गणना
धडा 10
1 परमेश्वर मोशेला म्हणाला,
2 “चांदीचे दोन घडीव कर्णे बनव. लोकांना एकत्र जमविण्यासाठी आणि तळ कधी हलवावा हे सांगण्यासाठी त्यांचा उपयोग होईल.
3 तू जर दोन्ही कर्णे बराच वेळपर्यंत वाजविले तर मग सर्व लोकांनी दर्शन मंडपासमोरील अंगणात जमावे.
4 परंतु बराच वेळ एकच कर्णा वाजविला तर मग फकत इस्राएलांच्या बारा वंशाच्या प्रमुखांनीच तुला भेटावयास यावे.
5 “कर्ण्यांचा थोडा गजर झाला म्हणजे लोकांनी आपला तळ हलवावा हे सांगण्याचा तो एक मार्ग होईल. पहिल्याच वेळी जेव्हा तू कर्ण्याचा थोडा गजर करशील तेव्हा दर्शनमंडपाच्या पूर्वेकडील छावण्यातील वंशानी पुढे चालण्यास सुरवात करावी.
6 दुसऱ्या वेळी थोडाच वेळ तू कर्णा वाजवशील तेव्हा दक्षिणेकडील छावण्यातील वंशानी पुढे निघण्यास सुरवात करावी.
7 परंतु विशेष कारणासाठी मंडळी एकत्र जमावावयाची असेल तर कर्णे वेगळ्या प्रकारे म्हणजे एकाच सरळ सारख्याच सुरात वाजवावेत.
8 फकत अहरोनाच्या याजक असलेल्या मुलांनीच कर्णे वाजवावीत. तुम्हाला पिढ्यान्पिढ्याचा कायमचा विधीनियम आहे.
9 “जर तुम्ही तुमच्या देशातच शत्रूशी लढत असाल, तर त्यांच्याशी लढावयास जाण्यापूर्वी तुम्ही मोठमोठ्याने कर्णे वाजवावेत. परमेश्वर तुमचा कर्ण्यांचा आवाज ऐकेल आणि तो तुमच्या शत्रूपासून तुमचे रक्षण करील.
10 तसेच तुम्ही सणाच्या व इतर आनंदाच्या प्रसंगी व नवीन चंद्राच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी किंवा महिन्याच्या पहिल्या दिवशी-तुमची होमार्पणे, शांत्यार्पणे वाहताना तुम्ही कर्णे वाजवावेत; तुमच्या परमेश्वराला तुमची आठवण करुन देण्याचा हा एक विशेष मार्गच आहे; हे तुम्ही करावे अशी मी तुम्हास आज्ञा देतो. मी तुमचा देव परमेश्वर आहे.”
11 इस्राएल लोकांनी मिसर देश सोडल्यानंतर दुसऱ्या वर्षी दुसऱ्या महिन्याच्या विसाव्या दिवशी कराराचा कोश असलेल्या पवित्र निवास मंडपावरील ढग वर गेला.
12 तेव्हा इस्राएल लोकांनी आपला प्रवास सुरू केला. त्यांनी सीनायचे रान सोडले आणि ढग पारानाच्या रानात थांवेपर्यंत ते प्रवासकरीत गेले.
13 छावणी हलवण्याची इस्राएल लोकांची ही पहिलीच वेळ होती. परमेश्वराने त्यांना मोशेकडून दिलेल्या आज्ञेप्रमाणे त्यांनी हे केले.
14 यहुदाच्या छावणीतील तीन गट पहिल्याने निघाले. त्यांच्या निशाणा मागे ते चालले. पहिला गट यहुदाच्या कुळाचा होता. अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन त्यांचा सेनानायक होता.
15 त्यानंतर इस्साखारचे कूळ निघाले. सुवाराचा मुलगा नथनेल त्यांचा नेता होता.
16 आणि मग जबुलूनाचे कूळ निघाले. हेलोनाचा मुलगा अलीयाब त्यांचा नेता होता.
17 मग पवित्र निवास मंडप उतरविण्यात आला आणि गेर्षोन व मरारी वंशाचे लोक पवित्र निवास मंडप घेऊन निघाले. तेव्हा ह्या वंशाचे लोक नंतरच्या रांगते होते.
18 त्यानंतर रऊबेन वंशाच्या छावणीतील तीन गट निघाले. लोक त्यांच्या निशानामागे चालले होते. त्यातील पहिला गट रऊबेन कुळाचा होता. शदेयुराचा मुलगा अलीसूर त्यांचा सेनानायक होता.
