उत्पत्ति

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50

धडा 38

1 त्याच सुमारास यहूदा आपल्या भावांना सोडून अदुलाम नगरातील हीरा नावाच्या माणसाबरोबर त्याच्या घरी राहावयास गेला.
2 तेथे यहूदाला शूवा नावाच्या एक कनानी माणसाची मुलगी भेटली. तेव्हा यहूदाने तिच्याशी लग्न केले.
3 त्या कनानी मुलीला एक मुलगा झाला. त्यांने त्याचे नाव एर ठेवले.
4 त्यानंतर तिला आणखी एक मुलगा झाला त्यांनी त्याचे नाव ओनान ठेवले.
5 त्यानंतर तिला शेला नावाचा आणखी एक मुलगा झाला. तिसरा मुलगा झाला तेव्हा यहूदा कजीब येथे राहात होता.
6 यहूदाने आपला पहिला मुलगा एर याच्यासाठी बायको म्हणून तामार नावाच्या स्त्रीची निवड केली.
7 परंतु एर याने बऱ्याच वाईट गोष्टी केल्या मुळे परमेश्वर त्याच्यावर खुश नव्हता म्हणून परमेश्वराने त्याला ठार मारले.
8 मग यहूदा, एर याचा भाऊ ओनान याला, म्हणाला, “तू जाऊन तुझ्या मरण पावलेल्या भावाच्या बायकोपाशी नीज; आणि तू तिचा नवरा असल्याप्रमाणे तिच्याशी वाग जर तुझ्यापासून तिला मुले झाली तर ती तुझ्या भावाची मुले समजली जातील व त्याचा वंश पुढे चालवितील:”
9 आपल्या भावाजयीपाशी निजल्यावर ह्या मीलनातून होणारी मुले आपले नाव धारण करुन चालणार नाहीत हे ओनानला माहीत होते म्हणून जेव्हा तो त्याच्या भावजयीपाशी निजे तेव्हा तो आपले वीर्य बाहेर जमिनीवर पाडत असे.
10 परंतु त्याच्या हया वागण्याचा परमेश्वराला राग आला, म्हणून त्याने ओनानलाही मारुन टाकले.
11 मग यहूदा आपली सून तामार हिला म्हणाला, “तू तुझ्या बापाच्या घरी जाऊन तेथे राहा, पण माझा मुलगा शेला लग्नाच्या वयाचा होईपर्यंत लग्न करु नको;” कारण शेलाही आपल्या दोन भावाप्रमाणे मारला जाईल अशी यहूदाला भीती वाटली; म्हणून मग तामार आपल्या बापाच्या घरी जाऊन राहिली.
12 काही काळानंतर यहूदाची बायको म्हणजे शूवाची मुलगी मरण पावली. तिच्यासाठी शोक करण्याचे दिवस संपल्यानंतर तो अदुल्लाम येथील आपला मित्र हिरा याच्याबरोबर
13 आपल्या मेंढरांची लोकर कातरवून घेण्याकरिता तिम्ना येथे जात होता हे तामारला समजले.
14 तामार नेहमीच आपल्या विधवादशेतील वस्त्रे घालीत असे; तेव्हा तिने आता वेगळी वस्त्रे घातली आणि बुरखा घेऊन आपले तोंड झाकले. नंतर तिम्ना जवळच्या एनाईम गांवाला जाणाऱ्या रस्त्याच्याजवळ ती बसून राहिली. यहूदाचा मुलगा शेला आता लग्न करण्याच्या वयाचा झाला आहे हे तामारला माहीत होते; परंतु त्याच्याशी तिचे लग्न लावून देण्याविषयी यहूदा काहीच योजना करीत नव्हता.
15 यहूदा रस्त्याने चालला होता. त्याने तिला पाहिले परंतु ती एक वेश्या असावी असे त्याला वाटले; (कारण वेश्या जसे आपले तोंड झाकतात तसे तिने आपले तोंड बुरख्याने झाकले होते.)
16 तेव्हा यहूदा तिच्या जवळ जाऊन म्हणाला, “मला तुझ्यापाशी निजू दे.” (ती तामार आहे, म्हणजे आपली सून आहे हे यहूदाला माहीत नव्हते.)ती म्हणाली, “तुम्ही मला त्याबद्दल काय मोबदला द्याल?”
17 यहूदा म्हणाला, “मी तुला माझ्या कळपातून एक चांगला तरणाबांड बकरा पाठवून देईन.”ती म्हणाली, “ठीक आहे, मी मान्य करिते, परंतु तो पाठवून देई पर्यंत प्रथम माझ्याजवळ काय हडप ठेवाल?”
