हबक्कूक
धडा 3
1 ही संदेष्टा हबक्कूकची शिगयोनोथ प्रार्थना आहे
2 परमेश्वरा, मी तुझी वार्ता ऐकली. परमेश्वर तू भूतकाळात केलेल्या सामर्थ्यशाली गोष्टीने मी विस्मयचकित झालो आहे. आता, आमच्या काळातही तू अशाच मोठ्या गोष्टी घडवाव्यास म्हणून मी प्रार्थना करतो. कृपया आमच्या आयुष्यातच त्या घडव. पण तुझ्या खळबळजनक घटनांच्या वेळीही, आमच्यावर दया करण्यास विसरु नकोस.
3 तेमानहून देव येत आहे. पारान पर्वतावरुन पवित्र परमेश्वर येत आहे. परमेश्वराच्या तेजाने स्वर्ग व्यापला जातो आणि स्तुतीने पृथ्वी व्यापली जाते.
4 ते तेज तेजस्वी, चमकदार प्रकाशाप्रमाणे आहे त्याच्या हातातून किरण निघतात. त्या हातात मोठे सामर्थ्य लपले आहे.
5 आजार त्याच्या आधी गेला. आणि नाश करणारा त्याच्यामागून गेला.
6 परमेश्वराने स्वत: उभे राहून, पृथ्वीला न्याय दिला त्याने राष्ट्रांतील लोकांवर नजर टाकली आणि त्या लोकांचा भीतीने थरकाप झाला. पुष्काळ वर्षे पर्वत घटृपणे उभे होते पण त्यांचा चक्काचूर झाला. अती प्राचीन टेकड्या खाली कोसळल्या देवाचे नेहमीच हे असे असते.
7 कूशानची गावे संकटात असलेली मी पाहिली. मिद्यानची घरे भीतीने कापली
8 परमेश्वरा, तू नद्यांवर रागावला होतास का? झऱ्यांवर तुझा राग होता का? समुद्रावर तू संतापला होतास का? विजयसाठी तुझ्या घोड्यांवर स्वार होताना किंवा रथांवर आरुढ होताना तू रागावला होतास का?
9 त्या वेळीसुध्दा तू इंद्रधनुष्य दाखविलेस. पृथ्वीवरच्या वंशाबरोबर तू केलेल्या काराचा तो पुरावा होता रुक्ष भूमीतून नद्या उगम पावल्या.
10 तुला पाहून पर्वत कापले भूमीतून पाणी उसळले. समुद्राच्या पाण्याने प्रचंड गर्जना केली. जणू काही त्याने आपली भूमीवरील सत्ता गमावल्यामुळे ते आकांत करीत होते.
11 चंद्र-सूर्याचे तेज लोपले. तुझ्या विजांचा तेजस्वी लखलखाट पाहून त्यांनी चमकणे सोडून दिले त्या विजा म्हणजे जणू काही हवेत फेकलेले बाण व भाले होते.
12 रागाच्या भरात, तू पृथ्वी पायाखाली तुडविलीस आणि राष्ट्रांना शिक्षा केलीस.
13 तू, तुझ्या माणसांच्या, रक्षणासाठी आलास. तू निवडलेल्या राजाला, विजयकाडे नेण्यासाठी आलास. रंकापासून रावापर्यंतच्या, प्रत्येक दुष्ट घरातील प्रमुखाला तू ठार मारलेस. सेला
14 शत्रू-सैनिकांना थोपविण्यासाठी तू मोशेच्या काठीचा उपयोग केलास. ते सैनिक, प्रचंड वादळाप्रमाणे, आमच्यावर हल्ला करण्यासाठी आले. गरीब माणसाला एकांतात लुटावे, तसा सहज आमचा पाडाव करता येईल असे त्यांना वाटले.
15 पण तू तुझ्या घोड्यांना समुद्रातून कूच करायला लावलेस त्यामुळे समुद्र घुसळला गेला.
16 ही गोष्ट ऐकताच, मला कंप सुटला. मी मोठ्याने किंचाळलो मी अतिशय दुर्बल झाल्याचे मला जाणवले. मी जागच्या जागी नुसताच थरथर कापत उभा राहिलो. म्हणून मी धीराने नाशाच्या दिवसाची वाट पाहीन शत्रू आमच्यावर हल्ला करील.
17 कदाचित् अंजिराच्या झाडांना अंजिरे लागणार नाहीत. वेलीना द्राक्षे लागणार नाहीत. जैतूनाच्या झाडांना फळे लागणार नाहीत. शेतांत धान्य उगवणार नाही, गोठ्यात शेळ्या मेंढ्या, गाईगुरे राहणार नाहीत,
18 तरी मी परमेश्वराठयी आनंद करीन. माझ्या तारणहाराजवळ, देवाजवळ मला सुख मिळेल.
19 परमेश्वर, माझा प्रभू मला शक्ती देतो. हरिणाप्रमाणे जलद धावायला मदत करोत देवच मला सुरक्षितपणे पर्वतांवर नेतो.माझ्या तारा लावलेल्या वाद्यांत असलेल्या त्या संगीत दिग्दर्शकाला.