शास्ते
धडा 7
1 यरूब्बाल (म्हणजेच गिदोन) आणि त्याच्या बरोबरचे सर्व लोक यांनी सकाळी लवकर उठून हरोद झऱ्याजवळ तळ दिला. आणि मिद्यानी लोकांचा तळ मोरे नावाच्या डोंगराच्या पायथ्याजवळ एका खोऱ्यात होता. हे ठिकाण गिदोनच्या तळाच्या उत्तरेस होते.
2 तेव्हा परमेश्वर गिदोनला म्हणाला, “माझ्या मदतीने तुम्ही मिद्यानी लोकांचा पराभव करु शकाल पण तुझ्या सैन्यात जरुरीपेक्षा जास्त माणसे आहेत उद्या कदाचित हे इस्राएल लोक मला विसरतील आणि आमचे रक्षण आम्ही स्वत:च केले अशी प्रौढी मिरवतील.
3 तेव्हा आता एक गोष्ट जाहीर कर. त्यांना सांग, “कोणी लढाईला घाबरत असेल तर त्याने आत्ताच गिलाद डोंगर सोडून घरी परत जावे.”त्यावेळी बावीस हजार माणसे गिदोनला सोडून गेली. तरी दहाहजार राहिली.
4 तेव्हा परमेश्वर गिदोनला म्हणाला, “ही देखील फार आहेत. त्यांना घेऊन खाली झऱ्याशी जा मी त्यांची परीक्षा पाहतो. “याने तुझ्या बरोबर यावे” असे मी म्हणीन त्याच माणसाने तुझ्याबरोबर जावे. ज्याने जाऊ नये असे सांगीन तो तुझ्याबरोबर येणार नाही.”
5 तेव्हा गिदोन त्या लोकांना झऱ्यापाशी घेऊन आला. तेथे गिदोनला परमेश्वर म्हणाला, “आता या लोकांची मी सांगतो त्याप्रमाणे विभागणी कर. जे कुत्र्याप्रमाणे जिभेने लपलप करत पाणी पितील त्यांचा एक गट कर. जे गुडघे टेकून वाकून पाणी पितील त्यांना दुसऱ्या गटात टाक.”
6 पाण्याची ओंजळ तोंडाशी नेऊन कुत्र्याप्रमाणे लपक लपक करीत पिणारे तीनशेजण निघाले बाकी सर्व वाकून पाणी प्यायले
7 परमेश्वर गिदोनला म्हणाला, “ही तीनशे माणसे मी निवडतो मिद्यानींच्या शत्रूंचा पराभव करण्यासाठी जे लपक लपक करत पाणी प्यायले त्यांचा मी उपयोग करुन घेईन मी त्यांच्या मार्फत इस्राएल लोकांचा बचाव करीन. इतरांना परत जाऊ दे.”
8 तेव्हा गिदोनने बाकीच्यांना परत पाठवून तीनशे जणांना आपल्या बरोबर राहू दिले. जे परत गेले त्यांची शस्त्रसामुग्री आणि रणवाद्ये तीनशे जणांनी ठेवून घेतली.गिदोनच्या तळाच्या खालच्या खोऱ्यातच मिद्यानी लोकांचा तळ होता.
9 रात्री परमेश्वर गिदोनशी बोलला तो म्हणाला “ऊठ मिद्यानी सैन्य मी आत्ताच तुझ्या हाती सोपवतो. त्यांच्या तळावर जा.
10 तुला एकट्याला भीती वाटत असली तर तुझा सेवक पुरा याला बरोबर घेऊन जा.
11 तेथे जाऊन ते लोक काय बोलतात ते नीट लक्ष देऊन ऐक म्हणजे मग तुला त्यांच्यावर हल्ला चढवायला भीती वाटणार नाही.”तेव्हा गिदोन आपल्या पुरा या सेवकासह शत्रूच्या शिबिराच्या कडेशी गेला.
12 मिद्यानी, अमालेकी आणि पूर्वेकडील सर्व लोक त्या खोऱ्यात होते. त्यांचा जमाव टोळ धाडीसारखा दिसत होता. किनाऱ्यावरील वाळुकणांइतके असंख्य उंट त्यांच्याबरोबर होते.
