ईयोब
धडा 26
1 नंतर ईयोबने बिल्ददला उत्तर दिले:
2 “बिल्दद, सोफर आणि अलीफज तुम्ही दुर्बल माणसासाठी खूप मोठे साहाय्य आहात. हो तुम्हीच दुबळ्या हातांना पुन्हा जोमदार बनवले. (हे ईयोबचे बोलणे उपरोधक आहे)
3 “विद्वत्ताहीन माणसाला तुम्ही फार चांगला उपदेश केला. तुम्ही किती विद्वान आहात ते तुम्ही दाखवून दिलेत.
4 हे बोलण्यासाठी तुम्हाला कुणाची मदत मिळाली? कुणाच्या आत्म्याने तुम्हांला याची प्रेरणा दिली?
5 “मेलेल्या माणसाचा आत्मा भयाने पृथ्वीच्या खाली पाण्यात घाबरतो.
6 परंतु देव मृत्युलोकात स्वच्छपणे बघू शकतो. मृत्यु देवापासून लपून राहात नाही.
7 देवाने रिकाम्या पोकळीत दक्षिणेकडचे आकाश सरकवले. देवाने पृथ्वी निराधार टांगली, अधांतरी ठेवली.
8 “देव घनदाट ढगांना पाण्याने भरतो. परंतु त्या वजनाने तो ढगांना फुटू देत नाही.
9 देव पूर्ण चंद्राचा चेहरा झाकून टाकतो. तो त्याच्यावर ढग पसरवतो आणि त्याला लपवतो.
10 देवाने सागरावर एक वर्तुळ आखले आणि प्रकाश काळोखापासून वेगळा करण्यासाठी क्षितिज निर्माण केले.
11 देव जेव्हा धमकी देतो तेव्हा आकाशाला आधार देणारा पाया भयाने थरथरायला लगतो.
12 देवाची शक्ती सागराला शांत करते. देवाच्या विद्वत्तेने राहाबाच्या मदतनीसांना नष्ट केले.
13 देवाचा नि:श्वास आकाश स्वच्छ करतो. देवाच्या हातांनी पळून जाणाऱ्या सापाला नष्ट केले.
14 देव ज्या काही अनामिक गोष्टी करतो त्यापैकी या काही गोष्टी आहेत. आपण देवाची एखादी लहानशी कुजबुज ऐकतो, देव किती सामर्थ्यवान आणि शक्तिशाली आहे. हे कोणालाच कळत नाही.”