जखऱ्या
धडा 1
1 बरेख्या मुलगा जखऱ्या ह्याला परमेश्वराचा संदेश मिळाला. पारसचा राजा दारयावेश याच्या कारकिर्दीला एक वर्ष आणि आठ महिने झाले, तेव्हाची ही गोष्टी. (जखऱ्या बरेख्याचा मुलगा व बरेख्या प्रेषित इद्दोचा मुलगा होय.) हा संदेश पुढीलप्रमाणे होता:
2 परमेश्वर तुमच्या पूर्वजांवर फार रागावला होता.
3 म्हणून तू पुढील गोष्टी लोकांना सांगितल्या पाहिजेस. परमेश्वर म्हणतो, “तुम्ही माझ्याकडे या आणि मी तुमच्याकडे येईन.” सर्व शक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
4 परमेश्वर म्हणाला, “तुमच्या पूर्वजांप्रमाणे वागू नका. तुमच्या पूर्वजांनी आपली वाईट वर्तणूक बदलावी, वाईट गोष्टी करण्याचे टाळावे, ही सर्व शक्तिमान परमेश्वराची इच्छा असल्याचे, त्या काळच्या संदेष्ट्यांनी त्यांना समजावून सांगितले. होते. पण त्यांनी माझे ऐकले नाही.” परमेश्वराने ह्या गोष्टीची आठवण करुन दिली.
5 परमेश्वर म्हणाला, “तुमचे पूर्वज कालवश झाले आणि ते संदेष्टेसुध्दा चिरकाल जगले नाहीत.
6 ते संदेष्टे माझे सेवक होते. त्यांच्यामार्फत मी तुमच्या पूर्वजांना माझे नियम आणि शिकवणूक कळवीत असे. शेवटी तुमच्या पूर्वजांना धडा मिळाला. ते म्हणाले, ‘सर्व शक्तिमान परमेश्वराने बोलल्याप्रमाणे केले. आमच्या दुराचाराबद्दल व दुष्कृत्यांबद्दल आम्हाला शिक्षा केली.’ आणि ते देवाला शरण आले.
7 पारसचा राजा दारयावेश ह्याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षाच्या अकराव्या महिन्याच्या म्हणजे शेवटच्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी जखऱ्याला परमेश्वराचा आणखी एक संदेश मिळाला. (जखऱ्या हा बरेख्याचा मुलगा. बरेख्या संदेष्टा इद्दोचा मुलगा.) संदेश असा होता:
8 रात्री, तांबड्या घोड्यावर आरुढ झालेला एक माणूस मी पाहिला. तो दरीमध्ये हादस्सीमच्या झुडुपांत उभा होता. त्याच्या मागे तांबड्या, तपकिरी आणि पांढऱ्या रंगाचे घोडे होते.
9 मी विचारले, “महाराज, हे घोडे इकडे कशाकरिता?” तेव्हा माझ्याशी बोलत असलेला देवदूत म्हणाला, “हे घोडे इकडे कशाकरिता आलेत हे मी तुला दाखवीन.”
10 मग हादस्सीमच्या झुडुपांत उभा असलेला माणूस म्हणाला, “पृथ्वीवर इकडे तिकडे संचार करायला परमेश्वराने हे घोडे पाठविलेत.”
11 नंतर ते घोडे हादस्सीमच्या झुडुपांत उभ्या असलेल्या परमेश्वराच्या दूताशील बोलले. ते म्हणाले, “आम्ही पृथ्वीवर इकडे तिकडे फिरलो. सर्वत्र स्थैर्य व शांतता आहे.”
12 मग परमेश्वराच्या दूताने विचारले, “परमेश्वरा, यरुशलेमची आणि यहूदाच्या नगरीचे तू समाधान करण्यापूर्वी त्यांची दु:खातून मुक्तता होण्यास आणखी किती वेळ आहे? गेली सत्तर वर्षे तू या नगरींवर कोपला आहेस.”
13 माझ्याशी बोलत असलेल्या परमेश्वराच्या दूताला मग परमेश्वराने उत्तर दिले. परमेश्वर चांगल्या व सांत्वनपर शब्दांत बोलला.
14 मग परमेश्वराच्या दूताने मला पुढील गोष्ट लोकांना कळविण्यास सांगितल्यासर्व शक्तिमान परमेश्वर म्हणतो:“मला यरुशलेम व सियोन यांच्याबद्दल अत्यंत प्रेम वाटते.
15 आणि जी राष्ट्रे स्वत:ला सुरक्षित समजतात, त्यांच्याबद्दल मला अतिशय राग आहे. मी थोडासा रागावलो आणि माज्या लोकांना शिक्षा करण्यासाठी मी त्या राष्ट्रांचा उपयोग केला. पण त्या राष्ट्रांनी प्रचंड नुकसान केले.”
16 म्हणून परमेश्वर म्हणतो, “मी यरुशलोमला परत येईन आणि दया करुन तिचे दु:ख हलके करीन.” सर्व शक्तिमान परमेश्वर म्हणतो, “यरुशलेमची पुन्हा उभारणी केली जाईल आणि तिथे माझे निवासस्थान बांधले जाईल.”
17 देवदूत म्हणाला, “लोकांना हेही सांग की, सर्व शक्तिमान परमेश्वर म्हणतो, ‘माझ्या नगरी पुन्हा संपन्न होतील. मी सियोनचे सांत्वन करीन. माझी खास नगरी म्हणून मी यरुशलेमची निवड करीन.”
18 मग मी वर बघितले असता मला चार शिंगे दिसली.
19 माझ्याशी बोलत असलेल्या देवदूताला मी त्या शिंगांचा अर्थ विचारला.तो म्हणाला, “इस्राएल, यहूदा व यरुशलेम येथील लोकांना देशोधडीला लावण्यास ह्याच शिंगांनी भाग पाडले.”
20 मग परमेश्वराने मला चार कामगार दाखविले.
21 मी देवाला विचारले, “ते चार कामगार कशासाठी येत आहेत?”तो म्हणाला, “ते शिगांना घाबरवण्यासाठी आणि त्यांना दूर भिरकावून देण्यासाठी आले आहेत. त्या शिंगांनी यहूदाच्या लोकांना बळजबरीने देशोधडीला लावले. त्या शिंगांनी कोणालाही दया दाखवीली नाही. ती म्हणजे यहूदाच्या लोकांवर हल्ला करुन त्यांना परागंदा करणाऱ्या राष्ट्रांची प्रतीके आहेत.”