ईयोब

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42

धडा 21

1 नंतर ईयोबने उत्तर दिले:
2 “मी काय म्हणतो ते ऐक. माझे सांत्वन करण्याची ती तुझी पध्दत असू दे.
3 मी बोलेन तेव्हा तू थोडा धीर धर. माझे बोलणे संपल्यावर तू माझी थट्टा करु शकतोस.
4 “मी लोकांविरुध्द तक्रार करीत नाही. मी अधीर झालो आहे त्याला काही कारण आहे.
5 माझ्याकडे बघितल्यावर तुला धक्का बसेल. तुझे हात तोंडावर ठेव आणि माझ्याकडे अचंब्याने बघत रहा.
6 माझ्यावर आलेल्या प्रसंगांचा विचार करायला लागलो म्हणजे मला भीती वाटते आणि माझ्या शरीराचा थरकाप होतो.
7 दुष्ट माणसांना जास्त आयुष्य का असते? ते वृध्द आणि यशस्वी का होतात?
8 दुष्ट माणसे आपली मुले बाळे मोठी होत असलेली बघतात. आपली नातवंडे बघायला ती जिवंत राहतात.
9 त्यांची घरे सुरक्षित असतात आणि त्यांना भय नसते. दुष्टांना शिक्षा करण्यासाठी देव आपली छडी वापरीत नाही.
10 त्यांचे बैल प्रजोत्पादनात असफल होत नाही. त्यांच्या गायींना वासरे होतात आणि वासरे जन्मत:च मृत्युमुखी पडत नाहीत.
11 दुष्ट लोक आपल्या मुलांना कोकरा प्रमाणे बाहेर खेळायला पाठवतात. त्यांची मुले सभोवती नाचत असतात.
12 ते तंतुवाद्याच्या आणि वीणेच्या आवाजावर गातात आणि नाचतात.
13 दुष्ट लोक त्यांच्या आयुष्यात यशाचे सुख अनुभवतात. नंतर ते मरतात आणि दु:खी न होता थडग्यात जातात.
14 परंतु दुष्ट लोक ‘आम्हाला एकटे सोड. तू आम्हाला जे करायला सांगतोस त्याची आम्हाला पर्वा नाही’ असे देवाला सांगतात.
15 आणि दुष्ट लोक म्हणतात, ‘सर्वशक्तिमान देव कोण आहे? आम्हाला त्याची चाकरी करण्याची गरज नाही. त्याची प्रार्थना करण्यात काही अर्थ नाही.’
16 “दुष्ट लोकांचा त्यांच्या यशात स्वत:चा काही वाटा नसतो हे खरे आहे. मी त्यांच्या उपदेशाप्रमाणे वागू शकत नाही.
17 परंतु देव दुष्ट माणसांचा प्रकाश किती वेळा मालवू शकतो? किती वेळा त्यांच्यावर संकटे कोसळतात? देव त्यांच्यावर रागावून त्यांना शिक्षा करतो का?
18 देव दुष्ट लोकांना वाऱ्यावर गवत किंवा धान्याची टरफले उडवून देतो का?
19 पण तू म्हणतोस ‘देव वडिलांच्या पापाबद्दल मुलाला शिक्षा करतो.’ नाही देवाने दुष्टालाच शिक्षा करायला हवी. तेव्हाच त्या दुष्टाला कळेल की त्याला त्याच्या पापाची शिक्षा मिळत आहे.
20 पापी माणसाला शिक्षा भोगू दे. त्याला सर्वशक्तिमान देवाच्या रागाचा अनुभव घेऊ दे.
21 दुष्टाचे आयुष्य संपल्यावर तो मरतो. तो मागे राहिलेल्या कुटुंबाची पर्वा करीत नाही.
22 “देवाला कुणीही ज्ञान शिकवू शकत नाही. देव मोठ्या पदावर असलेल्या लोकांचाही न्यायनिवाडा करतो.
23 एखादा माणूस संपूर्ण आणि यशस्वी जीवन जगल्यानंतर मरतो. त्याने अत्यंत सुरक्षित आणि स्वास्थ्यपूर्ण जीवन जगलेले असते.
24 त्याचे शरीर चांगले पोसलेले होते आणि त्याची हाडे मजबूत होती.
25 परंतु दुसरा माणूस अत्यंत हालाखीचे जीवन जगतो व मरतो. त्यांचे अंत:करण कडवट झालेले असते. त्याने काहीही चांगले भोगलेले नसते.
26 शेवटी हे दोघेही बरोबरच मातीत जातील. किडे त्यांना झाकून टाकतील.
27 “पण तू कसला विचार करीत आहेस ते मला माहीत आहे. कोणत्या डावपेचांनी मला दु:ख द्यायची तुझी इच्छा आहे हे मला माहीत आहे.
28 तू कदाचित् म्हणशील ‘मला चांगल्या माणसाचे घर दाखव. आता मला दुष्ट माणसे कोठे राहतात ते दाखव.’
29 “तू प्रवाशांबरोबरच बोलला असशील आणि तू त्यांच्याच गोष्टी खऱ्या धरुन चालशील.
30 संकटे कोसळतात तेव्हा दुष्ट माणसे त्यातून वाचतात. देवाच्या क्रोधातून ते सहीसलामत सुटतात.
31 दुष्टांनी केलेल्या वाईट कृत्यांबद्दल त्यांना कुणी शिक्षा करत नाही. त्यांच्या तोंडावर कुणी त्याबद्दल टीका करीत नाही.
32 दुष्ट माणूस स्मशानात गेल्यावर तेथील रक्षक त्याच्या थडग्याची देखभाल करतो.
33 म्हणून दरीतली माती देखील दुष्ट माणसाठी सुखावह असेल. व त्याच्या अंत्ययात्रेत हजारो लोक सामील होतील.
34 “म्हणून तुमच्या पोकळ शब्दांनी तुम्ही माझे सांत्वन करु शकणार नाही. तुमची उत्तरे माझ्या उपयोगाची नाहीत.”