जखऱ्या
धडा 10
1 वसंत ऋतूत पावसासाठी परमेश्वराची प्रार्थना करा. देव वीज पाठवील आणि पाऊस पडेल. देव प्रत्येकाच्या शेतातील पीक वाढवील.
2 लोक, भविष्य जाण्यासाठी, त्यांच्याकडील लहान मूर्तीचा व जादूटोण्याचा उपयोग करतात. पण ते सर्व व्यर्थ आहे. त्यांना दृष्टांन्त होतात आणि ते त्यांना पडलेल्या स्वप्नांबद्दल सांगतात. पण ते सर्व केवळ अर्थहीन थोतांड आहे. लोकांची स्थिती मदतीसाठी रडत सैरभैर फिरणाऱ्या मेंढ्यांसारखी आहे. पण त्यांना वळविणारा कोणीही मेंढपाळ नाही.
3 परमेश्वर म्हणतो, “मी मेंढपाळांवर (नेत्यांवर) फार रागावलो आहे, माझ्या मेंढरांच्या (लोकांच्या) ह्या स्थितीला मी त्यांना जबाबदार धरले आहे.” (यहूदातील लोक म्हणजे देवाच्या मेंढ्यांचा कळपच. सर्व शक्तिमान परमेश्वर ह्या कळपाची खरोखरच काळजी वाहतो. एखादा सैनिक जशी आपल्या सुंदर घोड्याची काळजी घेतो, तशीच काळजी देव ह्या माणसांची घेतो.)
4 “यहूदातून कूच करणाऱ्या सैन्याबरोबरच कोनशिला, तंबूच्या खुंट्या, युध्दात परावयाची धनुष्ये हे सर्व येईल.
5 ते आपल्या शत्रूचा पराभव करतील. रस्त्यांतून चिखल तुडवीत जावे, तसे ते शत्रूला तुडवीत जातील. परमेश्वर त्यांच्याबाजूला असल्याने ते लढाई करतील आणि शत्रूच्या घोडदळाचासुध्दा पराभव करतील.
6 मी यहूद्यांच्या लोकांना सामर्थ्यवान बनवीन. योसेफच्या वंशाला युध्द जिंकण्यास साहाय्य करीन. आणि त्यांना सुरक्षितपणे व सुखरुप परत आणीन. त्यांचे सांत्वन करीन आणि मी त्यांचा कधीच त्याग केला नव्हता, असेच त्यांच्याशी वागेन. मी परमेश्वर त्यांचा देव आहे व त्यांना मदत करीन.
7 भरपूर मद्य घेतलेल्या सैनिकांप्रमाणे एफ्राईमचे लोक खूष होतील. लहान मुले आनंदून जातील. तेही खुष होतील. परमेश्वराबरोबरचा त्यांचा वेळ आनंदात जाईल.
8 “मी त्यांना शीळ वाजवून एकत्र बोलवीन. मी त्यांना खरोखर वाचवीन. त्यांची संख्या खूप वाढेल.
9 होय! मी माझ्या लोकांना राष्ट्रां - राष्ट्रांत पांगवीत आलो आहे. पण त्या दुरदूरच्या ठिकाणीही ते माझे स्मरण ठेवतील. ते आणि त्यांची मुलेबाळे जगतील, वाचतील आणि परत येतील.
10 मी त्यांना मिसरमधून व अश्शूमधून परत आणीन मी त्यांना गिलादच्या भागात आणीन. पण तेथे पुरेशी जागा नसल्याने मी त्यांना लबानोनमध्ये राहू देईन.”
11 पूर्वी जसे देवाने आपल्या लोकांना मिसरच्या बाहेर आणले तसेच तो आता आणील. तेव्हा देवाने समुद्राच्या लाटांवर प्रहार करुन समुद्र दुभंगाविला होता आणि लोक तो संकटाचा समुद्र पार करुन आले होते. आता परमेश्वर नद्यांचे पाणी आटवील. तो अश्शूरचे गर्वहरण करील आणि मिसरची सत्ता नष्ट करील.
12 परमेश्वर त्याच्या लोकांना सामर्थ्यवान करील ते देवासाठी व त्याच्या नावासाठी जगातील. परमेश्वरानेच ह्या गोष्टी सांगितल्या.