यहेज्केल
धडा 14
1 इस्राएलमधील काही वडीलधारी माणसे (नेते) माझ्याकडे आले. माझ्याशी बोलण्यासाठी ते बसले.
2 मला परमेश्वराचा संदेश आला. तो म्हणाला,
3 “मानवपुत्रा, हे लोक तुझ्याशी बोलायला आले आहेत. मला तू त्यांचा हिताच्या गोष्टी विचाराव्यास अशी त्यांची इच्छा आहे. पण अजूनही त्यांच्याजवळ त्या अमंगळ मूर्ती आहेत. त्यांना पाप करायला लावणाऱ्या ह्या गोष्टी त्यांनी जवळ बाळगल्या आहेत. ते अजूनही त्यांची पूजा करतात. मग ते सल्ला विचारण्यासाठी माझ्याकडे कशाला येतात? मी त्यांच्या प्रश्र्नंना उत्तर द्यावे का? नाही!
4 पण उत्तर मी त्यांना देईन. मी त्यांना शिक्षा करीन. तू ह्या गोष्टी त्यांना सांगच. ‘परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो : जर कोणी इस्राएली संदेष्ट्यामार्फत मला सल्ला विचारु लागला, तर संदेष्ट्याऐवजी मीच त्याच्या प्रश्र्नाला उत्तर देईन. जरी त्याच्याजवळ त्या घाणेरड्या मूर्ती असल्या, त्याला पापाला प्रवृत करणाऱ्या गोष्टी त्याने जवळ बालगल्या आणि त्यांची तो अजूनही पूजा करीत असला, तरी मी त्याच्या प्रश्र्नाला उत्तर देईन. त्याच्याजवळ त्या अंमगळ मूर्ती असल्या, तरी मी त्याच्याशी बोलेन.
5 का? कारण मला त्यांच्या हृदयात हात घालायचा आहे. त्या गलिच्छ मूर्तीसाठी त्यांनी माझा त्याग केला असला तरी, मी त्यांच्यावर प्रेम करतो, हे मला त्यांना दाखवायचे आहे.’
6 “म्हणून इस्राएलच्या लोकांना पुढील गोष्टी सांग. परमेश्वर, माझा प्रभु, म्हणतो, ‘त्या अमंगळ मूर्तीचा त्याग करुन माझ्याकडे परत या. त्या भयानक खोट्या देवांपासून दूर व्हा.
7 एखादा इस्राएली वा इस्राएलमध्ये राहणारा परका हिताच्या गोष्टीसाठी संदेष्ट्याकडे जाऊन माझा सल्ला काय आहे ते विचारू लागला, तर मी त्याला सल्ला देईन. त्याच्याजवळ जरी त्या घाणेरड्या मूर्ती असल्या, त्याला पाप करायला लावणाऱ्या गोष्टी त्याने जवळ बाळगल्या आणि तो त्यांची अजूनही पूजा करीत असला, तरी मी त्याच्या प्रश्र्नाला उत्तर देईन. आणि माझे उत्तर असे असेल.
8 मी त्याच्याकडे पाठ फिरवीन. मी त्याचा नाश करीन. तो इतरांसाठी एक उदाहरण होईल. लोक त्याला हसतील. माझ्या लोकांतून मी त्याला बाजूला काढीन. मगच तुम्हाला कळेल की मीच परमेश्वर आहे.
9 जर एखाद्या संदेष्ट्याने चुकीचे उत्तर दिले, तर मी, देवाने त्याला तसेकरण्यास भाग पाडले आहे. मी त्याच्याविरुद्ध माझे सामर्थ्य वापरीन. मी त्याचा नाश करीन आणि माझ्या माणसांतून इस्राएल लोकातून त्याला काढून टाकीन.
10 म्हणजेच सल्ला विचारणारा, आणि त्याला उत्तर देणारा (संदेष्टा) ह्या दोघांनाही सारखीच शिक्षा होईल.
