शास्ते

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21

धडा 12

1 एफ्राइमच्या लोकांनी सैन्याची जमवाजमव केली आणि नदी ओलांडून ते साफोन येथे गेले. ते इफ्ताहला म्हणाले, “अम्मोन्यांशी लढायला गेलास तेव्हा तू आम्हाला मदतीसाठी का बोलावले नाहीस? आता आम्ही तुझ्यासकट तुझ्या घराला आग लावतो.”
2 इफ्ताह म्हणाला, “अम्मोनी लोक आपल्याला वरचेवर त्रास देत होते. म्हणून मी माझ्या सैन्यासह त्यांच्यावर चालून गेलो. तेव्हा मी तुम्हाला बोलावले होते पण तुम्ही कुमक पाठवली नाही.
3 तुमची मदत मिळण्याची चिन्हे दिसेनात तेव्हा मी माझा जीव धोक्यात घातला. नदी उतरुन मी अम्मोन्यांशी लढायला गेलो. त्यांना नेस्तनाबूत करण्यात परमेश्वराचे मला साहाय्य झाले. आता तुम्ही आज माझ्याशी लढायला का आला आहात?”
4 मग इफ्ताहने गिलादमधील लोकांना एकत्र केले. त्यांनी एफ्राईमशी युध्द केले. ते युध्दात उतरले कारण एफ्राईम लोकांनी गिलादांचा अपमान केला होता. ते म्हणाले होते, “गिलादांनो, तुम्ही म्हणजे एफ्राईमांनी जीवदान दिलेले पळपुटे आहात. तुम्हाला स्वत:चा प्रदेश सुध्दा नाही. तुमच्यातील काही भाग एफ्राईमांचा तर काही मनश्शेचा आहे.” गिलादांनी एफ्राईमांचा पराभव केला.
5 एफ्राईम देशाकडे जाणारे यार्देन नदीचे उतार गिलादांनी ताब्यात घेतले. कोणीही जिवंत राहिलेला एफ्राईम माणूस आला आणि नदी ओलांडून जाऊ देण्याची विनंती करायला लागला की गिलाद विचारत, “तू एफ्राईमचा आहेस का?” तो म्हणे, “नाही”
6 मग ते त्याला “शिब्बोलेथ” हा शब्द उच्चारायला सांगत. एफ्राईम लोकांना तो नीट म्हणता येत नसे. तो म्हणे, “सिब्बोलेथ” तेव्हा हा माणूस एफ्राईम असलेयाचे त्यांच्या ध्यानात येई. नदीच्या उतारापाशी त्याला मारून टाकत. अशाप्रकारे त्यांनी बेचाळीस हजार एफ्राईम माणसे मारली.
7 इफ्ताह सहा वर्षे इस्राएल लोकांचा न्यायाधीश होता. त्याचे निधन झाल्यावर गिलादमधील त्याच्या गावी त्याचे दफन करण्यात आले.
8 मग बेथलहेममधील इब्सान याने न्यायाधीश म्हणून इस्राएल लोकांचे काम पाहिले.
9 त्याला तीस मुलगे आणि तीस मुली होत्या त्याने आपल्या तीसही मुलींना गोत्राबाहेर लग्ने जमवण्यास सांगितले आणि सर्व मुलांसाठी तशाच बाहेरच्या मुली केल्या. इब्सान सात वर्षे न्यायाधीश होता.
10 त्याच्या निधनानंतर बेथलहेममध्थे त्याचे दफन करण्यात आले.
11 त्यानंतर जबुलून वंशातील एलोन इस्राएलांचा न्यायाधीश झाला. तो त्या जागी दहा वर्षे होता.
12 मग तो वारला तेव्हा जबुलूनमधील अयालोन येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
13 एलोन नंतर हिल्लेलचा मुलगा अब्दोन न्यायाधीश झाला तो पिराथोनचा होता.
14 त्याला चाळीस मुलगे आणि तीस नातू होते. ते सत्तर गाढवांवर स्वार होत. अब्दोन आठ वर्षे इस्राएलांचा न्यायाधीश होता.
15 पुढे त्याच्या मृत्यूनंतर पिराथोन येथे त्याला पुरण्यात आले. एफ्राइम प्रांतातील अमालेक्यांच्या डोंगराळ प्रदेशात पिराथोन हे ठिकाण आहे.