2 इतिहास
धडा 12
1 रहबामचे सामर्थ्य वाढले. त्याने आपले राज्य बळकट केले. पण त्याचबरोबर त्याने आणि इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या नियमशास्त्राचे पालन करण्याचे थांबवले.
2 रहबामच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षी शिशकने यरुशलेमवर हल्ला चढवला. शिशक हा मिसरचा राजा होता. रहबाम आणि यहूदाचे लोक यांनी परमेश्वराचा मार्ग सोडल्यामुळे असे झाले.
3 शिशककडे 12,000 रथ, 60,000 घोडेस्वार आणि अगणित पायदळ होते. त्याच्या सैन्यात लुबी, सुकृीव कुशी हे लोक होते.
4 यहूदातील भक्कम नगरांचा पाडाव केल्यावर शिशकने आपले सैन्य यरुशलेमला आणले.श
5 तेव्हा शमाया हा संदेष्टा रहबाम आणि वडीलधारी मंडळी यांच्याकडे आला. शिशकच्या धास्तीने ही सर्व वडीधारी मंडळी यरुशलेमला जमली होती. शमाया रहबामला आणि या सर्वांना म्हणाला, “परमेश्वराचे म्हणणे असे आहे ‘रहबाम, तू आणि यहूदाचे लोक यांनी माझा त्याग केला आहे. तुमचे आचरण माझ्या नियमांच्या विरुध्द आहे. तेव्हा मीही तुम्हाला सोडून शिशकच्या हाती दिले आहे.”
6 तेव्हा यहूदाची ती वडीलधारी मंडळी आणि रहबाम यांना पस्चाात्ताप झाला आणि ते विनम्र झाले. “परमेश्वर म्हणतो ते खरे आहे.” असे त्यांनी उदगार काढले.
7 ते नम्र झाले आहेत हे परमेश्वराने पाहिले. तेव्हा पुन्हा शमायाला परमेश्वराचा संदेश आला. परमेश्वर त्याला म्हणाला, “राजा आणि ही मंडळी माझ्यापुढे नम्र झाल्यामुळे मी त्यांचा नाश करणार नाही. त्यांना तारीन. शिशक मार्फत त्यांना मी माझ्या कोपाचे लक्ष्य करणार नाही.
8 पण यरुशलेमचे लोक शिशकचे चाकर होतील. माझी सेवा आणि इतर देशांतील राजाची सेवा यामधला भेद त्यांना कळावा म्हणून ते त्याचे अंकित होतील.”
9 शिशकने यरुशलेमवर स्वारी केली आणि परमेश्वराच्या मंदिरातील खजिना लुटून नेला. शिशक हा मिसरचा राजा होता. राजमहालातील खजिनाही त्याने लुटला. शलमोनाने केलेल्या सोन्याच्या ढाली त्याने हस्तगत केल्या.
10 त्या सोन्याच्या ढालीऐवजी रहबामने पितळेच्या ढाली केल्या. त्या त्याने महालाचे संरक्षण करणाऱ्या द्वारपालांना दिल्या.
11 राजा परमेश्वराच्या मंदिरात जात असे तेव्हा ते ढाली घेऊन पुढे होत. नंतर त्या पहारेदारांच्या खोलीत ठेवून देत.
12 रहबाम असा नम्र झाल्यामुळे परमेश्वराचा त्याच्यावरील कोप शलमा. त्याचा परमेश्वराने पूर्ण नायनाट केला नाही. शिवाय यहूदात थोडा चांगुलपणाही शिल्लक होता.
13 रहबामने यरुशलेममध्ये आपले सामर्थ्य वाढवले. तो राज्यावर आला तेव्हा एक्के चाळीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये सतरा वर्षे राज्य केले. इस्राएलच्या सर्व वंशांमधून परमेश्वराने यरुशलेमची निवड केली होती. आपले नाव राहावे म्हणून त्याने यरुशलेम निवडले होते. रहबामच्या आईचे नाव नामा; नामा अमोनीण नगरातली होती.
14 रहबामने वाईट गोष्टी केल्या कारण परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करण्याविषयी त्याने मनात निश्चय केला नव्हता.
15 शमाया हा संदेष्टा आणि इद्दो हा द्रष्टा यांच्या इतिहासात रहबामने आपल्या कारकीर्दीत केलेल्या सर्व गोष्टींची साद्यंत हकीकत आहे. शमाया आणि इद्दो वंशाळींचा इतिहास लिहीत. रहबाम आणि यराबाम या दोघांमध्ये नित्य लढाया होत.
16 रहबामने मृत्यूनंतर आपल्या पूर्वजांबरोबर विश्रांती घेतली. दावीदनगरात त्याचे दफन झाले. त्याचा मुलगा अबीया गादीवर आला.