नीतिसूत्रे

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31

धडा 19

1 गरीब आणि प्रामाणिक असणे हे खोटे बोलणारा आणि लोकांना फसवणारा मूर्ख माणूस असण्यापेक्षा चांगले असते.
2 काही गोष्टींविषयी खूप उत्साह दाखविणे एवढेच पुरेसे नसते. तुम्ही काय करीत आहात ते तुम्हाला कळले पाहिजे. एखादी गोष्ट करण्यासाठी एकदम् पुढे घुसू नये, नाही तर तुम्ही ती चुकीची कराल.
3 माणसाचा स्वत:चा मूर्खपणा त्याच्या आयुष्याचा नाश करतो पण तो दोष मात्र परमेश्वराला देतो.
4 जर एखादा माणूस श्रीमंत असेल त्याची संपत्ती त्याला खूप मित्र देते. पण जर माणूस गरीब असेल तर त्याचे सर्व मित्र त्याला सोडून जातात.
5 जो माणूस दुसऱ्याबद्दल खोटे सांगेल त्याला शिक्षा होईल. तो माणूस खोटे सांगतो तो सुरक्षित राहाणार नाही.
6 पुष्कळांना राज्यकर्त्यांबरोबर मैत्री करायची असते आणि जो माणूस नजराणे देतो त्याच्याबरोबर तर सर्वांनाच मैत्री करायची असते.
7 माणूस जर गरीब असला तर त्याचे कुटुंबही त्याच्याविरुध्द असते आणि त्याचे सगळे मित्र त्याच्यापासून दूर जातात. तो गरीब माणूस मदतीची याचना करतो. पण ते त्याच्या जवळपासही फिरकत नाहीत.
8 जर एखाद्याचे स्वत:वर खूपच प्रेम असेल तर तो शहाणा होण्याचा प्रयत्न करील, तो समजून घेण्याचा खूप प्रयत्न करील आणि त्याला त्याचे बक्षिस मिळेल.
9 जो माणूस खोटे बोलतो त्याला शिक्षा होईल. आणि जो खोटे बोलणे चालूच ठेवतो त्याचा सत्यानाश होईल.
10 मूर्ख माणूस श्रीमंत असायला नको. ते गुलामाने राजपुत्रांवर राज्य करण्यासारखे आहे.
11 जर माणूस शहाणा असला तर त्याचा शहाणपणा त्याला सहनशीलता देतो. आणि तो जेव्हा चूक करणाऱ्यांना क्षमा करतो. तेव्हा तर ते खूपच चांगले असते.
12 राजा रागावतो तेव्हा ते सिंहाच्या गर्जनेसारखे वाटते. पण तो जर तुमच्यावर खुश असला तर ते हळुवार पावसासारखे वाटते.
13 मूर्ख मुलगा त्याच्या वडिलांचा सर्वनाश करु शकतो आणि वाद घालणारी बायको सतत टपटप पडणाऱ्या पाण्यासारखी चीड आणणारी असते.
14 लोकांना त्यांच्या आई-वडिलांकडून घरे आणि पैसा मिळतो. पण चांगली बायको परमेश्वराकडून मिळालेला नजराणा आहे.
15 आळशी माणसाला भरपूर झोप मिळेल पण तो खूप उपाशीही असेल.
16 जर माणसाने कायद्याचे पालन केले तर तो स्वत:चेच रक्षण करतो. पण जर तो या गोष्टीला महत्व देत नसेल तर तो मारला जातो.
17 गरीब माणसांना पैसे देणे हे परमेश्वराला कर्ज देण्यासारखे आहे. त्यांच्याशी दयेने वागल्याबद्दल परमेश्वर परतफेड करील.
18 तुमच्या मुलाला शिकवा व तो चुकत असेल तर त्याला शिक्षा करा. तीच एक आशा आहे. तुम्ही जर हे करायला नकार दिला तर तुम्ही त्याला स्वत:चा नाश करायला मदत करीत आहात.
19 जर एखाद्याला चटकन् राग येत असेल तर त्याची किंमत त्याला चुकवावी लागते. जर तुम्ही त्याला त्याच्या संकटातून वाचवत राहिलात तर तो पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी करील.
20 उपदेश ऐका आणि शिका. नंतर तुम्ही शहाणे व्हाल.
21 माणूस बऱ्याच योजना आखतो. पण फक्त परमेश्वराच्याच योजना प्रत्यक्षात येतात.
22 लोक खरे आणि प्रामाणिक असावेत अशी इच्छा केली जाते, म्हणून खोटे असण्यापेक्षा गरीब असणे चांगले.
23 जो माणूस परमेश्वराचा आदर करतो त्याचे आयुष्य चांगले असते. आयुष्यात समाधानी असतो आणि त्याला संकटांची चिंता नसते.
24 आळशी माणूस स्वत:च्या भूकेसाठी करायच्या गोष्टी देखील करणार नाही. तो ताटातले अन्न तोंडात टाकायचे कामसुध्द करीत नाही.
25 जर एखादा माणूस स्वत:ला इतरांपेक्षा चांगला समजत असेल तर त्याला शिक्षा करायला पाहिजे. नंतर मूर्ख धडा शिकतील. शहाण्या माणसावर टीका केली तर तो शिकतो.
26 एखाद्याने वडिलांची चोरी केली आणि आईला घर सोडायला लावले तर तो खूप वाईट आहे. तो माणूस स्वत:ला लाज आणतो आणि स्वत:चा अनादर करतो.
27 तुम्ही जर सुचना ऐकायला नकार दिलात तर तुम्ही मूर्खासारख्या चुका करत राहाल.
28 जर साक्षीदार प्रमाणिक नसला तर योग्य न्याय असणार नाही. दुष्ट माणसांच्या बोलण्याने गोष्टी अधिक वाईट होतील.
29 जो माणूस स्वत:ला इतरांपेक्षा चांगला समजतो त्याला इतर लोक शिक्षा करतील. मूर्ख माणसासाठी जी शिक्षा राखून ठेवली होती ती त्याला मिळेल.