19 त्यानंतर शिमोन कुळाचे लोक निघाले. सुरीशदैचा मुलगा शलूमीयेल हा त्यांचा सेनानायक होता.
20 नंतर गाद वंशाच्या दलाचे लोक निघाले. रगुवेलाचा मुलगा एल्यासाप त्यांचा सेनानायक होता.
21 मग कहाथी लोक पवित्र स्थानातील पवित्र वस्तू घेऊन निघाले. ते अशावेळी जाऊन पोहोंचले की त्यांच्या येण्याओगोदर इतर लोकांनी पवित्र निवास मंडप उभा करुन तयार ठेवला होता.
22 त्यानंतर एफ्राइम वंशाच्या छावणीतील तीन गट निघाले. लोक त्यांच्या निशाणामागे चालले होते. त्यात पहिला गट एफ्राइम कुळाचा होता. अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा त्यांचा सेनानायक होता.
23 त्यानंतर मनश्शे कुळाचे लोक निघाले. पदाहसुराचा मुलगा गमलीयेल त्यांचा सेनानायक होता.
24 मग बन्यामीन कुळाचे लोक निघाले. गिदोनीचा मुलगा अबीदान त्यांचा सेनानायक होता.
25 छावण्यांच्या रागेतील सर्वात शेवटची तीन दले दान वंशाची होती. ती पुढे गेलेल्या दलांचे संरक्षण करणारी पिछाडीची तुकडी होती. तिच्यात पहिले दान कुळाचे लोक होते. ते त्यांच्या निशाणामागे चालले होते. अम्मीशद्दैचा मुलगा अहीएजर त्यांचा सेनानायक होता.
26 त्यानंतर आशेर कुळाचे लोक निघाले. आक्रानाचा मुलगा पगीयेल त्यांचा सेनानायक होता.
27 मग नफताली कुळाचे लोक निघाले. एनानाचा मुलगा अहीरा त्यांचा सेनानायक होता.
28 इस्राएल लोक ठिक ठिकाणाहून प्रवास करिताना ह्या क्रमाने निघत.
29 मोशेचा सासरा रगुवेल ह्याचा मुलगा होबाब ह्याला मोशे म्हणाला, “देवाने आम्हाला वचन दिलेल्या देशात आम्ही जात आहोत. तू आमच्याबरोबर चल. आम्ही तुझ्याशी चांगले वागू; इस्राएल लोकांना उत्तम गोष्टी देण्याचे परमेश्वराने वचन दिले आहे.”
30 परंतु होबाबाने उत्तर दिले, “नाही, मी तुमच्याबरोबर येणार नाही. मला माझ्या देशात व माझ्या लोकात परत गेले पाहिजे.”
31 मग मोशे त्याला म्हणाला, “मी विनंती करितो की तू आम्हाला सोडून जाऊ नको; कारण ह्या रानाची आमच्यापेक्षा तुला अधिक माहिती आहे. तू आमचा वाटाड्या होऊ शकतोस.
32 तू आमच्याबरोबर येशील तर परमेश्वर आम्हाला ज्या ज्या चांगल्या गोष्टी देईल त्यात आम्ही तुला वाटा देऊ.”
33 मग होबाब मान्य झाला. आणि परमेश्वराच्या पर्वतापासून ते प्रवास करीत निघाले. याजकांनी परमेश्वराचा पवित्र कराराचा कोश घेतला व ते लोकांच्यापुढे चालले. मुक्कामासाठी जागा शोधताना तीन दिवस तो पवित्र कोश त्यांनी वाहिला.
34 प्रत्येक दिवशी परमेश्वराचा ढग त्यांच्यावर राहून त्यांना मार्ग दाखवीत असे.
35 लोक जेव्हा पवित्र कराराचा कोश उचलून मुक्काम हलवीत तेव्हा मोशे म्हणत असे,“हे परमेश्वरा, ऊठ तुझ्या शत्रूंची सर्व दिशांना पांगापांग होवो, तुझे सर्व शत्रू तुजपासून पळून जावोत.”
36 आणि जेव्हा पवित्र कराराचा कोश त्याच्या जागी ठेवला जाई तेव्हा मोशे म्हणत असे,“हे परमेश्वरा, इस्राएलाच्या लाखो लोकांकडे परत ये.”