2 इतिहास

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36

धडा 16

1 आसाच्या राज्याच्या छत्तिसाव्या वर्षी बाशाने यहूदावर स्वारी केली. बाशा हा इस्राएलचा राजा. रामा हे नगर निवडून त्याने त्याची मजबुती केली. यहूदाचा राजा आसा याच्याकडे कोणालाही येण्याजाण्याला प्रतिबंध व्हावा हा त्याचा त्यामागचा हेतू होता.
2 तेव्हा आसाने परमेश्वराच्या मंदिरातील आणि राजमहालातील सोने आणि चांदी काढून घेतली. अरामचा राजा बेन - हदाद दिमिष्काला राहात होता. आसाने त्याच्याकडे सोने, आणि चांदी पाठवून त्याला निरोप पाठवला,
3 “आपण आपसात एक करार करु. आपल्या दोघांच्या वडीलांमध्येही तसा करार केलेला होता. मी माझ्याकडचे सोने - रुपे तुझ्याकडे पाठवत आहे. इस्राएलचा राजा बाशा याच्याबरोबरचा तुझा करार मोड म्हणजे तो माझ्याकडे पाठ फिरवेल आणि मला त्रस्त करणार नाही.”
4 बने - हदाद या गोष्टीशी सहमत झाला. त्याने इस्राएली नगरांवर आपले सैन्याचे सरदार पाठवले. त्या सरदारांनी ईयोन, दान आबेल मईम या नगरांवर हल्ला केला. कोठारे असलेल्या नफतालीच्या नगरांवरही त्यांनी चढाई केली.
5 या चढायांचे वृत्त बाशाच्या कानावर गेले. तेव्हा त्याने रामानगराच्या मजबुतीचे काम अर्धवट सोडून दिले.
6 राजा आसाने मग सर्व यहूदींना बोलावले. या लोकांनी रामा नगर बांधण्यासाठी वापरलेले दगड, लाकूड ही सामग्री हस्तगत केली. त्यांनी ती गेबा आणि मिस्पा या नगरांच्या बांधकामासाठी वापरली.
7 यावेळी हनानी नावाचा द्रष्टा यहूदाचा राजा आसा याच्याकडे आला व त्याला म्हणाला, “आसा तू मदतीसाठी तुझ्या परमेश्वर देवावर भरवंसा न ठेवता अरामच्या राजावर अवलंबून राहिलास. तू परमेश्वराचे साहाय्य घ्यायला हवे होतेस. पण तू परमेश्वराचा धावा केला नाहीस म्हणून अरामचे सैन्य तुझ्या हातातून सुटून गेले आहे.
8 कूशी आणि लुबी यांचे सैन्य तर केवढे बलाढ्य होते! त्यांच्याकडे कितीतरी रथ आणि स्वार होते. पण तेव्हा तू परमेश्वरावर भरवंसा ठेवलास आणि परमेश्वराने तुला विजय मिळवून दिला.
9 अखिल पृथ्वीवर कोणाची आपल्यावर श्रध्दा आहे याचा शोध परमेश्वराची नजर सतत घेत असते व अशांना तो आपले पाठबळ देतो. पण आसा, तू मात्र मूर्खपणा केला आहेस. तेव्हा यापुढे तुला लढायांना तोंड द्यावे लागेल.
10 हनानीच्या या बोलण्याचा आसाला राग आला व क्रोधाच्या भरात त्याने हनानीला तुरुंगात डांबले. कधी कधी आसा काही लोकांशी फार निर्दयतेने वागे.”
11 ‘यहूदा आणि इस्राएल राजांचा इतिहास’ या पुस्तकात आसाच्या कारभाराचे साद्यंत वर्णन आहे.
12 आपल्या राज्याच्या एकोणचाळीसाव्या वर्षी तो पायाच्या दुखण्याने बेजार झाला. त्याचा आजार खूप बळावला तरी त्याने दुखण्यात परमेश्वराचा धावा केला नाही. त्याने वैद्यांकरवी इलाज करुन घेतला.
13 आपल्या करकीर्दीच्या 41व्या वर्षी तो वारला व आपल्या पूर्वजांबरोबर त्याने चिरविश्रांती घेतली.
14 दावीदनगरात त्याने आधीच स्वत:साठी करुन घेतलेल्या कबरीत लोकांनी त्याचे दफन केले. विविध सुवासिक द्रव्ये आणि मसाले घातलेल्या बिछान्यावर लोकांनी त्याला ठेवले. त्याच्या सन्मानार्थ सुगंधी द्रव्ये जाळली.