अनुवाद
धडा 23
1 “जो भग्नांड किंवा छिन्नेंद्रिय आहे त्याला परमेश्वराच्या उपासनेत सहभागी होण्यास मनाई आहे.
2 ज्यांच्या आईवडीलांचा रीतसर विवाह झालेला नाही त्यानेही उपासनेत सहभागी होऊ नये. त्याच्या दहाव्या पिढीपर्यंत ही मनाई आहे.
3 “अम्मोनी आणि मवाबी यांनी व त्यांच्या पुढच्या दहा पिढ्यांनीही इस्राएलांबरोबर उपासनेत सामील होवू नये.
4 कारण तुमच्या मिसरपासूनच्या प्रवासात तुम्हाला अन्नपाणी देण्यास त्यांनी नकार दिला होता. तसेच बलामला पैसे चारुन त्यांनी त्याला तुम्हांला शाप द्यायला लावले. (मेसोपोटेमियातील पथोर नगरामधला बौर याचा बलाम हा मुलगा.)
5 तुमचा देव परमेश्वर ह्याने मात्र बलामचे ऐकले नाही. उलट त्या शापाचे रुपांतर आशीर्वादात केले. कारण तुमचा देव परमेश्वर याचा तुमच्यावर लोभ आहे.
6 या अम्मोनी किंवा मवाबी लोकांबरोबर कधीही सलोखा करु नका. तुम्ही जिवंत असेपर्यंत त्यांच्याशी मैत्री करु नका.
7 “अदोमी लोकांचा कधीही तिरस्कार करु नका. कारण ते तुमचे आप्त आहेत. तसेच मिसरींचा द्वेष करु नका. कारण त्यांच्या देशात तुम्ही उपरे होतात.
8 अदोमी आणि मिसरी यांच्या तिसऱ्या पिढीपासूनच्या लोकांना इस्राएलांबरोबर परमेश्वराच्या प्रार्थनेत सहभागी व्हायला हरकत नाही.
9 “युद्धावर छावणीत असताना जे जे म्हणून अशुद्धकारक त्यापासून दूर राहा.
10 एखाद्याला रात्री स्वप्नावस्था झाल्यास त्याने छावणीच्या बाहेर जावे. छावणीत राहू नये.
11 मग संध्याकाळी स्नान करावे. आणि सूर्यास्त झाल्यावरच परत छावणीत यावे.
12 “प्रातर्विधींसाठी छावणीच्या बाहेर एक जागा असावी.
13 आपल्या शस्त्रास्त्रांबरोबरच खणण्यासाठी म्हणून एक कुदळ असावी. प्रातर्विधीस बसण्यापूर्वी एक खड्डा खणावा व विधी आटोपल्यावर त्यावर माती पसरुन तो झाकून टाकावा.
14 कारण तुमच्या संरक्षणासाठी आणि तुमच्याहातून शत्रूचा पराभव करण्यासाठी तुमचा देव परमेश्वर तुमच्या बरोबरच राहणार आहे. तेव्हा छावणी पवित्र असावी. नाहीतर काही किळसवाण्या गोष्टी पाहून तो तुम्हांला सोडून जायचा.
15 “एखादा गुलाम कधी त्याच्या मालकाकडून पळून जाऊन तुमच्याकडे आला तर त्याला मालकाच्या स्वाधीन करु नका.
16 त्याला तुमच्या वेशीमध्ये हव्या त्या गावात राहू द्या. त्याला जाच करु नका.
17 “इस्राएलच्या स्त्रीपुरुषांपैकी कोणीही देवळातील वेश्या होऊ नये.
18 पुरुष किंवा स्त्रीवेश्येच्या कमाईचा पैसा तुमचा देव परमेश्वर ह्याच्या पवित्र निवासस्थानी, नवस फेडण्याच्या कामासाठी वापरला जाणार नाही याची दक्षात घ्या. कारण तुमचा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने अशा व्यक्ती तिरस्करणीय आहेत.
19 “आपल्या इस्राएल बांधवांपैकी कोणाला काही उसने दिल्यास त्यावर व्याज लावू नका. पैसा, अन्नधान्य किंवा कोणत्याही व्याजी लावता येण्यासारख्या गोष्टीवर व्याज आकारु नका.
20 परक्याकडून व्याज घेतले तरी चालेल. पण आपल्याच बांधवाला व्याज लावू नका. हे नियम पाळलेत तर, ज्या प्रदेशात तुम्ही राहणार आहात तेथे हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात तुम्हांला तुमचा देव परमेश्वर ह्याचा आशीर्वाद मिळेल.
21 “तुमचा देव परमेश्वर ह्याला नवस बोललात तर तो फेडायला उशीर करु नका. कारण तुमचा देव परमेश्वर तुम्हाला त्याचा जाब विचारील. नवस फेडला नाहीत तर पाप लागेल.
22 पण नवस बोललाच नाहीत तर पाप लागणार नाही.
23 जे वचन तुम्ही देता ते पाळत जा. देव काही तुम्हाला ‘नवस बोला’ असे म्हणत नाही. तुम्ही स्वखुशीने तो बोलता तेव्हा त्याप्रमाणे वागा.
24 “दुसऱ्याच्या द्राक्षमळ्यातून जात असताना वाटल्यास हवी तितकी द्राक्षे खा पण टोपलीत घालून बरोबर घेऊन जाऊ नका.
25 कोणाच्या शेतातून जाताना धान्याची कणसे खुडून खाऊ शकता पण विळ्याने कापून नेऊ नका.