प्रेषितांचीं कृत्यें
धडा 21
1 त्यांचा निरोप घेतल्यानंतर आम्ही समुद्रमार्गे निघालो. आणि सरळ प्रवास करीत कोस येथे आलो. दुसऱ्या दिवशी आम्ही रुदास गेलो. तेथून आम्ही पातरा येथे गेलो.
2 तेथे फेनीकेला जाणारे जहाज आम्हांला आढळले. तेव्हा आम्ही जहाजात बसून पुढे निघालो.
3 तेव्हा कुप्र आमच्या नजरेत आले. परंतु ते डाव्या अंगाला टाकून आम्ही थेट सूरीया देशाला रवाना झालो व सोर येथे उतरलो. कारण तेथे जहाजातील माल उतरावययाचा होता.
4 तेथे येशूचे काही शिष्य आम्हाला आढळले, आणि आम्ही त्यांच्याबरोबर सात दिवस राहिलो. पवित्र आत्म्याच्या सूचनेवरुन त्यांनी पौलाला असे सांगितले की, त्याने यरुशलेमला जाऊ नये.
5 आमच्या भेटीचे दिवस संपत आल्यावर आम्ही तेथून निघून आमचा पुढील प्रवास परत सुरु केला. त्यावेळी तेथील बंधुजन आपल्या पत्नी, मुलांच्याबरोबर आमच्यासह शहरबाहेर आले व तेथील समुद्रकिनाऱ्यावर आम्ही गुडघे टेकले व प्रार्थना केली.
6 मग एकमेकांचा निरोप घेऊन आम्ही जहाजात बसलो व ते लोक आपापल्या घरी गेले.
7 सोर पासून आम्ही आमचा प्रवास सुरु केला व पोलेमा येथे उतरलो. आणि तेथील बंधुवर्गास भेटलो, त्यांच्याबरोबर एक दिवस राहिलो.
8 आणि दुसऱ्या दिवशी निघून आम्ही कैसरीयास आलो व सुवार्तिक फिलिप्प याच्या घरी जाऊन राहिलो. तो निवडलेल्या सात सेवकांपैकीएक होता.
9 त्याला चार मुली होत्या. त्यांची लग्रे झालेली नव्हती. या मुलींना देवाच्या गोष्टी (भविष्याविषयीचे) सांगण्याचे दान होते.
10 त्या बंधूच्या बरोबर बरेच दिवस राहिल्यावर अगब नावाचा संदेष्टा यहूदीयाहून तेथे आला.
11 त्याने आमची भेट घेऊन पौलाच्या कमरेचा पट्टा मागून घेतला. त्याने स्वत:चे हात व पाय बांधले आणि तो म्हणाला, “पवित्र आत्मा असे महणतो; हा पट्टा ज्या मनुष्याच्या कमरेचा आहे, त्याला यरुशलेमा येथील यहूदी लोक असेच बांधतील व यहूदीतरांच्या हाती देतील.”
12 आम्ही व तेथील सर्वांनी ते शब्द ऐकले. तेव्हा आम्ही व इतर लोकांनी पौलाला कळकळीची विनंति केली की, त्याने यरुशलेमला जाऊ नये.
13 पण पौल म्हणाला, “तुम्ही हे काय करीत आहा, असे रडून तुम्ही मला हळवे बनवीत आहात काय? मी फक्त बांधून घेण्यासाठी नव्हे तर प्रभु येशूच्या नावासाठी यरुशलेममध्ये मरायलादेखील तयार आहे.”
14 यरुशलेमापासून दूर राहण्यासाठी आम्ही त्याचे मन वळवू शकलो नाही, म्हणून आम्ही त्याला विनंति करायची सोडली आणि म्हटले, “प्रभूच्या इच्छेप्रमाणे होवो.”
15 त्यानंतर आम्ही तयार झालो आणि यरुशलेमला निघालो.
16 कैसरीया येथील येशूचे काही शिष्य आमच्याबरोबर आले आणि आम्हांला म्लासोनकडे घेऊन गेले.कारण त्याच्याकडेच आम्ही राहणार होतो. तो (म्नासोन) कुप्रचा होता. तो सुरुवातीच्या काळात प्रथम शिष्य झालेल्यांपैकी एक होता.
17 आम्ही जेव्हा यरुशलेमला पोहोंचलो, तेव्हा तेथील बंधुजनांनी मोठ्या आनंदाने आमचे स्वागत केले.
18 दूसऱ्या दिवशी पौल आमच्यासह याकोबाला भेटायला आला. तेव्हा सर्व वडीलजन हजर होते.
19 पौल त्यांना भेटला. नंतर त्याच्या हातून देवाने यहूदीतर लोकांत कशीकशी सेवा करुन घेतली, याविषयी क्रमवार सविस्तर माहिती सांगितली.
20 जेव्हा त्यांनी हे ऐकले तेव्हा त्यांनी देवाचा गौरव केला. आणि ते त्याला म्हणाले, “बंधु, तू पाहशील की हजारो यहूदी विश्वासणारे झालेत. पण त्यांना असे वाटते की, मोशेचे नियम पाळणे फार महत्वाचे आहे.
21 या यहूदी लोकांनी तुइयाविषयी ऐकले आहे की, जे यहूदी इतर देशांत राहतात त्यांना तू मोशेचे नियम पाळू नका असे सांगतोस. तसेच आपल्या मुलांची सुंता करु नका असे सांगतो व आपल्या चालीरीति पाळू नका असे सांगतो.
