गणना

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36

धडा 6

1 परमेश्वर मोशेला म्हणाला,
2 “इस्राएल लोकांस असे सांग की कोणा पुरुषाने किंवा स्त्रीने आपणास इतरापासून वेगळे होऊन काही काळपर्यंत पूर्णपणे परमेश्वरास वाहून घ्यावयाचा नवस केला तर त्याने किंवा तिने सर्वकाळ परमेश्वराच्या सेवेसाठी वाहून घ्यावे. त्यांना नाजीर म्हणावे.
3 त्या काळात नाजीराने द्राक्षारस किंवा मद्य पिऊ नये; द्राक्षारसाचा किंवा कडक मद्याचा शिरकाही पिऊ नये; द्राक्षाचा कसलाही रस पिऊ नये; तसेच ताजी किंवा सुकी द्राक्षेही खाऊ नयेत.
4 त्या वेगळेपणाच्या विशेष काळात त्याने द्राक्षापासून बनविलेला कोणताच पदार्थ खाऊ नये. एवढेच नव्हे तर त्याने द्राक्षाच्या बिया किंवा द्राक्षाचे सालपट देखील खाऊ नये.
5 स्वत:ला वेगळे केलेल्या त्या काळात नाजीराने आपले केस कापू नयेत. त्याच्या नवसाचा काळ संपेपर्यंत त्याने पवित्र राहावे. त्याने आपले केस लांब वाढू द्यावेत; ते केस त्याने देवाला केलेल्या विशेष नवसाची खूण आहे. स्वत:ला वाहवून घेतलेल्या नवसाचा काळ संपेपर्यंत त्याने आपले केस लांब वाढू द्यावेत.
6 “वेगळेपणाच्या त्या काळात नाजीराने परमेश्वराला वाहून घेतल्यामुळे प्रेताजवळ जाऊ नये.
7 त्याचा स्वत:चा बाप, आई, भाऊ किंवा बहीण ह्यातून कोणी मरण पावल्यास त्याने त्यांनाही शिवू नये; तो शिवेल तर तो अपवित्र होईल. आपण पूर्णपणे परमेश्वराच्या सेवेसाठी स्वत:ला वेगळे केले आहे, हे त्याने दाखवावे
8 व वेगळे राहाण्याचा पूर्णकाल त्याने परमेश्वराला संपूर्णपणे वाहून घ्यावे. तोपर्यंत त्याने परमेश्वराचीच सेवा करावी.
9 “एखाद्या वेळी असे होईल की नाजीराबरोबर असलेला एखादा माणूस एकाएकी मरण पावला; आणि जर नाजीराने त्याला स्पर्श केला तर तो अशुद्ध होईल जर असे झाले तर नाजीराने आपल्या नवसाची खूण असलेल्या आपल्या डोक्याचा केसांचे मुंडण करावे. ते मुंडण त्याने सातव्या दिवशी करावे कारण त्या दिवशी तो पवित्र होईल.
10 आठव्या दिवशी त्याने दोन होले किंवा पारव्याची दोन पिले आणून दर्शनमंडपाच्या दारापाशी ती याजकाला द्यावीत.
11 मग याजकाने एकाचा पापार्पण म्हणून व दुसऱ्याचा होमार्पण करावा. हे पापार्पण म्हणजे त्याच्या पापाबद्दलचे प्रायश्चित होय; कारण तो प्रेताजवळ गेला होता. त्याचवेळी त्या नाजीराने पुन्हा नव्याने देवाची सेवा करण्यासाठी विशेष नवस म्हणून आपल्या डोक्याचे केस देवाला अर्पण करावेत.
12 याचा अर्थ त्या माणसाने परमेश्वराच्या सेवेसाठी वेगळे होण्यासाठी स्वत:ला परमेश्वराला द्यावे. त्याने एक वर्षाचा मेंढा दोषार्पणासाठी आणून द्यावा. तरी पण त्याचे नाजीरपणाचे आधीचे दिवस वाया जातील. त्याने आता नव्याने नवस करुन नाजीरपणाचा वेगळा वेळ द्यावा कारण नाजीरपणाच्या पहिल्या काळात त्याचा प्रेताला स्पर्श झाला होता.
