नीतिसूत्रे

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31

धडा 15

1 शांतपणे दिलेल्या उत्तरामुळे राग निघून जातो. पण तिखट उत्तरामुळे राग वाढतो.
2 शहाणा माणूस बोलतो तेव्हा इतरांना ऐकावेसे वाटते. पण मूर्ख माणूस केवळ मूर्खताच बडबडतो.
3 सगळीकडे काय चालले आहे ते परमेश्वर बघतो. परमेश्वर सगळ्या माणसांना बघत असतो. चांगल्या आणि वाईट.
4 दयेचे मायेचे शब्द म्हणजे जणू जीवनवृक्ष. पण खोट्या शब्दांमुळे माणसाची उमेद खचते.
5 मूर्ख माणूस त्याच्या वडिलांच्या उपदेशाकडे लक्ष देत नाही. पण जेव्हा लोक शहाण्या माणसाला शिकवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तो लक्षपूर्वक ऐकतो.
6 चांगले लोक पुष्कळ बाबतीत श्रीमंत असतात. पण दुष्टाकडे ज्या गोष्टी असतात त्यामुळे त्याच्यावर संकटे येतात.
7 शहाणे लोक बोलतात तेव्हा नवीन माहिती मिळते. पण मूर्ख लोक ऐकण्यासारखे काही बोलत नाहीत.
8 दुष्ट माणसे ज्या गोष्टी अर्पण करतात त्या परमेश्वराला आवडत नाहीत. पण परमेश्वर चांगल्या माणसाची प्रार्थना ऐकून आनंदी होतो.
9 दुष्ट लोक ज्या प्रकारे जगतात ते परमेश्वराला आवडत नाही. जे लोक सत्कृत्य करायचा प्रयत्न करतात त्यांच्यावर परमेश्वर प्रेम करतो.
10 जर एखाद्या माणसाने चुकीने जगायला सुरुवात केली तर त्याला शिक्षा होईल. आणि ज्या माणसाला योग्य अयोग्य सांगितलेले आवडत नाही त्याचा नाश होईल.
11 परमेश्वराला सर्व माहीत असते. मृत्युलोकांत काय घडते ते देखील त्याला माहीत असते. म्हणून लोकांच्या मनात आणि हृदयात काय चालले आहे ते परमेश्वराला नक्कीच ठाऊक असेल.
12 मूर्खाला तो चुकत आहे हे सांगितलेले आवडत नाही. आणि तो माणूस शहाण्या माणसाला माहिती विचारायला नकार देतो.
13 माणूस जर आनंदी असला तर त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल. पण जर एखादा मनातून दु:खी असला तर त्याचा आत्मा ते दु:ख दाखवेल.
14 शहाणा माणूस अधिक ज्ञान मिळवायता प्रयत्न करतो. पण मूर्खाला अधिक मूर्खताच हवी असते.
15 काही गरीब लोक नेहमी खिन्न असतात. पण मनातून आनंदी असलेल्या लोकांसाठी जीवन म्हणजे एक मोठा समारंभ असतो.
16 गरीब राहून परमेश्वराचा आदर करणे हे श्रीमंत होऊन खूप संकटे भोगण्यापेक्षा चांगले असते.
17 प्रेम असते त्या ठिकाणी थोडेसे खाणे हे तिरस्कार असलेल्या ठिकाणी भरपूर खाण्यापेक्षा चांगले असते.
18 लवकर रागावणारे लोक संकटे आणतात. पण संयमी माणूस शांतता आणतो.
19 आळशी माणसाला सगळीकडे संकटे मिळतील पण इमानदार माणसासाठी आयुष्य सोपे असेल.
20 शहाणा मुलगा त्याच्या वडिलांना सुखी करतो. पण मूर्ख माणूस त्याच्या आईला लाज आणतो.
21 मूर्ख गोष्टी करण्यात मूर्खाला आनंद मिळतो. पण चांगला माणूस योग्य गोष्टी काळजीपूर्वक करतो.
22 जर एखाद्याला पुरेशी माहिती मिळाली नाही तर त्याच्या योजना कोसळतील. पण जर एखाद्याने शहाण्या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष दिले तर तो यशस्वी होईल.
23 चांगले उत्तर दिल्यावर माणूस आनंदी होतो. आणि योग्य वेळी योग्य शब्द फारच चांगला असतो.
24 शहाण्या माणसाने केलेली गोष्ट यशाकडे नेते आणि त्या गोष्टी त्याला मृत्यूकडे जाण्यापासून वाचवतात.
25 गर्विष्ठ माणसाकडे असलेल्या सगळ्या गोष्टींचा परमेश्वर नाश करील. पण विधवेकडे असलेल्या गोष्टीचे परमेश्वर रक्षण करतो.
26 परमेश्वराला दुष्ट विचार आवडत नाहीत. पण परमेश्वर मायेच्या शब्दांनी आनंदी होतो.
27 जर एखद्याने काही वस्तू मिळवण्यासाठी फसवणूक केली तर तो त्याच्या कुटुंबावर संकटे आणतो. पण जर एखादा माणूस खरा असला आणि लाच घेण्याविषयी त्याच्या मनात घृणा असेल तर तो जगू शकेल.
28 चांगले लोक उत्तर देण्याआधी विचार करतात. पण दुष्ट लोक विचार करण्याआधी बोलतात आणि त्यामुळे त्यांच्यावर संकटे येतात.
29 परमेश्वर दुष्टांपासून खूप दूर आहे. पण तो चांगल्या माणसांच्या प्रार्थना नेहमी ऐकतो.
30 जो माणूस हसतो तो इतरांना आनंद देतो आणि चांगली बातमी ऐकून लोकांना अधिक चांगले वाटते.
31 जो माणूस त्याचे चुकते आहे असे सांगितल्यावर ऐकतो तो शहाणा असतो.
32 जर एखाद्याने शिकायला नकार दिला तर तो स्वत:लाच इजा करुन घेतो. तू चुकतो आहेस असे सांगितलेले जो ऐकून घेतो तो अधिकाधिक गोष्टी समजू शकतो.
33 जो माणूस परमेश्वराचा आदर करतो तो शहाणे व्हायला शिकतो. परमेश्वराचा आदर करण्यासाठी माणसाने खरोखरच विनम्र व्हायला हवे.