नीतिसूत्रे
धडा 22
1 आदरणीय असणे हे श्रीमंत असण्यापेक्षा अधिक चांगले. चांगले नाव असणे हे सोन्या चांदीपेक्षा अधिक महत्वाचे आहे.
2 गरीब लोक आणि श्रीमंत लोक सारखेच असतात. सर्वांना परमेश्वरानेच निर्माण केले आहे.
3 शहाण्या लोकांना संकट येताना दिसते आणि ते वाटेतून बाजूला होतात. पण मूर्ख लोक सरळ संकटात जातात आणि त्यामुळे सोसत राहातात.
4 परमेश्वराला मान द्या आणि विनम्र राहा. नंतर तुम्हाला संपत्ती, मान आणि खरे जीवन मिळेल.
5 वाईट लोक अनेक संकटांच्या जाळ्यात अडकले आहेत. पण जो माणूस आपल्या आत्म्याची काळजी करतो तो संकटांपासून दूर राहातो.
6 लहान मुलाला जगण्याचा योग्य मार्ग लहानपणीच शिकवा. मग तो जेव्हा मोठा होईल तेव्हा त्याच मार्गांने जगेल.
7 गरीब लोक श्रीमंतांचे गुलाम असतात. जो माणूस कर्ज घेतो तो जो कर्ज देतो त्याचा गुलाम असतो.
8 जो माणूस संकटे पसरवतो तो संकटांचे पीक घेतो. आणि शेवटी त्या माणसाचा नाश होईल त्याने इतरांना दिलेल्या त्रासांमुळेच त्या माणसाचा नाश होईल.
9 जो मनुष्य स्वखुशीने आनंदाने देतो त्याला आशीर्वाद मिळेल. कारण तो आपले अन्न गरिबांबरोबर वाटून खातो.
10 जर एखादा माणूस स्वत:ला इतरांपेक्षा चांगला समजत असेल तर त्याला जबरदस्तीने जायला भाग पाडा. जेव्हा तो माणूस जाईल तेव्हा त्याच्याबरोबर संकटही जाईल. नंतर वाद आणि फुशारक्याही बंद होतील.
11 जर तुम्ही शुध्द मनावर आणि प्रेमळ शब्दांवर प्रेम करीत असाल तर राजाही तुमचा मित्र होईल.
12 जे लोक परमेश्वराला ओळखतात त्यांच्यावर तो नजर ठेवतो आणि त्यांचे रक्षण करतो. पण जे त्याच्याविरुध्द जातात त्यांचा तो नाश करतो.
13 आळशी माणूस म्हणतो, “मी आता कामाला जाऊ शकत नाही. बाहेर सिंह आहे आणि तो मला खाईल.”
14 व्यभिचाराचे पाप हा एक सापळा आहे. जो माणूस या सापळ्यात अडकतो त्याच्यावर परमेश्वर खूप रागावतो.
15 मुले मूर्खपणाच्या गोष्टी करीत असतात. पण तुम्ही जर त्यांना शिक्षा केली तर त्या गोष्टी न करायलाही ते शिकतील.
16 या दोन गोष्टी तुम्हाला गरीब बनवतील. स्वत:ला श्रीमंत बनवण्यासाठी गरीबांना त्रास देणे आणि श्रीमंतांना नजराणे देणे.
17 मी काय सांगतो ते ऐका. मी तुम्हाला विद्वानांनी जे सांगितले ते शिकवतो. या शिकवणीपासून शिका.
18 तुम्ही जर या म्हणी लक्षात ठेवल्या तर ते तुमच्या दृष्टीने फार चांगले होईल. तुम्ही जर हे शब्द म्हणू शकलात तर तुम्हाला त्यांची मदत होईल.
19 मी तुम्हाला आता या गोष्टी शिकवेन. तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवावा अशी माझी इच्छा आहे.
20 मी तुमच्यासाठी तीस म्हणी लिहिल्या. हे शब्द म्हणजे उपदेश आणि शहाणपण आहे.
21 हे शब्द तुम्हाला खऱ्या आणि महत्वाच्या गोष्टी सांगतील. नंतर तुम्ही तुमच्याकडे पाठवलेल्यांना ज्यांनी तुम्हाला विचारले त्यांना तुम्ही चांगली उत्तरे देऊ शकता.
22 गरिबांची चोरी करणे सोपे असते. पण ते करु नका आणि न्यायालयात या गरीब लोकांचा फायदा घेऊ नका.
23 परमेश्वर त्यांच्या बाजूला आहे. तो त्यांना साहाय्य करतो आणि त्यांच्याकडून ज्यांनी वस्तू घेतल्या त्या वस्तू तो परत घेईल.
24 जो खूप लवकर रागावतो त्या माणसाशी मैत्री करु नका. जो पटकन् वेडा होतो त्या माणसाजवळ जाऊ नका.
25 जर तुम्ही गेलात तर तुम्ही त्याच्यासारखेच व्हायला शिकाल. आणि तुमच्यावरही त्याच्यावर येतात तशीच संकटे येतील.
26 दुसऱ्याच्या कर्जासाठी जामीन राहाण्याचे वचन देऊ नका.
27 जर तुम्ही त्याचे कर्ज फेडू शकला नाही, तर तुम्ही तुमच्या जवळचे सर्व घालवून बसाल. तुमचे झोपायचे अंथरुण तुम्ही का घालवता?
28 खूप पूर्वी तुमच्या पूर्वजांनी जामीन - जायदादीची आखून दिलेली रेषा पुसू नका.
29 जर एखादा माणूस त्याच्या कामात तरबेज असला तर तो राजांची चाकरी करण्यायोग्य असतो. त्याला बिनमहत्वाच्या लोकांसाठी काम करावे लागणार नाही.