प्रेषितांचीं कृत्यें
धडा 17
1 पौल व सीला अंफिपुली व अपुल्लोनिया या प्रदेशांतून प्रवास करीत गेले. ते थेस्सलनीका शहरात आले. त्या शहरात यहूदी लोकांचे सभास्थान होते.
2 यहूदी लोकांना भेटण्यासाठी पौल सभास्थानात गेला. तो असे नेहमीच करीत असे. तीन आठवडे प्रत्येक शब्बाथवारी पवित्र शास्त्राविषयी पौलाने यहूदी लोकांशी चर्चा केली.
3 पौलाने पवित्र शास्त्रातील वचने यहूदी लोकांना स्पष्ट करुन सांगितली. त्याने दाखवून दिले की, रिव्रस्ताने मरणे अगत्याचे होते. तसेच त्याचे मरणातून उठणेही अगत्याचे होते. पौल म्हणाला, “हा मनुष्य ‘येशू’ ज्याच्याबद्दल मी तुम्हांला सांगत आहे तो ‘ख्रिस्त’ आहे.”
4 सभास्थानांमध्ये काही ग्रीक लोक होते, जे खऱ्या देवाची उपसाना करीत. तेथे काही महत्वाच्या स्त्रियाही होत्या. यातील पुष्कळ लोक पौल व सीला यांना जाऊन मिळाले.
5 पण ज्या यहूदी लोकांनी विश्वास ठेवला नव्हता, ते जळफळू लागले. शहरातून काही दुष्ट माणसांना त्यांनी भाड्याने आणले. त्या दुष्ट माणसांनी आणखी लोकांना जमा केले व शहरात अशांतता निर्माण केली. लोक यासोनाच्या घरी गेले. पौल व सीला यांचा शोध घेत ते गेले. त्या लोकांची अशी इच्छा होती की, पौल व सीला यांना लोकांसमोर आणायचे.
6 पण त्यांना पौल व सीला सापडले नाहीत. म्हणून लोकांनी यासोनाला व आणखी काही दुसऱ्या विश्वासणाऱ्यांना नगराच्या अधिकाऱ्यांपुढे ओढीत नेले. ते मोठ्याने ओरडून म्हणाल, “या लोकांनी जगात सगळीकडे उलथापालथ केली. आणि आता ते येथेसुद्धा आले आहेत!
7 यासोनाने त्यांना आपल्या घरी ठेवले. कैसराच्यानियमांविरुद्ध हे लोक करतात. ते म्हणत की, आणखी एक राजा आहे. त्याचे नाव येशू आहे.”
8 शहराच्या अधिकाऱ्यांनी व इतर लोकांनी हे ऐकले. ते खूपच अस्वस्थ झाले.
9 त्यांनी यासोनला व इतर विश्वासणाऱ्यांना दंड भरण्यास सांगितले. मग त्यांनी विश्वासणाऱ्यांना जाऊ दिले.
10 त्याच रात्री विश्वासणाऱ्यांनी पौल व सीला यांना बिरुया नावाच्या दुसऱ्या शहरी पाठविले. बिरुयामध्ये पौल व सीला यहूदी सभास्थानामध्ये गेले.
11 हे यहूदी लोक थेस्सलनीका येथील यहूदी लोकांपेक्षा बरे होते. पौल व सीला यांनी गोष्टी सांगितल्या. त्या गोष्टी त्यांनी आनंदाने ऐकल्या. बिरुया येथील हे यहूदी लोक पवित्र शास्त्राचा दररोज अभ्यास करीत. या गोष्टी खऱ्याच घडल्या आहेत की काय याविषयी जाणून घेण्यास ते उत्सुक होते.
12 यातील पुष्कळ यहूदी लोकांनी विश्वास ठेवला. पुष्कळशा ग्रीक पुरुषांनी व स्त्रियांनी (ज्यांना समाजात महत्व होते.) त्यांनीसुद्धा विश्वास ठेवला.
13 परंतु जेव्हा थेस्सलनीका येथील यहूदी लोकांना समजले की पौल बिरुया येथेही देवाचे वचन सांगत आहे, ते बिरुया येथे सुद्धा आले. थेस्सलनीका येथील यहूदी लोकांनी बिरुया येथील लोकांना हैराण केले व त्रास दिला.
14 म्हणून विश्वासणाऱ्यांनी पौलाला ताबडतोब सुमुद्राकडे नेले. पण सीला व तीमथ्य तेथेच राहिले.
15 विश्वासणारे जे पौलाबरोबर गेले होते त्यांनी त्याला अथेनै शहरात आणले. या बांधवांनी पौलचा संदेश जो सीला व तीमथ्यासाठी होता, तो घेऊन ते परत आले. संदेशात असे म्हटले होते. ʇतुम्हांला शक्य होईल तितक्या लवकर माइयाकडे या.”
16 पौल अथेनै येथे सीला व तीमथ्य यांची वाट पाहत होता. पौलाचे मन अस्वस्थ झाले. कारण त्याने पाहिले की, ते शहर मूर्तीनी भरलेले आहे.
