यहेज्केल
धडा 9
1 मग देव नगरीला शिक्षा करणाऱ्या लोकांच्या नेत्यांशी मोठ्याने बोलला. प्रत्येक नेत्याच्या हातात स्वत:ची विध्वंसक शस्त्रे होती.
2 नंतर मी वरच्या प्रवेशद्वाराकडून सहा माणसांना येताना पाहिले. हे प्रवेशद्वार उत्तरेला होते. प्रत्येकाच्या हातात प्राणघातक शस्त्रे होती. एकाने तागाचे कपडे घातले होते. त्याच्या कमरेला लेखणी आणि दौत होती. ते लोक मंदिरातील काशाच्या वेदीपाशी जाऊन उभे राहिले.
3 करुब दूतांवर असणारी देवाची प्रभा फाकली आणि मंदिराच्या दारापर्यंत गेली. उंबरठ्यावर ती थांबली. मग तिने तागाचे कपडे घातलेल्या व लेखणी व दौत जवळ असलेल्या माणसाला हाक मारली.
4 मग परमेश्वर (म्हणजेच प्रभा) त्याला म्हणाला, “यरुशलेम नगरीत फीर आणि लोक करीत असलेल्या दुष्कृत्यांबद्दल दु:खी आणि अस्वस्थ असलेल्या प्रत्येकाच्या कपाळावर खूण कर.”
5 मग देव इतरांशी बोलताना मी ऐकले, “तुम्ही त्या माणसाच्या मागे जावे. ज्यांच्या कपाळावर खूण नाही त्यांना तुम्ही ठार केलेच पाहिजे. मग ते वडीलधारी (नेते) असोत वा तरुण तरुणी असोत किंवा मुले व त्यांच्या आया असोत. कपाळावर खूण नसलेल्या प्रत्येकाला तुम्ही मारलेच पाहिजे. अजिबात दया दाखवू नका. कोणाचीही कीव करु नका. माझ्या मंदिरापासूनच सुरवात करा.” मग त्यांनी मंदिरा समोर असलेल्या वडील धाऱ्यांपासूनच (नेत्यांपासूनच) सुरवात केली.
6
7 देव त्यांना म्हणाला, “ही जागा अस्वच्छ करा. हे अंगण प्रेतांनी भरा! आता जा.” म्हणून मग ते नगरीत गेले आणि त्यांनी लोकांना ठार केले.
8 ती माणसे लोकांना मारायला गेली असताना, मी तेथेच थांबलो. मी वाकून नमस्कार केला आणि आक्रोश करुन म्हणालो, “परमेश्वरा, माझ्या प्रभू, यरुशलेमवरचा तुझा राग दाखविण्यासाठी इस्राएलात शेष राहिलेल्या प्रत्येकाला तू ठार मारणार आहेस का?”
9 देव म्हणाला, “इस्राएल आणि यहुदाच्या लोकांनी अनंत पापे केली आहेत, ह्या देशात सगळीकडे खून होत आहेत. ही नगरी अपरांधानी भरुन गेली आहे. का? कारण लोक मनाशीच म्हणतात, ‘देवाने ह्या देशाचा त्याग केला. आम्ही काय करीत आहोत, हे त्याला दिसू शकत नाही.’
10 मी अजिबात दया दाखविणार नाही. त्या लोकांबद्दल मला वाईट वाटणार नाही. त्यांनी स्वत:वरच संकट ओढवून घेतले आहे. मी फक्त त्यांना योग्य अशी शिक्षा देत आहे.
11 मग तागाचे कपडे घातलेला व लेखणी आणि दौत जवळ असणारा माणूस म्हणाला, “तुझ्या आज्ञेचे मी पालन केले.”