ईयोब

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42

धडा 34

1 नंतर अलीहूने आपले बोलणे चालूच ठेवले तो म्हणाला:
2 शहाण्या माणसांनो मी काय सांगतो ते ऐका. हुशार माणसांनो, माझ्याकडे लक्ष द्या.
3 तुमची जीभ ज्या अन्नाला स्पर्श करते त्याची चव तिला कळते आणि तुमच्या कानांवर जे शब्द पडतात ते त्यांना पारखता येतात.
4 तेव्हा आपण आता या मुद्यांची तपासणी करु या आणि काय योग्य आहे याचा निर्णय करु या. काय चांगले आहे ते आपण सगळ्यांनी बरोबर शिकू या.
5 ईयोब म्हणतो, ‘मी, ईयोब निष्पाप आहे, आणि देव माझ्या बाबतीत न्यायी नाही.
6 मी निरपराध आहे, परंतु माझ्याविरुध्द लागलेला निकाल मला खोटारडा ठरवतो. मी निरपराध असूनही मला खूप कष्ट भोगायला लागले.’
7 “ईयोबसारखा आणखी कुणी आहे का? तुम्ही ईयोबची मानहानी केली तरी तो त्याकडे दुर्लक्ष करतो.
8 ईयोब वाईटांशी मैत्री करतो त्याला दुष्टांबरोबर राहायला आवडते.
9 मी असे का म्हणतो? कारण ईयोब म्हणतो की, ‘माणूस जर देवाला खुश करायला लागला तर त्याला त्यापासून काहीही मिळणार नाही.’
10 “तुम्हाला समजू शकते, म्हणून तुम्ही माझे ऐका. जे वाईट आहे ते देव कधीही करणार नाही. तो सर्वशक्तिमान देव कधीच चुकणार नाही.
11 एखादा माणूस जे काही करतो त्याबद्दल देव त्याची परतफेड करील. देव लोकांना त्यांच्या लायकीप्रमाणे देतो
12 हे सत्य आहे देव कधीही चुकत नाही, सर्वशक्तिमान देव नेहमीच न्याची असतो.
13 देवाला कुणीही पृथ्वीवरचा अधिकारी म्हणून निवडले नाही. सगळ्या जगाची काळजी देवावर कुणी सोपवली नाही. सारे काही देवानेच निर्माण केले आहे आणि सारे त्याच्याच नियंत्रणाखाली आहे.
14 जर देवाने पृथ्वीवरील लोकांचा आत्मा आणि श्वास घेऊन
15 टाकायचे ठरवले तर पृथ्वीवरील सर्वजण मरतील. सगळ्याची परत माती होईल.
16 “जर तुम्ही शहाणे असाल तर मी काय म्हणतो त्याकडे लक्ष द्याल.
17 जो माणूस न्यायी होण्यासंबंधी तिरस्कार करतो तो कधीच राज्यकर्ता होऊ शकत नाही. ईयोब, देव शक्तिमान आणि चांगला आहे. तू त्याला अपराधी ठरवू शकशील असे तुला वाटते का?
18 एक देवच असा आहे जो राजांना ‘तुम्ही कवडीमोलाचे आहात’ असे म्हणू शकतो. देव पुढाऱ्यांना, ‘तुम्ही वाईट आहात.’ असे सांगू शकतो.
19 देव इतरांपेक्षा पुढाऱ्यांवर अधिक प्रेम करीत नाही. देव गरीब माणसांपेक्षा श्रीमंतांवर अधिक प्रेम करत नाही. का? कारण त्यानेच प्रत्येकाला निर्माण केले आहे.
20 माणसे अर्ध्यारात्री एकाएकी मरुन जातात. ते आजारी पडतात आणि मरतात. अगदी शक्तिशाली लोकसुध्दा, कारण नसताना मरतात.
21 “लोक जे करतात ते देव बघतो. देव माणसाची प्रत्येक हालचाल बघत असतो.
22 जगात कुठेही अशी अंधारी जागा नाही जिथे वाईट माणसे देवापासून लपून बसू शकतील.
23 देवाला लोकांची अधिक परीक्षा घेण्यासाठी वेळ ठरवण्याची गरज नसते. लोकांचा न्यायनिवाडा करण्यासाठी त्यांना समोर आणण्याची गरजही देवाला भासत नाही.
24 “शक्तिशाली लोकांनी वाईट कुत्ये केल्यावर देवाला त्यांना प्रश्र्न विचारण्याची गरज वाटत नाही. तो सहजपणे त्यांचा नाश करु शकतो आणि त्यांच्या जागी इतरांना पुढारी बनवू शकतो.
25 तेव्हा लोक काय करतात ते देवाला माहीत असते. म्हणूनच देव रात्रीतून दुष्टांना पराभव करतो आणि त्यांचा नि:पात करतो.
26 वाईट माणसांनी जी दुष्कृत्ये केली असतील त्याबद्दल देव त्यांना शिक्षा करतो. आणि जिथे इतर लोक त्यांना पाहू शकतील अशा ठिकाणी देव त्यांना शिक्षा करतो.
27 का? कारण वाईट माणसांनी देवाची आज्ञा पाळायचे थांबवले आणि देवाला हवे ते करण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले.
28 हे दुष्ट लोक गरीबांना कष्ट देतात, आणि मदतीसाठी देवाकडे याचना करायला भाग पाडतात.
29 देव गरीबांची मदतीसाठी हाक ऐकतो. परंतु गरीबांना मदत करायची नाही असे देवाने ठरवले तरी देवाला कुणी अपराधी ठरवू शकणार नाही. देवाने जर लोकांपासून लपून राहायचे असे ठरवले तर कोणालाही तो सापडू शकणार नाही. तो लोकांवर आणि राज्यांवर राज्य करणारा राज्यकर्ता आहे.
30 परंतु जर एखादा माणूस वाईट असेल आणि इतरांना पाप करायला भाग पाडत असेल तर देव त्या माणसाला कधीही राज्यकर्ता होऊ देणार नाही.
31 जर तो माणूस देवाला म्हणेल की, “मी अपराधी आहे. यापुढे मी पाप करणार नाही.
32 देवा, मी जरी तुला बघू शकत नसलो, तरी तू मला जगण्याचा योग्य मार्ग दाखव. मी जरी चुका केल्या असल्या तरी मी त्या पुन्हा करणार नाही.’ तरच असे घडेल.
33 “ईयोब, तुला देवाने बक्षीस द्यावे असे वाटते. परंतु तू मात्र बदलायला तयार नाहीस. ईयोब, हा तुझा निर्णय आहे. माझा नाही. तुला काय वाटते ते मला सांग.
34 शहाणा माणूस माझे ऐकेल. शहाणा माणूस म्हणेल.
35 ‘ईयोब एखाद्या अज्ञानी माणसासारखे बोलत आहे. तो जे काही बोलतो ते अर्थहीन आहे.’
36 ‘ईयोबला अजून शिक्षा करायला हवी असे मला वाटते. का? कारण ईयोब एखाद्या वाईट माणसासारखे आपल्याला उत्तर देत आहे.
37 ईयोब त्याच्या पापात बंडाची भर घालीत आहे. ईयोब इथे आपल्यासमोर बसून आपला अपमान करतो आहे आणि देवाची थट्टा करतो आहे.”