स्तोत्रसंहिता
धडा 101
1 मी प्रेम आणि न्याय याबद्दल गाईन, परमेश्वरा, मी तुला गाण्यातून आळवीन.
2 मी अगदी कसोशीने पवित्र शुध्द आयुष्य जगेन. परमेश्वरा, तू माझ्याकडे कधी येशील?
3 मी माझ्यासमोर कुठलीही मूर्ती ठेवणार नाही. जे लोक असे तुझ्याविरुध्द जातात त्यांचा मला तिरस्कार वाटतो. मी तसे करणार नाही.
4 मी प्रामाणिक राहीन. मी वाईट कृत्ये करणार नाही.
5 जर एखादा माणूस त्याच्या शेजाऱ्याबद्दल गुप्तपणेवाईट गोष्टी बोलत असेल तर मी त्या माणसाला थांबवेन. मी लोकांना गर्विष्ठ होऊ देणार नाही आणि ते इतरांपेक्षा चांगले आहेत असे त्यांना वाटू देणार नाही.
6 ज्यांच्यावर विश्वास टाकता येईल अशा माणसांना मी देशभर शोधेन आणि केवळ त्याच लोकांना मी माझी सेवा करु देईन. जे लोक शुध्द आयुष्य जगतात तेच माझे सेवक होऊ शकतील.
7 मी खोटे बोलणाऱ्यांना माझ्या घरात थारा देणार नाही. मी खोटारड्यांना माझ्याजवळ फिरकू देणार नाही.
8 मी या देशात राहाणाऱ्या वाईट लोकांचा नेहमी नाश करेन. दुष्ट लोकांनी परमेश्वराचे शहर सोडून जावे यासाठी मी त्यांच्यावर जबरदस्ती करेन.