उत्पत्ति

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50

धडा 33

1 याकोबाने वर पाहिले आणि त्याला एसाव येताना दिसला; त्याच्या बरोबर चारशे माणसे होती. तेव्हा याकोबाने आपल्या कुटुंबाचे चार गट पाडले. लेआ व तिची मुले यांचा एक गट, राहेल व योसेफ यांचा आणखी एक गट, आणि त्याच्या दोन दासी व त्यांची आपली मुले यांचे वेगळे दोन गट होते.
2 याकोबाने त्याच्या दासी व त्यांची मुले यांना आघाडीला त्यानंतर त्याच्यामागे लेआ व तिची मुले आणि राहेल व योसेफ यांना सर्वात शेवटी ठेवले.
3 याकोब स्वत: एसावा पुढे सामोरा गेला म्हणून एसावा समोर पुढे आलेला तोच पहिला होता; आपला भाऊ एसाव याला सामोरा जात असताना त्याने सात वेळा भूमिपर्यंत लवून त्याला नमन केले.
4 एसावाने जेव्हा याकोबाला पाहिले तेव्हा त्याला भेटण्यास तो धावत गेला आणि आपल्या बाहुंचा विळखा त्याच्या भोवती टाकून त्याने गळयात गळा घालून याकोबाला मिठी मारली. त्याचे चुंबन घेतले, आणि ते दोघे रडले.
5 एसावाने आपल्या समोरील स्त्रिया व मुले पाहून विचारले, “तुझ्या बरोबर ही कोण मंडळी आहे?”याकोबाने उत्तर दिले, “देवाने मला दिलेली ही मुले आहेत, देवाने माझे कल्याण केले आहे.”
6 मग याकोबाच्या दोन दासी आपल्या मुलांबरोबर पुढे गेल्या आणि त्यांनी एसावाला लवून नमन केले.
7 त्यानंतर लेआ व तिची मुले, मग राहेल व योसेफ, एसावापुढे गेली आणि त्यांनी त्याला लवून नमन केले.
8 एसावाने विचारले, “इकडे येताना मला दिसले ते लोक कोण? व त्यांच्या बरोबरची जनावरे कशासाठी?”याकोबाने उत्तर दिले, “आपण माझा स्वीकार करावा म्हणून देणगी दाखल मी आपणाला दिलेली ही भेट आहे.”
9 परंतु एसाव म्हणाला, “माझ्या बंघु तू मला काही भेट द्यावयाची नाही, मला माझ्याकरिता भरपूर आहे.”
10 याकोब म्हणाला, “नाही नाही; मी आपणाला आग्रहाची विनंती करतो, आपण जर खरोखर माझा स्वीकार करिता तर मग कृपाकरुन मी आपणाला देतो त्या भेटीचा स्वीकार करा; आपले तोंड मला पुन्हा पाहावयास मिळाले म्हणून मला फार आनंद होत आहे; जणू काय मला देवाचे मुख पाहावयास मिळाले आहे. आपण माझा स्वीकार करिता म्हणूनही मला अतिशय आनंद वाटतो;
11 म्हणून मी आग्रहाची विनंती करतो की मी आपणाला भेट देतो तिचा स्वीकार करा. देवाने माझे कल्याण केले आहे. माझ्यापाशी माझ्या गरजा पुरुन उरेल एवढे आहे.” या प्रमाणे भेटी दाखल दिलेल्या देणग्या घेण्यासाठी याकोबाने एसावास आग्रहाची विनवणी केली म्हणून मग एसावाने त्या देणग्यांचा स्वीकार केला.
12 मग एसाव म्हणाला, “आता तू वाटेस लाग व तुझा प्रवास पुढे चालू ठेव; मीही तुझ्याबरोबर चालतो.”
13 परंतु याकोब त्याला म्हणाला, “माझी मुले नाजुक आहेत हे आपणाला माहीत आहे; आणि माझ्या कळपातली दुभती जनावरे व त्यांची कच्ची बच्ची, करडे कोंकरे, वासरे यांची मला काळजी घेतली पाहिजे. मी जर त्यांच्यावर एकाच दिवशी अधिक दौड लादली तर सगळी जनावरे मरुन जातील;
14 तर माझे स्वामी आपण पुढे निघा; मी माझी गायीगुरे, शेरडेमेंढरे इत्यादी जनावरांना जितके चालवेल आणि माझी लहानमुलेही थकणार नाहीत अशा चालीने चालेन व आपणास सेईर येथे येऊन भेटेन.”
15 तेव्हा एसाव म्हणाला, “मग मी माझ्या माणसातून काही माणसे तुला मदत करण्यासाठी मागे ठेवितो;”परंतु याकोब म्हणाला, “ही तर माझ्या स्वामीची माझ्यावर कृपा आहे; परंतु माणसे ठेवण्याची तशी गरज नाही.”
16 तेव्हा त्याच दिवशी एसाव सेईरास परत जाण्यास निघाला.
17 याकोब गांवास गेला; तेथे त्याने स्वत:साठी घर बांधले आणि गुरांढोरांसाठी खोपट्या बांधल्या म्हणून त्या ठिकाणाचे नाव सुक्कोथ पडले.
18 याकोबाने पदन आरामपासून सुरु केलेला प्रवास कनान देशातील शखेमला सुखरुपपणे संपवला व त्या नगराजवळील एका शेतात आपला तळ दिला.
19 ते शेत त्याने शखेमाचा बाप हमोर याच्या वंशजाकडून शंभर कसिटा (चांदीची नाणी) देऊन विकत घेतले;
20 देवाची उपासना करण्यासाठी त्याने तेथे एक वेदी बांधली. त्याने त्या ठिकाणाचे नाव “एल, इस्राएलाचा देव ठेवले.”