होशेय
धडा 11
1 परमेश्वर म्हणाला, “इस्राएल लहान बालक असताना, मी (परमेश्वराने) त्यांच्यावर प्रेम केले. आणि मी माझ्या मुलाला मिसरबाहेर बोलाविले.
2 पण मी जितके अधिक इस्राएलींना बोलाविले, तितके जास्त ते मला सोडून गेले. त्यांनी बआलाना बळी अर्पण केले. मूर्ती पुढे धूप जाळला.
3 “एफ्राईमला चालावयाला शिकविणारा मीच होतो. मी इस्राएलींना हातांवर उचलून घेतले. मी त्यांना बरे केले. पण त्यांना त्याची जाणीव नाही.
4 मी त्यांना दोऱ्यांनी बांधून नेले. पण त्या प्रेमाच्या दोऱ्या होत्या. मी त्यांना मुक्त करणाऱ्या माणसाप्रमाणे होतो. मी खाली वाकून त्यांना जेवू घातले.
5 “परमेश्वराकडे परत येण्यास इस्राएल लोकांनी नकार दिला म्हणून ते मिसरला जातील अश्शूरचा राजा त्यांचाही राजा होईल.
6 त्यांच्या गावांवर टांगती तलवार राहील. त्यांच्या सामर्थ्यवान पुरुषांना ती मारील त्यांच्या नेत्यांचा ती नाश करील.
7 “मी परत यावे अशी माझ्या लोकांची अपेक्षा आहे. वरच्या परमेश्वराला ते बोलवतील पण देव त्यांना मदत करणार नाही.”
8 “एफ्राईम, तुला सोडून देण्याची माझी इच्छा नाही. इस्राएल, तुझे रक्षण करावे असे मला वाटते. अदमाह किवा सबोईम यांच्यासारखी तुझी स्थिती करावी असे मला वाटत नाही. माझे मन:परिवर्तन होत आहे. तुझ्याबद्दलचे माझे प्रेम अतिशय उत्कट आहे.
9 मी, माझ्या भयंकर क्रोधाचा, विजय होऊ देणार नाही. मी पुन्हा एफ्राईमचा नाश करणार नाही. मी मानव नसून परमेश्वर आहे. मी तुमच्यामधला एकमेव पवित्र आहे मी तुमच्याबरोबर आहे. मी माझा क्रोध प्रकट करणार नाही.
10 मी सिंहासारखी डरकाळी फोडीन. मी डरकाळी फोडताच, माझी मुले माझ्यामागून येतील ती पश्चिमेकडून भयाने थरथर कापत येतील.
11 ती मिसरमधून घाबरलेल्या पाखरंाप्रमाणे येतील. मग मी त्यांना घरी परत नेईन.” परमेश्वर असे म्हणाला आहे.
12 “एफ्राईमच्या दैवतांनी मला घेरून टाकले. इस्राएलच्या लोकांनी माझ्याकडे पाठ फिरविली. म्हणून त्यांचा नाश झाला.पण यहूदा अजून एल बरोबरच चालत आहे. यहूदा पवित्रांशी निष्ठावंत आहे.”