यहेज्केल
धडा 19
1 देव मला म्हणाला, “इस्राएलच्या नेत्यांबद्दल हे शोकगीत तू गायलेच पाहिजेस.
2 “तुझी आई सिंहीणीसारखी आहे. ती तरुण सिंहांबरोबर झोपते. ती तरुण सिंहाबरोबर झोपली आणि तिला बरीच पिल्ले झाली.
3 त्यापैकी एक पिल्लू उठते त्याची वाढ होऊन तो शक्तिशाली तरुण सिंह झाला आहे. तो शिकार करायला शिकला आहे. त्याने माणसाला मारुन खाल्ले.
4 लोकांनी त्याची गर्जना ऐकली, आणि त्यांनी त्याला सापळ्यात पकडले लोकांनी त्या सिंहाला वेसण घालून मिसरला नेले.
5 “ते छावा नेता होईल’ असे आई सिंहीणीला वाटले. पण आता तिची पूर्ण निराशा झाली आहे. मग तिने दुसऱ्या छाव्याला शिकवून तयार केले.
6 तो तरुण सिंहाबरोबर शिकारीला गेला. तो, बालवान, तरुण, असा सिंह झाला. तो स्वत: शिकार करायला शिकला. त्याने माणसाला मारुन खाल्ले.
7 त्याने राजवाड्यांवर हल्ला केला, व शहरांचा नाश केला. त्या सिंहाची गर्जना ऐकताच, त्या देशातील प्रत्येक माणूस बोलायलासुध्दा घाबरत असे.
8 मग त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी त्याच्यासाठी सापळा लावला, आणि त्यांनी त्याला पकडले.
9 त्यांनी त्याला वेसण घालून पिंजऱ्यात कोंडले. त्यांनी त्या सिंहाला सापळ्यात अडकविले. मग त्यांनी त्याला बाबेलच्या राजाकडे नेले. आता, इस्राएलच्या डोंगरातून त्याची गर्जना तुम्हाला ऐकू येऊ शकत नाही.
10 “पाण्याकाठी लावलेल्या द्राक्षवेलीसारखी तुझी आई होती. तिला भरपूर पाणी मिळाल्यामुळे खूप ताणे फुटले.
11 मग तिच्या फांद्या खूप वाढल्या. त्या हातातील काठ्यांप्रमाणे व राजदंडाप्रमाणे झाल्या.
12 तो वेल उंचच उंच वाढली. तिला खूप फांद्या फुटून ती ढगांपर्यंत पोहोचली.
13 पण त्या वेलीला मुळापासून उपटून फेकून देण्यात आले. पूर्वेकडील उष्ण वाऱ्यांमुळे तिची फळे वाळली. मजबूत फांद्या मोडल्या, आणि त्या फांद्या आगीत टाकल्या गेल्या.
14 आता ती द्राक्षवेल, रुक्ष व निर्जल वाळवंटी प्रदेशात लावली आहे. सर्वांत मोठ्या फांदीला लागलेली आग पसरली. त्या आगीने सर्व डहाळ्यांचा व फळाचा नाश केला. आता हातात धरण्याची काठी व राजदंड उरला नाही.’हे मृत्यूबद्दलचे शोकगीत, मृत्यूसाठीच, गायिले गेले.”