22 मग आता काय केले पाहिजे? तू येथे आला आहेस हे त्यांना नक्की कळेल.
23 तेव्हा आता आम्ही सांगतो तसे कर: आमच्यातील चार लोकांनी नवस केला आहे.
24 त्या चौघांना घे व स्वत:चे त्यांच्यासह शुद्धीकरण करुन घे. त्या चौघांना त्यांच्या डोक्याचे मुंडण करता यावे म्हणून त्यांचा खर्च तू कर. मग सर्वांना हे समजेल की, त्यांनी जे काही तुझ्याबद्दल ऐकले आहे ते खरे नाही, उलट तू नियमशास्त्राचे पालन करतोस हे दिसेल.
25 जे विदेशी विश्वासणारे आहेत त्यांना आम्ही पत्र लिहिले आहे. ते असे ʅमूर्तीला वाहिलेले अन्न त्यांनी खाऊ नये. रक्त अगर गुदमरुन मारलेले प्राणी त्यांनी खाऊ नयेत अनैतिक कृत्ये करु नयेत.”ʆ
26 मग पौलानेच त्या चार लोकांना आपल्याबरोबर घेतले. दुसऱ्या दिवशी शुद्धीकरणाच्या विधीमध्ये तो सहभागी झाला. मग तो मंदिरात गेला. शुद्धीकरणाचे दिवस केव्हा संपतील हे जाहीर केले. शेवटच्या दिवशी प्रत्येकासाठी अर्पण देण्यात येईल.
27 सात दिवस जवळ जवळ संपत आले होते. परंतु आशियातील काही यहूदी लोकांनी पौलाला मंदिरात पाहिले. त्यानी लोकांना भडकाविले व त्याला (पौलाला) धरले.
28 ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “इस्राएलच्या लोकांनो, मदत करा! हाच तो मनुष्य आहे, जो सर्व लोकांना सगळीकडे आपल्या लोकांविरुद्ध, आपल्या नियमांविरुद्ध व या जागेबद्दल शिकवीत आहे, आणि आता त्याने विदेशी लोकांना देखील मंदिरात आणले आहे, आणि ही पवित्र जागा विटाळविली आहे.”
29 ते असे म्हणाले, कारण इफिसच्या त्रफिमला त्यांनी पौलाबरोबर यरुशलेम येथे पाहिले होते. त्रफिम यहूदी नव्हता, तो ग्रीक होता. लोकांना वाटले, पौलानेच त्याला मंदिरात नेले आहे.
30 सर्व शहर खवळून उठले. सगळे लोक धावू लागले. त्यांनी पौलाला पकडले व मंदिरातून बाहेर ओढून काढले. लगेच दारे बंद करण्यात आली.
31 ते त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करीत असतानाच रोमी सैन्याच्या सरदाराकडे बातमी गेली की, शहरात सगळीकडे गोंधळ उडालेला आहे.
32 ताबडतोब त्याने काही शिपाई व काही शताधिपती घेतले. व तो यहूदी जेथे पौलाला मारीत होते, तेथे धावत गेला. जेव्हा यहूदी लोकांनी रोमी सरदाराला व सैन्याला पाहिले तेव्हा त्यांनी पौलाला मारण्याचे थांबविले.
33 मग सरदार पौलाकडे आला व त्याला अटक केली व त्याला साखळदंडानी बांधण्याचा आदेश दिला. मग सरदाराने पौल कोण आहे व त्याने काय केले आहे याविषयी विचारले.
34 गर्दितून वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकू येऊ लागले. गोंधळामुळे व ओरडण्यामुळे सरदारला सत्य काय आहे हे जाणून घेता येईना. म्हणून सरदाराने शिपायांना हुकूम दिला की, पौलाला इमारतीत घेऊन जावे.
35 जेव्हा पौल इमारतीच्या पायऱ्यांजवळ आला तेव्हा शिपायांना त्याला उचलून आत न्यावे लागले.
36 कारण जमाव हिंसक बनत चालला होता. जमाव त्याच्यामागे चालला होता व ओरडत होता, “त्याला जिवे मारा!”
37 शिपाई पौलाला इमारतीत घेऊन जाणार इतक्यात पौल सरदाराला म्हणाला, “मी काही बोलू शकतो काय?” तो सरदार म्हणाला, “तुला ग्रीक बोलता येते काय?
38 मग मला वाटते, तो मनुष्य तू नाहीस, मला वाटले इजिप्तच्या ज्या मजुराने काही दिवसांपूर्वी बंड करुन सरकारला त्रास देण्याचा प्रयत्न केला, तोच तू आहेस. त्या इजिप्तच्या मनुष्यांने चार हजार दहशतवाद्यांना अरण्यात नेले.”
39 पौल म्हणाला, “किलकिया प्रांतातील तार्सज्ञ नगरात राहणारा मी एक यहूदी आहे. मी एका महत्वाच्या शहराचा नागरिक आहे. मी तुम्हांला विनवितो, मला लोकांशी बोलू द्या.”
40 जेव्हा सरदाराने त्याला बोलण्याची परवानगी दिली तेव्हा तो पायऱ्यांवर उभा राहिला आणि आपल्या हाताने त्याने लोकांना शांत राहण्यास सांगितले. जेव्हा सगळीकडे शांतता पसरली तेव्हा पौल हिब्रू भाषेत बोलू लागला: