अनुवाद

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34

धडा 10

1 “तेव्हा हुबेहूब पहिल्यासारख्या दोन सपाट दगडी पाट्या परमेश्वराने मला घडवायला सांगितल्या. ‘त्या घेऊन माझ्याकडे डोंगरावर ये आणि एक लाकडी पेटीही कर’ असे ही सांगितले.
2 तो पुढे म्हणाला, ‘तू फोडून टाकलेल्या पाट्यांवर होता तोच मजकूर मी या पाट्यांवर लिहीन मग तू या नवीन पाट्या पेटीत ठेव.’
3 “मग मी बाभळीच्या लाकडाची पेटी केली. पहिल्यासारख्याच दोन दगडी पाट्या केल्या आणि डोंगरावर गेलो. पाट्या माझ्या हातातच होत्या.
4 मग, डोंगरावर सर्व जमले होते तेव्हा ज्या दहा आज्ञा परमेश्वराने अग्नीतून तुम्हाला दिल्या त्याच त्याने पहिल्या लेखाप्रमाणे या पाट्यांवर लिहिल्या आणि त्या माझ्या स्वाधीन केल्या.
5 मी डोंगर उतरुन खाली आलो. त्या पाट्या मी केलेल्या पेटीत ठेवल्या. त्या तशा ठेवायला मला परमेश्वराने सांगितले होते. आणि अजूनही त्या तिथे आहेत.”
6 इस्राएल लोक प्रवास करत बनेयाकान विहिरींवरुन मोसेरा येथे आले. तेथे अहरोन मरण पावला. त्याला तेथेच दफन केले. त्याच्या जागी त्याचा मुलगा एलाजार याजकाचे काम करु लागला.
7 इस्राएल लोक मग मोसेराहून गुदगोधा येथे आणि तेथून पुढे थाटबाधा या नद्यांच्या प्रदेशात आले.
8 त्यावेळी परमेश्वराने एका खास कामगिरीसाठी लेवीचा वंश इतरांपेक्षा वेगळा केला. परमेश्वराच्या आज्ञापटाची ती पेटी वाहून नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. याजक म्हणून परमेश्वराची सेवा करणे, परमेश्वराच्या वतीने लोकांना आशीर्वाद देणे ही त्यांची कामे होती. ती ते अजूनही करतात.
9 त्यामुळेच लेवींना इतरांसारखा जमिनीत वाटा मिळाला नाही. परमेश्वराने कबूल केल्याप्रमाणे त्यांची मालमत्ता म्हणजे खुद्द परमेश्वरच आहे.)
10 “मी पहिल्यावेळेप्रमाणेच चाळीस दिवस आणि रात्र डोंगरावर राहिलो. याहीवेळी परमेश्वराने माझे ऐकले व तुमचा नाश न करायचे ठरविले.
11 त्याने मला सांगितले, ‘ऊठ आणि लोकांना पुढच्या प्रवासाला घेऊन जा. म्हणजे मी त्यांच्या पूर्वजांना जो प्रदेश द्यायचे वचन दिले तेथे ते जाऊन राहतील.’
12 “आता, हे इस्राएल लोकांहो तुमच्या परमेश्वराची तुमच्याकडून काय अपेक्षा आहे ते आता ऐका. परमेश्वराची अशी इच्छा आहे की तुम्ही त्याचा मान राखावा आणि तो म्हणतो त्याप्रमाणे करावे तुम्ही त्याच्यावर प्रेम करावे आणि संपूर्ण अंत:करणाने व जीवाने त्याची सेवा करावी.
13 तेव्हा तुमच्या भल्यासाठीच मी आज परमेश्वराचे नियम आणि आज्ञा सांगतो, ते ऐका व पाळा.
14 “सर्वकाही तुमचा देव परमेश्वर ह्याचे आहे. आकाश, आकाशापलीकडचे आकाश, पृथ्वी व पृथ्वीवरचे सर्व काही परमेश्वर देवाचे आहे.
15 त्याचे तुमच्या पूर्वजांवर फार प्रेम होते. त्या प्रेमाखातर त्याने इतरांना वगळून तुम्हांला आपले मानले. आजही वस्तूस्थिती तीच आहे.
16 “तेव्हा हट्टीपणा सोडा. आपली अंत:करणे परमेश्वराला द्या.
17 कारण परमेश्वर तुमचा देव आहे तो देवांचा देव व प्रभुंचा प्रभु आहे. तो महान परमेश्वर आहे. तो विस्मयकारी आहे. त्याला सर्व जण सारखेच आहेत. तो पक्षपात करत नाही की लाच घेत नाही. नवीन दगडी पाट्या
18 अनाथांना, विधवांना इतकेच काय शहरात आलेल्या नवख्यांनाही साहाय्य करतो. त्यांना अन्न वस्त्र पुरवतो.
19 म्हणून तुम्ही परक्यांशी प्रेमाने वागले पाहिजे. कारण मिसर देशात तुम्हीही उपरेच होतात.
20 तुम्ही फक्त तुमचा देव परमेश्वर याचीच सेवा करा. त्याच्याबद्दल आदर बाळगा. त्याला धरुन राहा. शपथ वाहाताना त्याच्याच नावाने शपथ घ्या.
21 फक्त परमेश्वराची स्तुती करा. तो तुमचा देव आहे. त्याने केलेले चमत्कार आणि थोर कृत्ये तुम्ही प्रत्यक्ष पाहिली आहेत.
22 तुमचे पूर्वज खाली मिसरमध्ये गेले तेव्हा ते फक्त सत्तरजण होते. आता तुमच्या परमेश्वराच्या कृपेने तुम्ही त्याच्या कितीतरी पट, आकाशातील ताऱ्यांइतके आहात.