यशया
धडा 39
1 त्या वेळेला, बलदानचा मुलगा मरोदख बलदान बाबेलचा राजा होता. मरोदखने हिज्कीयाच्या आजारपणाबद्दल आणि त्याच्या बरे होण्याविषयी ऐकले, म्हणून त्याने हिज्कीयाला पत्रे व भेटी पाठविल्या.
2 ह्या भेटींमुळे हिज्कीयाला आनंद झाला. म्हणून त्याने आपल्या राज्यातील अगदी खास अशा गोष्टी मरोदखच्या माणसांना पाहू दिल्या. हिज्कीयाने आपली संपत्ती त्यांना दाखविली. त्यात चांदी, सोने, अमूल्य तेले आणि अत्तरे होती. युध्दात वापरलेल्या तलवारी आणि ढालीही हिज्कीयाने त्यांना दाखविल्या. त्याने जमविलेल्या सर्व वस्तू मरोदखच्या माणसांना दाखविल्या. त्याने आपल्या घरातील व राज्यातील सर्व काही दाखविले.
3 संदेष्टा यशया, हिज्कीया राजाकडे गेला आणि त्याने विचारले, “ही माणसे काय म्हणत होती? ती कोठून आली होती?” हिज्कीया उत्तरला, “ती फार दूरच्या देशातून माझ्याकडे आली होती. ती बाबेलमधून आली होती.”
4 मग यशयाने विचारले, “तुझ्या राज्यात त्यांनी काय काय पाहिले?”हिज्कीया उत्तरला, “माझ्या राजवाड्यातील प्रत्येक गोष्ट त्यांनी पाहिली. माझी सर्व संपत्ती मी त्यांना दाखविली.”
5 यशया हिज्कीयाला म्हणाला, “सर्वशक्तिमान परमेश्वराचे म्हणणे ऐक.
6 “भविष्यात, तुझ्या पूर्वजांनी आणि तू आतापर्यंत जे जमविले आहे ते सर्व लुटले जाईल आणि बाबेलला नेले जाईल.’ सर्वशक्तिमान परमेश्वराने हे सांगितले.
7 तू ज्यांना जन्म देशील त्या तुझ्या मुलांना बाबेलचा राजा घेऊन जाईल. बाबेलच्या राजवाड्यात तुझी मुले नोकर म्हणून राहतील.”
8 हिज्कीया यशयाला म्हणाला, “परमेश्वरचे हे बोल ऐकायला बरे वाटतात.” (हिज्कीयाला वाटले मी राजा असताना सगळीकडे शांतता असेल, कसलाही त्रास असणार नाही.” म्हणून तो असे म्हणाला.)