सफन्या
धडा 1
1 हा परमेश्वराने सफन्याला दिलेला संदेश आहे. योशीयाच्या कारकिर्दीत सफन्याला हा संदेश मिळाला. योशीया हा यहूदाचा राजा आमोन याचा मुलगा होता. सफन्या हा कूशींचा मुलगा होता. कूशी हा गदल्याचा, गदल्या अमऱ्याचा व अमऱ्या हिज्कीयाचा मुलगा होता.
2 देव म्हणतो, “पृथ्वीवरील सर्व गोष्टींचा मी नाश करीन.
3 सर्व प्राणिमात्रांचा मी नाश करीन. सर्व पक्षी व जलचर मी नष्ट करीन. मी पापी आणि त्यांना पाप करण्यास प्रवृत्त करणाऱ्या सर्व गोष्टी याचा नाश करीन मी पृथ्वीवरच्या सर्व लोकांना पृथ्वीवरुन दूर करीन.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
4 परमेश्वर म्हणाला, “मी यहूदाला आणि यरुशलेमवासीयांना शिक्षा करीन. त्या गोष्टींना मी त्या स्थानावरुन दूर करीन. बआल-पूजेचा शेवटचा अंशसुध्दा मी येथे राहू देणार नाही. याजक आणि छतांवर जाऊन ताऱ्यांचीपूजा करणाऱ्या सर्व लोकांना मी दूर करीन. त्या भोंदू याजकांना लोक विसरुन जातील. काही लोक आम्ही तुझीच पूजा करतो असे म्हणतात. त्यांनी माझी उपासना करण्याचे वचन दिले होते. पण आता ते खोटा देव मिलकोम याची पूजा करतात. तेव्हा अशा लोकांना मी तेथून दूर करीन.
5
6 काही लोकांनी परमेश्वराकडे पाठ केली. त्यांनी परमेश्वराला अनुसरायचे सोडले. मदतीसाठी परमेश्वराला हाक मारायचे बंद केले, अशांना मी त्या ठिकाणाहून उठवीन.”
7 परमेश्वर माझ्या, प्रभूसमोर शांत रहा! का? कारण लोकांचा न्यायनिवाडा करण्याचा परमेश्वराने ठरविलेला दिवस लवकरच येत आहे. परमेश्वराने यज्ञाची सिध्दता केली आहे त्याने त्याच्या निमंत्रित पाहुण्यांना तयार रहायला सांगितले आहे,
8 परमेश्वर म्हणाला, “परमेश्वराच्या यज्ञार्पण करण्याच्या दिवशी, मी राजाचे मुलगे व इतर नेते ह्यांना शिक्षा करीन. परदेशीय वस्त्रे घातलेल्यांना पण मी सजा देईन.
9 त्या वेळी, उंबऱ्यावरुन उडी मारणाऱ्यांना आणि धन्याचे घर असत्य व हिंसाचाराने भरणाऱ्यांना मी शिक्षा ठोठावीन.”
10 परमेश्वरा असेही म्हणाला त्या वेळेला, लोक यरुशलेमच्या मासळी दाराशी मदतीसाठी हाका मारीत असतील. गावाच्या इतर भागांत लोक रडत असतील. नगरीभोवतीच्या टेकड्यांवरुन लोकांना वस्तूंचा नाश होत असताना येथो, तसा मोठा धडधडाट ऐकू येईल.
11 गावाच्या खालच्या भागात राहणाऱ्या लोकांनो, तुम्ही रडाल. का? कारण सर्व उद्योगपतींचा आणि श्रीमंत व्यापाऱ्यांचा नाश होईल.
12 “तेव्हा मी एक दिवा घेऊन यरुशलेममधून शोध करीन. जे लोक स्वत:च्या मनाप्रमाणे जगण्यात समाधान मानतात अशा सर्वांना मी शोधीन. ‘परमेश्वर काहीच करीत नाही. तो मदतही करीत नाही आणि दुखापतही करीत नाही’ त्यांना वाटते. अशा लोकांना शोधून काढून मी त्यांना शिक्षा करीन.
13 मग इतर लोक त्यांची संपत्ती बळकावतील आणि त्यांच्या घरांचा नाश करतील. त्या वेळी, ज्यांनी घरे बांधली, ते त्या घरात राहणार नाहीत आणि ज्यांनी द्राक्षमळे लावले, त्यांना त्या द्राक्षांचा द्राक्षारस मिळणार नाही. ह्या गोष्टी दुसऱ्यांनाच मिळतील.”
14 परमेश्वराने ठरविलेला न्यायदानाचा दिवस लवकरच येत आहे तो दिवस जवळच आहे, आणि वेगाने येत आहे. देवाच्या न्यायदानाच्या दिवशी. लोकांना मोठा आक्रांत ऐकू येईल. वीरसुध्दा रडतील.
15 देव तेव्हा आपला क्रोध प्रकट करील. तो भयंकर संकटाचा काळ असेल. ती विद्ध्वंसाची वेळ असेल. ती अंधाकाराची वेळ असेल. तो काळा, ढगाळ व वादळी दिवस असेल.
16 तो काळ युध्दकाळासारखा असेल. युध्दकाळात लोक सुरक्षित गावांतून व संरक्षक बुरुजांवरुन शिंग आणि तुतारी फुंकल्याचे आवाज ऐकतात.
17 परमेश्वर म्हणाला, “मी लोकांना जगणे कठीण करीन. अंधळ्यांना ज्याप्रमाणे आपण कोठे जात आहोत हे कळत नाही, तशी लोकांची स्थिती होईल का? कारण त्यांनी परमेश्वराविरुध्द पाप केले. खूप लोक मारले जातील. त्याचे रक्त जमिनीवर सांडेल. त्यांची प्रेते शेणासारखी जमिनीवर पडतील.
18 त्यांच्या सोन्या-चांदीची त्यांना मदत होणार नाही. त्या वेळी, परमेश्वर खूपच कोपलेला व रागावलेला असेल. परमेश्वर सर्व जगाचा नाश करील. परमेश्वर पृथ्वीवरील सर्व गोष्टींचा संपूर्ण नाशकरील. “