यशया
धडा 25
1 प्रभू, तू माझा परमेश्वर आहेस. मला तुझ्याबद्दल आदर वाटतो व तुझे मी स्तवन करतो. तू आश्चर्य घडवली आहेस. तू पूर्वी केलेले भाकीत पूर्णपणे खरे ठरले आहे. तू सांगितलेली प्रत्येक गोष्ट जशीच्या तशी घडली आहे.
2 तू ज्या शहराचा नाश केलास, ते शहर मजबूत तटबंदीने सुरक्षित केलेले होते. पण आता तेथे फक्त दगडांचा खच पडला आहे परकीयांचा राजवाडा जमीनदोस्त केला गेला आहे. तो परत कधीच बांधला जाणार नाही.
3 बलाढ्य राष्ट्रातील लोक तुला मान देतील. क्रूर राष्ट्रांतील शहरे तुला घाबरतील.
4 परमेश्वरा, तू गरजू गरीब लोकांचा आसरा आहेस. त्यांच्यापुढील अनेक समस्या त्यांना खच्ची करू पाहतात पण तू त्यांचे रक्षण करतोस. परमेश्वरा, तू उन्हापावसापासून रक्षण करणाऱ्या निवाऱ्यासारखा आहेस. पीडा या तुफान वादळ व पावसासारख्या असतात. पण पावसाची झड भिंतीवर आपटून खाली पडते. घरातल्या लोकांना तिचा त्रास होत नाही.
5 शत्रू आरडाओरडा करून गोंगाट करतो. भयंकर शत्रू आव्हाने देतो. पण देवा तू त्यांचा बंदोबस्त करतोस. ज्याप्रमाणे उन्हाळ्यात वाळवंटातील झाडेझुडपे सुकून जमिनीवर गळून पडतात, त्याप्रमाणे तू शत्रूचा पराभव करून त्यांना तुझ्यापुढे गुडघे टेकायला लावतोस. ज्याप्रमाणे मोठे ढग उष्णतेचा ताप कमी करतात, त्याप्रमाणे तू भयंकर शत्रूच्या गर्जना थांबवतोस.
6 त्या वेळेस, सर्वशक्तिमानपरमेश्वर, डोंगरावरील सर्व लोकांना मेजवानी देईल. मेजवानीत उत्कृष्ट अन्नपदार्थ व उंची मद्य असेल. मांस कोवळे व चांगल्या प्रतीचे असेल.
7 सध्या बुरख्याने सर्व राष्ट्रे आणि लोक झाकून गेले आहेत. हा बुरखा म्हणजेच “मृत्यू” होय.
8 पण मृत्यूवर पूर्णपणे मात करता येईल आणि परमेश्वर माझा प्रभू, प्रत्येक चेहऱ्यावरचा, प्रत्येक अश्रू पुसून टाकील. पूर्वी त्याच्या लोकांनी दु:ख भोगले पण देव पृथ्वीवरचे दु:ख दूर करील. परमेश्वराने सांगितले असल्यामुळेच हे सर्व घडून येईल.
9 तेव्हा लोक म्हणतील, “हा आपला देव आहे. आपण ज्याची वाट पाहत आहोत तोच हा. तो आपले रक्षण करायला आला आहे. आपण त्या आपल्या परमेश्वराची वाट पाहत आहोत, म्हणून जेव्हा परमेश्वर आपले रक्षण करील तेव्हा आनंद साजरा करू आणि सुखी होऊ.”
10 परमेश्वराचे सामर्थ्य ह्या डोंगरावर असल्याने मवाबचा पराभव होईल. परमेश्वर कचऱ्याच्या ढिगातील गवताच्या काडीप्रमाणे शत्रूला पायाखाली तुडवील.
11 पोहणाऱ्या माणसाच्या हाताप्रमाणे परमेश्वर स्वत:चा हात लांब करील आणि लोकांना ज्यांचा अभिमान आहे अशा सर्व गोष्टी तो जमा करील. लोकांनी घडविलेल्या सर्व सुंदर वस्तू परमेश्वर गोळा करील आणि दूर फेकून देईल.
12 लोकांनी बांधलेल्या उंच भिंती व सुरक्षित जागा परमेश्वर पाडून टाकून धुळीला मिळवील.