11 का? म्हणजे तो संदेष्टा माझ्या माणसांना माझ्यापासून दूर नेणार नाही, माझे लोकही पापांत बरबटणार नाहीत. मग ते माझे खास लोक होतील, आणि मीच त्यांचा देव असेन.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला,
12 मग परमेश्वराचे शब्द मला ऐकू आले. तो म्हणाला,
13 “मानवपुत्रा, माझा त्याग करणाऱ्या आणि पाप करणाऱ्या राष्ट्रांला मग ते राष्ट्र कोणतेही असो मी शिक्षा करीन. त्यांचा अन्न पुरवठा मी बंद करीन. मी कदाचित् देशात दुष्काळ पाडीन व लोक व प्राणी यांना देशातून बाहेर काढीन.
14 नोहा, दानीएल व इयोब हे तिथले असले, आणि तरीसुध्दा मी त्या देशाला शिक्षा करीन. आपल्या चांगुलपणाने फारतर ते स्वत:चा जीव वाचवू शकत असले तरी त्या देशाला वाचवू शकत नाही.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
15 देव म्हणाला, “अथवा, कदाचित् मी हिंस्र प्राणी त्या देशात सोडीन आणि ते सर्व लोकांना ठार मारतील. त्या हिंस्र प्राण्यांमुळे कोणीही त्या देशामधून प्रवास करणार नाही.
16 जर नोहा, दानीएल व इयोब तेथे राहात असते, तर मी त्यांचे रक्षण केले असते. ते तिघे स्वत: चे प्राण वाचवू शकले असते. पण माझ्या प्राणाची शपथ घेऊन मी प्रतिज्ञा करतो ते इतरांचे प्राण वाचवू शकले नसते. त्यांच्या मुला-मुलींनाही ते वाचवू शकले नसते. पापी देशाचा नाश केला जाईल.” परमेश्वर माझा प्रभू, हे म्हणाला.
17 देव म्हणाला, “किंवा मी कदाचित् त्या देशावर चढाई करण्यासाठी शत्रूसैन्य पाठवीन. ते सैनिक त्या देशाचा नाश करतील. मी तेथील सर्व माणसांना व प्राण्यांना देशाबाहेर हालवीन.
18 जर नोहा, दानीएल व इयोब तेथे राहत असते, तर मी त्या तिघा सज्जानांना वाचविले असते. ते स्वत:चा प्राण वाचवू शकले असते पण माझी शपथ घेऊन वचन देतो की ते इतरांना म्हणजेच त्यांच्या मुलामुलींनासुध्दा वाचवू शकले नसते. त्या पापी देशाचा नाश केला जाईल” परमेश्वराने, माझ्या प्रभूने, ह्या गोष्टी सांगितल्या.
19 देव म्हणाला, “वा मी त्या देशात कदाचित् रोगराई पसरवीन. मी माझ्या क्रोधाचा त्यांच्यावर वर्षाव करीन. मी त्या देशातील सर्व लोकांचा व प्राण्यांचा मुक्काम तेथून हालवीन.
20 तेथे जर नोहा, दानीएल व इयोब राहात असते, तर ते सज्जन असल्यामुळे मी त्यांना वाचविले असते. ते तिघे स्वत:चे प्राण वाचवू शकले असते. पण माझी शपथ घेऊन वचन देतो की ते इतराना म्हणजे त्यांच्या मुलामुलींना सुद्धा वाचवू शकले नसते.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
21 मग परमेश्वर, माझा प्रभू, म्हणाला, “यरुशलेमाची स्थिती किती वाईट होणार त्याचा विचार कर. शत्रू सैनिक, उपासमार, रोगराई आणि हिंस्र प्राणी या चारही शिक्षा मी त्यांना करीन. त्या देशातील सर्व माणसांना व प्राण्यांचा मी नाश करीन.
22 काही लोक त्या देशातून निसटतील, ते आपल्या मुलांमुलीना घेऊन, मदतीसाठी तुझ्याकडे येतील. मग ते लोक खरोखर किती वाईट आहेत, हे तुला कळेल आणि यरुशलेमवर मी आणलेली सर्व संकटे पाहून तुला बरेच वाटेल.
23 ते कसे जगतात आणि कोणत्या वाईट गोष्टी करतात हे तू पाहिल्यावर, त्यांना शिक्षा करण्यास सबळ कारण आहे, हे तुला पटेल.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.