होशेय
धडा 6
1 “चला! आपण परमेश्वराकडे परत जाऊ या! त्याने आपल्याला दुखविले, पण तोच आपल्याला बरे करील. त्याने आपल्याला जखमी केले, पण तोच त्यावर मलमपट्टी करील.
2 दोन दिवसांनी तो आपल्याला जिवंत करील. आणि तिसऱ्या दिवशी उठवील मग आपण त्यांच्याजवळ पाहू शकू.
3 आपण परमेश्वराबद्दल जाणून घेऊ या परमेश्वराला समजून घ्यायचा कसून प्रयत्न करू या. पहाट येते हे जसे आपल्याला माहीत आहे, हेही आपल्याला माहीत आहे. जमिनीला पाणी पुरविणाव्या वसंतातील पावसाप्रमाणे परमेश्वर येईल.”
4 “एफ्राईम व यहूदा, मी तुमचे काय करावे बरे? तुमची निष्ठा सकाळच्या धूक्याप्रमाणे आहे. प्रात:काळीच नाहीशा होणाऱ्या दवाप्रमाणे तुमची निष्ठा आहे.
5 मी संदेष्ट्यांचा उपयोग करुन लोकांसाठी नियम केले. माझ्या आज्ञेप्रमाणे लोकांना ठार मारले गेले. त्या निर्णयांतून चांगल्या गोष्टी निर्माण होतील.
6 का? कारण मला निष्ठावंत प्रेम पाहिजे, बळी नको. लोकांनी होमार्पणे आणण्यापेक्षा, परमेश्वराला जाणून घ्यावे असे मला वाटते.
7 पण लोकांनी आदामासारखाच करार मोडला त्यांच्या देशातच त्यांनी माझा विश्वासघात केला.
8 गिलाद दुष्कर्मे करणाव्यांची नगरी आहे. लोकांनी दुसऱ्यांना फसविले व ठार मारले.
9 लुटारू ज्याप्रमाणे कोणावर तरी हल्ला करण्यासाठी वाट बघत लपून बसतात, त्याचप्रमाणे धर्मगुरु शेखमला जाणाव्या रस्त्यावर वाटसंरूची वाट बघतात. त्यांनी दुष्कृर्त्ये केली आहेत.
10 इस्राएलमध्ये भयंकर गोष्ट मी पाहीली आहे. एफ्राईम परमेश्वाशी निष्ठावान नाही इस्राएल पापाने बरबटली आहे.
11 यहूदा, तुझ्यासाठी सुगीची वेळ ठेवलेली आहे. माझ्या लोकांना मी कैदेतून परत आणीन, तेव्हा ती वेळ येईल.”