13 “मग त्याच्या नाजीरपणाच्या नवसाचे दिवस पूर्ण झाल्यावर त्याने दर्शनमंडपाच्या दारापाशी जावे.
14 तेथे त्याने पुढीलप्रमाणे अर्पणे करावीत.त्याने एक वर्षाचा निर्दोष मेंढा होमबली म्हणून आणावा: एक वर्षाची निर्दोष मेंढी पापबली म्हणून आणावी; आणि शांत्यार्पणासाठी एक दोषहीन मेंढा आणावा.
15 एक टोपलीभर बेखमीर भाकरी म्हणजे तेलात मळलेल्या मैद्याच्या पोळ्या व वरुन तेल लाविलेल्या चपात्या त्याच प्रमाणे त्या बरोबर अर्पणाचा भाग म्हणून अन्नार्पणे व पेयार्पणे आणावीत.
16 “मग ही सर्व अर्पणे याजकाने परमेश्वराला अर्पण करावीत; त्याने पापबली व होमबली परमेश्वराला अर्पावेत;
17 तशीच बेखमीर भाकरीची टोपलीही परमेश्वराला अर्पण करावी; मग शांत्यार्पणासाठी परमेश्वराकरिता मेंढा अर्पावा व त्या बरोबरचे अन्नार्पण व पेयार्पण अर्पण करावे.
18 “मग नाजीराने निवास मंडपाच्या दारापाशी जावे; तेथे त्याने परमेश्वरासाठी नवस म्हणून वाठविलेल्या आपल्या केसाचे मुंडण करावे. ते केस त्याने शांत्यापर्णाच्या खाली असलेल्या जाळावर टाकावेत.
19 “नाजीराने आपल्या केसाचे मुंडण केल्यावर याजकाने त्याला मेंढ्याचा शिजविलेला फरा व टोपलीतून एक बेखमीर पोळी व एक बेखमीर चपाती द्यावी.
20 मग याजकाने ते ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वरासमोर ओवाळावे. हे सर्व पदार्थ पवित्र आहेत व ते याजकासाठी आहेत. त्याच प्रमाणे मेंढ्याचे ऊर व मांडीही परमेश्वरासमोर ओवाळावी; हे सर्व पदार्थ पवित्र आहेत व ते याजकासाठी आहेत. त्या नंतर नाजीर झालेला होता तो माणूस द्राक्षारस पिण्यास मोकळा आहे.
21 “जर एखादा माणूस नाजीर होऊन परमेश्वराची सेवा करण्यास वेगळा होण्याचा नवस करावयाचे ठरवील तर त्याने ही सर्व अर्पणे परमेश्वरासाठी अवश्य द्यावीत; पण एखादा माणूस ह्याही पेक्षा अधिक अर्पणे देऊ शकत असेल व जर त्याने काही अधिक द्यावयाची शपथ घेतली असेल तर मग त्याने आपली शपथ पूर्ण करावी. नाजीर होण्याच्या नवसाची शपथ घेण्याविषयी हा नियम आहे.”
22 परमेश्वर मोशेला म्हणाला,
23 “अहरोन व त्याच्या मुलांना इस्राएल लोकांना ह्याप्रमाणे आशीर्वाद देण्यास सांग; त्यांनी म्हणावे:
24 परमेश्वर तुला आशीर्वाद देवो व तुझे संरक्षण करो;
25 परमेश्वर आपला मुख प्रकाश तुजवर पाडो व तुजवर दया करो;
26 परमेश्वर आपले मुख तुजकडे करो व तुला शांति देवो.”
27 मग परमेश्वर म्हणाला, “इस्राएल लोकांना आशीर्वाद देताना अहरोन व त्याच्या मुलांनी अशा प्रकारे माझ्या नांवाचा उपयोग करावा; म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन.”