17 सभास्थानामध्ये पौल जे खऱ्या देवाची उपासना करीत अशा यहूदी व ग्रीक लोकांशी बोलला. शहराच्या व्यापार क्षेत्रातील काही लोकांशीही पौल बोलला. पौल दररोज लोकांशी बोलत असे.
18 काही एपिकूरपंथी व स्तोयिक पंथीय तत्वज्ञानी मंडळीने त्याच्याशी वाद घातला.त्यांच्यातील काही म्हणाले, ‘या माणसाला तो काय बोलत आहे, ते त्याचे त्यालाच कळत नाही. तो काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहे?” पौल त्यांना येशूच्या मरणातून पुन्हा उठण्याची सुवार्ता सांगत होता. ते म्हणाले, ‘असे वाटते की तो आपल्याला दुसऱ्या कोणत्या तरी देवाबद्दल सांगत आहे”
19 त्यांनी पौलाला धरले व अरीयपगाच्यासभेपुढे नेले ते म्हणाले, ‘तुम्ही आम्हांला जी नवी कल्पना शिकवीत आहात ती कृपा करुन स्पष्ट करुन सांगा.
20 तुम्ही ज्या गोष्टी सांगत आहात त्या आमच्यासाठी नवीन आहेत. यापूर्वी आम्ही हे कधीही ऐकले नाही. या शिकवणीचा अर्थ काय हे आम्हांला जाणून घ्यायचे आहे.”
21 (अथेनै येथे राहणारे तसेच त्यांच्यात राहणारे विदेशी लोक नेहमी नव्या कल्पनांविषयी बोलण्यात वेळ घालवित असत).
22 मग पौल अरीयपगाच्या सभेपुढे उभा राहिला, पौल म्हणाला, ‘अर्थनैच्या लोकांनो, मी पाहत आहे की, सर्व गोष्टींमध्ये तुम्ही फार धर्मिक आहात.
23 मी तुमच्या शहरातून जात होतो आणि ज्यांची तुम्ही उपासना करता ते मी पाहिले. मी एक वेदी पाहिली. त्यावर असे लिहिले होते: ‘अज्ञात देवाला’. तुम्ही अशा देवाची उपासना करता जो तुम्हांला माहीत नाही. याच देवाविषयी मी तुम्हांला सांगत आहे!
24 ज्याने हे सर्व जग व त्यातील सर्व काही निर्माण केले तोच हा देव आहे. तो जमीन व आकाश यांचा प्रभु आहे. मनुष्यांनी बांधलेल्या मंदिरात तो राहत नाही!
25 हा देव जीवन देतो, श्वास देतो व सगळे काही देतो. त्याला जे पाहिजे ते सगळे त्याच्याकडे आहे.
26 देवाने एका माणसाला (आदाम) निर्माण करुन सुरुवात केली. त्याच्यापासून त्याने वेगवेगळे लोक निर्माण केले. देवाने त्यांना सगळीकडे राहण्यास मुभा दिली. देवाने त्यांना काळ व सीमा ठरवून दिल्या.
27 त्यांनी देवाचा शोध करावा अशी त्याची इच्छा होती. कदाचित तो त्यांचा शोध करील व त्यांना तो सापडेल. पण तो आमच्या कोणापासूनही दूर नाही.
28 आम्ही त्याच्यासह राहतो आम्ही त्याच्यासह चालतो आम्ही त्याच्यासह आहोत.’तुमच्यातीलच काही लोकांनी असे लिहिले आहे:‘आम्ही त्याची मुले आहोत’
29 आपण देवाची मुले आहोत. म्हणून इतर लोक ज्या प्रकारे समजतात त्या प्रकारचा देव आहे असे आपण मुळीच समजू नये. तो सोने, चांदी, किंवा दगडासारखा नाही.
30 भूतकाळात लोक देवाला समजू शकले नाहीत पण देवाने त्याकडे दुर्लक्ष केले. पण आता, जगातील प्रत्येक व्यक्तीला देव सांगतो की, त्याने आपले ह्रदय व जीवन बदलावे.
31 देवाने एक दिवस ठरविलेला आहे, ज्या दिवशी तो जगातील प्रत्येक व्यक्तीचा न्याय करील. तो नि:पक्षपाती असेल, हे करण्यासाठी तो एका माणासाचा (येशूचा) वापर करील. देवाने त्याला फार पूर्वीच निवडले आहे. व प्रत्येक माणसाला देवाने हे दाखवून दिले आहे; त्या माणसाला मरणातून पुन्हा उठवून दाखवून दिले आहे!”
32 जेव्हा लोकांनी ऐकले की, येशूला मरणातून पुन्हा उठविण्यात आले तेव्हा त्यांच्यातील काही जण हसू लागले. लोक म्हणाले, “आम्ही याविषयी नंतर पुन्हा ऐकू!”
33 पौल त्यांच्यापासून निघून गेला.
34 पण काही लोकांनी पौलावर विश्वास ठेवला व ते त्याला जाऊन मिळाले. त्यांच्यापैकी एक दिओनुस्य होता. तो अरीयपगा सभेचा सभासद होता. दामारि नावाच्या स्त्रीनेही विश्वास ठेवला. आणखीही काही लोक होते, ज्यानी विश्वास ठेवला.