18 यहूदा म्हणाला, “मी तुला बकरा पाठवून देईन त्यासाठी पुरावा म्हणून तुझ्यापाशी मी काय हडप ठेवावे अशी तुझी इच्छा आहे?”तामार म्हणाली, “तुम्ही कागदपत्रे, करार वगैरेवर उमटवयासाठी व सीलबंद करण्यासाठी जो शिक्का व जी दोरी वापरता ती मला द्या.” तेव्हा यहूदाने त्या वस्तू तिला दिल्या. मग तो तिजपाशी जाऊन निजला. आणि त्यामुळे ती गरोदर राहिली.
19 मग घरी गेल्यावर तामारने आपले तोंड झाकण्याचा बुरखा काढून टाकला आणि पुन्हा पहिल्या सारखी विधवेची वस्त्रे घातली.
20 आपण कबूल केल्याप्रमाणे त्या वेश्येला बकरा देण्यासाठी यहुदाने आपला मित्र हीरा याला एनाईम गांवाला त्या वेश्येकडे पाठवले. त्याचप्रमाणे आपण तिला दिलेल्या, शिक्का, दोरी व काही वस्तू तिजकडून घेऊन येण्यास सांगितले, परंतु हीराला ती वेश्या सांपडली नाही.
21 त्याने एनाईम गांवातील काही लोकांना विचारले, “येथे ह्या रस्त्याच्या बाजूला होती ती वेश्या कोठे आहे?”तेव्हा लोकांनी उत्तर दिले, “येथे कधीच कोणीही वेश्या नव्हती.”
22 तेव्हा यहूदाचा मित्र त्याच्याकडे परत गेला व म्हणाला, “ती वेश्या मला काही सांपडली नाही, तेथे राहाणारे लोक म्हणाले की तेथे कोणीही वेश्या कधीच नव्हती.”
23 तेव्हा यहूदा म्हणाला, “जाऊ दे, त्या वस्तू तिला ठेवून घेऊ दे. अधिक चौकशी केल्यास लोकांकडून आपलीच नालस्ती होईल आणि लोकांकडून आपले हंसे व्हावे अशी माझी इच्छा नाही. मी कबूल केल्याप्रमाणे तिला बकरा देण्याचा प्रयत्न केला, परंतु ती आपणांस सापडली नाही. झाले एवढे पुरे आहे.”
24 या नंतर जवळ तीन महिन्यांनी कोणीतरी यहूदाला सांगितले, “तुझ्या सुनेने वेश्येप्रमाणे पापकर्म केले आणि त्या जारकर्मामुळे ती आता गरोदर राहिली आहे.”तेव्हा मग यहूदा रागाने म्हणाला, “तिला खेचून बाहेर काढा व जाळून टाका.”
25 त्याप्रमाणे काही लोक तामारला ठार मारण्याकरिता तिजकडे गेले, परंतु तिने आपल्या सासऱ्यासाठी एक निरोप पाठवला. तामार म्हणाली, “मला गर्भवती करणारा पुरुष ह्या वस्तूंचा मालक आहे. या वस्तूंकडे नीट पाहा; कोणाच्या आहेत या वस्तू? कोणाची आहे ही मोहोर व ही दोरी? कोणाची आहे ही काठी? सांगा;”
26 यहूदाने त्या वस्तू ओळखल्या आणि तो म्हणाला, “तिचे बोलणे अगदी बरोबर आहे; माझेच चुकले आहे; मी तिला वचन दिल्याप्रमाणे तिचे माझ्या मुलाशी लग्न लावून दिले नाही.” आणि त्यानंतर मात्र त्याने तिच्याशी पुन्हा कधीच शरीर संबंध केला नाही.
27 तामार हिची बाळंत होण्याची वेळ जवळ आली. तिला जुळे होणार असे लोकांना वाटले.
28 बाळंत होते वेळी एका बाळाचा हात बाहेर आला. तेव्हा सुईणीने त्याच्या हाताला लाल धागा बांधला व ती म्हणाली, “हा आधी जन्मला;”
29 परंतु त्या बाळाने आपला हात आखडून घेतला. त्यानंतर मग दुसरे बाळ प्रथम जन्मले; म्हणून मग ती सुईण म्हणाली, “हं! मग तू प्रथम वाट काढून जन्मलास तर!” म्हणून त्यांनी त्याचे नाव पेरेस (म्हणजे हिब्रू भाषेप्रमाणे ‘वाट काढणारा’) असे ठेवले.
30 त्यानंतर हाताला लाल धागा बांधलेले ते दुसरे बाळ जन्मले. त्यांनी त्याचे नाव जेरह (म्हणजे हिब्रू भाषेप्रमाणे तेजस्वी किंवा तेजाने प्रकाशणारा) असे ठेवले.