13 शत्रूतळाशी येताच गिदोनला एकाचे बोलणे ऐकू आले. आपल्याला काय स्वप्न पडले ते तो आपल्या मित्राला सांगत होता. “पावाची एक गोल लादी मिद्यानी लोकांच्या तळापाशी घरंगळत आली. आणि तंबूला तिने इतक्या जोरात धक्का दिला की तंबू उलटला आणि पार आडवा झाला.”
14 त्या मित्राला या स्वप्नाचा अर्थ माहीत होता. तो म्हणाला, “याचा अर्थ एकच असू शकतो योवाशचा मुलगा गिदोन या इस्राएल लोकांबद्दल हे स्वप्न आहे. परमेश्वर त्याच्या करवी मिद्यानी सैन्याचा पाडाव करणार आहे.”
15 गिदोनने हा संवाद ऐकला तेव्हा त्याने परमेश्वरापुढे दंडवत घातले. मग तो आपल्या तळावर परत आला. लोकांना हाका मारुन तो म्हणाला, “चला, तयार व्हा. मिद्यान्यांचा पराभव करायला परमेश्वर आता मदत करणार आहे.”
16 मग गिदोनने आपल्या तीनशे माणसांचे तीन गट केले. प्रत्येकाला एक रणशिंग आणि एक रिकामा घडा दिला. घडचामध्ये पेटती मशाल होती.
17 मग गिदोनने सांगितले, “माझ्याकडे सर्वांचे लक्ष असू द्या. मी करतो तसे करा. शत्रूच्या तळापर्यंत माझ्या मागोमाग चला. तेथे पोचल्यावर मी करीन तसेच करा
18 तुम्ही शत्रूच्या शिबिराला वेढा घाला. मी आणि माझ्या बरोबरची माणसे रणशिंग फुंकू तेव्हा तुम्हीही तसेच करा नंतर “परमेश्वराचा जय असो, गिदोनचा जय असो’ अशी गर्जना करा.”
19 त्याप्रमाणे गिदोन आणि त्याच्या बरोबर शंभरजण शत्रूच्या शिबिरापर्यंत गेले. ते पोहोंचले तेव्हा नुकताच शत्रूपक्षाने पहारा बदलला होता. रात्रीचा तो मधला प्रहर होता. गिदोन आणि त्याच्या बरोबरचे लोक यांनी आपली रणशिंगे फुंकली आणि घडे फोडले.
20 त्याबरोबर तीनही गटातील लोकांनीही तसेच केले. त्यांच्या डाव्या हातात मशाली आणि उजव्या हातात रणशिंगे होती. ती फुंकत ते “परमेश्वराची तलवार, गिदोनची तलवार” अशा आरोव्व्या मारत होते.
21 गिदोनची माणसे होती तेथेच थांबली. पण आत मिद्यानी लोकांच्या तळावर पळापळ सुरु झाली.
22 ही तीनशे माणसे रणवाद्ये वाजवत असताना, परमेश्वराने मिद्यानी लोकांना एकमेकांना तलवारीने ठार मारायला लावले. त्यांनी पळ काढला.सरेरा कडे बेथ-शिट्टा आणि टब्बाथ जवळच्या आबेल महोल नगराच्या सीमेपर्यंत हे शत्रूसैन्य पळून गेले.
23 मग नफताली, आशेर आणि मनश्शे यांच्या वंशातील सैनिकांना मिद्यानी लोकांचा पाठलाग करायला सांगितले गेले.
24 एफ्राईमच्या डोंगराळ भागात गिदोनने सर्वत्र आपले दूत पाठवले. निरोप असा होता “खाली या आणि मिद्यान्यांवर हल्ला करा. बेथ-बारा आणि यार्देन नदीपर्यंतचा प्रदेश रोखून धरा. मिद्यानी लोकांना निसटू देऊ नका.”तेव्हा एफ्राईमच्या वंशातील लोकांना त्यांनी बोलावले. त्यांनी बेथ-बारापर्यंत नदीलगतच्या प्रदेशाचा ताबा घेतला.
25 एफ्राईम लोकांनी दोन मिद्यानी नेत्यांना पकडले, ओरेब आणि जेब हे दोन नेते होत. ओरेबचा खडक या ठिकाणापाशी त्यांनी ओरेबला मारले. जेबला जेबचे द्राक्षकुंड येथे मारले. एफ्राईम लोकांनी मिद्यान्याचा पाठलाग सुरुच ठेवला. ओरेब आणि जेब यांची मुंडकी त्यांनी गिदोनला दाखवायला नेली. यार्देन नदीपलीकडे गिदोन होता.