माझ्या शत्रूंचा पाठलाग करु शकतो आणि त्यांना पकडू शकतो त्यांचा नायनाट झाल्याशिवाय मी परत येणार नाही.
38 मी माझ्या शत्रूंचा पराभव करीन. ते पुन्हा उभे राहू शकणार नाहीत. माझे सगळे शत्रू माझ्या पायाखाली असतील.
39 देवा, तू मला युध्दात शक्तिमात बनवलेस तू माझ्या शत्रूंना माझ्यासमोर पडायला लावलेस.
40 तू मला माझ्या शत्रूची मान धरायची संधी दिलीस आणि मी माझ्या शत्रूचा संहार केला.
41 माझ्या शत्रूंनी मदतीसाठी हाका मारल्या परंतु तेथे त्यांचे रक्षण करायला कोणीच नव्हते. त्यांनी परमेश्वराला सुध्दा बोलावले पण त्याने उत्तर दिले नाही.
42 मी माझ्या शत्रूचे मारुन तुकडे केले. त्यांची अवस्था वाऱ्यावर उडणाऱ्या धुळीप्रमाणे झाली मी त्यांचे लहान लहान तुकडे केले.
43 माझ्याशी लढणाऱ्या लोकांपासून मला वाचव मला त्या राष्ट्रांचा प्रमुख कर जे लोक मला माहीत देखील नाहीत ते लोक माझी सेवा करतील.
44 ते लोक माझ्या विषयी ऐकतील आणि लगेच माझ्या आज्ञांचे पालन करतील. ते परदेशी मला घाबरतील.
45 ते परदेशी गलितगात्र होतील. ते त्यांच्या लपण्याच्या जागेतून भीतीने थरथर कापत बाहेर येतील.
46 परमेश्वर जिवंत आहे, मी माझ्या खडकाची स्तुती करतो देव मला वाचवतो तो महान आहे.
47 देवाने माझ्यासाठी माझ्या शत्रूंना शिक्षा केली, त्याने त्या राष्ट्रांना माझ्या सत्ते खाली आणले.
48 परमेश्वरा, तू माझी माझ्या शत्रूंपासून सुटका केलीस जे लोक माझ्याविरुध्द उभे राहिले त्यांचा पराभव करण्यासाठी तू मला मदत केलीस. तू मला क्रूर माणसांपासून वाचवलेस.
49 परमेश्वरा, म्हणून मी तुझी स्तुती करतो म्हणून मी तुझ्या नावाचे देशांत गुणगान गातो.
50 परमेश्वर त्याच्या राजाला अनेक युध्द जिंकायला मदत करतो तो त्याने निवडलेल्या राजाला आपले खरे प्रेम देतो. तो दावीदाशी आणि त्याच्या वंशजांशी कायमचा प्रामाणिक राहील.