उत्पत्ति

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50

धडा 11

1 जलप्रलयानंतर पृथ्वीवरील सर्व लोकांची एकच भाषा व एकच बोली होती,
2 लोक पूर्वेकडून पुढे निघाले तेव्हा जाता जाता शिनार देशात त्यांना एक मोठे मैदान लागले आणि मग त्यांनी तेथेच वस्ती केली.
3 लोक म्हणाले, “चला, आपण विटा करु व त्या विस्तवात भाजू म्हणजे त्या खूप कठीण होतील; “तेव्हा लोकांनी घरे बांधण्यासाठी दगडाऐवजी विटांचा आणि चुन्याऐवजी डांबराचा उपयोग केला.
4 मग लोक म्हाणाले, “चला, आपण आपणासाठी नगर बांधू; आणि आकाशाला भिडणारा उंचच उंच बुरुज बांधू; असे केले तर मग आपण नावाजलेले लोक होऊ व आपण पांगले जाणार नाहीं तर एके जागी एकत्र राहू.”
5 परमेश्वर ते नगर व तो उंच बुरुज पाहण्यासाठी खाली आला. लोक ते बांधीत आहेत असे परमेश्वराने पाहिले.
6 तेव्हा परमेश्वर म्हणाला, “हे सर्व लोक एकच भाषा बोलतात आणि हे बांधणीचे काम करण्यासाठी ते सगळे एकत्र जमले आहेत, ते काय करु शकतात त्याची ही तर नुसती सुरवात आहे; लवकरच ते त्यांना जे पाहिजे ते करु शकतील,
7 तेव्हा आपण खाली जाऊन त्यांच्या भाषेचा घोटाळा करुन टाकू; मग मात्र त्यांना एकमेकांचे बोलणे समजणार नाहीं,”
8 तेव्हा परमेश्वराने पृथ्वीभर त्यांची पांगापांग केली म्हणून नगर व बुरुज बांधण्याचे काम तसेच राहिले.
9 ह्याच ठिकाणी परमेश्वराने सर्व पृथ्वीच्या भाषेचा घोटाळा केला म्हणून त्या नगराला बाबेल म्हटले आहे. अशा रीतीने परमेश्वराने त्या ठिकाणापासून इतरत्र पसरण्यास लोकांना भाग पाडले.
10 शेमच्या कुळाची वंशावळ येणे प्रमाणे: जलप्रलयानंतर दोन वर्षांनी शेम शंभर वर्षांचा झाल्यावर त्याचा मुलगा अर्पक्षद जन्मला;
11 त्यानंतर शेम पाचशे वर्षे जगला, आणि त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या.
12 अर्पक्षद पस्तीस वर्षांचा असताना त्याचा मुलगा शेलह जन्मला
13 शेलहच्या जन्मानंतर अर्पक्षद चारशेतीन वर्षे जगला व त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या.
14 शेलह तीस वर्षांचा असताना त्याला एबर झाला;
15 एबर झाल्यावर शेलह चारशेतीन वर्षे जगला व त्याच्या हयातीत त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या.
16 एबर चौतीस वर्षांचा झाल्यावर त्याला पेलेग झाला.
17 पेलेग झाल्यावर एबर चारशेतीस वर्षे जगला व त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या.
18 पेलेग तीस वर्षांचा झाल्यावर त्याला रऊ झाला;
19 रऊ झाल्यावर पेलेग दोनशे नऊ वर्षे जगला व त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या.
20 रऊ बत्तीस वर्षांचा झाल्यावर त्याला सरुग झाला;
21 सरुग झाल्यावर रऊ दोनशे सात वर्षे जगला व त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या.
22 सरुग तीस वर्षांचा झाल्यावर त्याला नाहोर झाला.
23 नाहोर झाल्यावर सरुग दोनशें वर्षे जगला आणि त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या.
24 नाहोर एकूणतीस वर्षांचा झाल्यावर त्याला तेरह झाला;
25 तेरह झाल्यावर नाहोर आणखी एकशें एकोणीस वर्षे जगला आणि त्याला इतर मुलगे व मुली झाल्या.
26 तेरह सत्तर वर्षांचा झाल्यावर त्याचे मुलगे अब्राम, हारान व नाहोर हे जन्मले.
27 तेरहच्या कुळाची वंशावळ येणेप्रमाणे: तेरहाला अब्राम, नाहोर व हारान हे मुलगे होते. हारानाचा मुलगा लोट.
28 हारान, आपला बाप तेरह जिवंत असताना आपली जन्मभूमी खास्द्यांचे ऊर अथवा बाबेल गांव येथे मरण पावला.
29 अब्राम व नाहोर या दोघांनीही लग्न केले; अब्रामाच्या बायकोचे नाव साराय आणि नाहोरच्या बायाकोचे नाव मिल्का होते; मिल्का ही हारानाची मुलगी होती; हा हारान मील्का व इस्का यांचा बाप होता.
30 साराय वांझ होती, तिला मूलबाळ नव्हते.
31 मग तेरह आपले कुटुंब घेऊन म्हणजे आपला मुलगा अब्राम, आपला नातू म्हणजे (हारानाचा मुलगा) लोट, आणि आपली सून म्हणजे (अब्रामाची बायको) साराय यांना बरोबर घेऊन बाबीलोनिया मधील म्हणजे खास्द्यांच्या ऊर येथून कनान देशास जाण्यासाठी निघाला: आणि प्रवास करीत ते हारान शहरात आले व तेथेच स्थायिक होण्याचे त्यांनी ठरविले.
32 तेरह दोनशेंपाच वर्षे जगला; त्यानंतर तो हारान येथे मरण पावला.