2 तीमथ्थाला

1 2 3 4

धडा 3

1 हे लक्षात ठेव: शेवटच्या दिवसांत कठीण समय आपल्यावर येतील.
2 लोक स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, शिव्याशाप देणारे, आईवडिलांची आज्ञा न मानणारे, कृतघ्र, अधार्मिक
3 इतरांवर प्रीती नसणारे, क्षमा न करणारे, चहाडखोर, मोकाट सुटलेले, क्रूर, चांगल्याच्या विरुद्ध असले.
4 विश्वासघातकी, उतावीळ, गर्वाने फुगले, देवावर प्रेम करण्यापेक्षा चैनीची अधिक आवड धरणारे असे होतील;
5 ते देवाच्या सेवेचे बाहेरचे स्वरूप चांगले राखतील, परंतु त्याचे सामर्थ्य नाकारतील. त्यांच्यापासून नेहमी दूर राहा.
6 मी हे म्हणतो कारण त्यांच्यांपैकी काही घरात शिरकाव करतात व पापाने भरलेल्या, सर्व प्रकारच्या वासनांनी बहकलेल्या, कमकुवत स्त्रियांवर ताबा मिळवितात.
7 अशा स्त्रिया नेहमी शिकण्याचा प्रयत्न करतात. पण सत्याच्या पूर्ण ज्ञानापर्यंत त्या कधीही जाऊ शकत नाहीत.
8 यान्रेस व यांब्रेस यांनी जसा मोशेला विरोध केला तसा ही माणसे सत्याला विरोध करतात. ज्यांची मने भ्रष्ट आहेत व सत्य अनुसरण्यात अयशस्वी ठरलेली अशी ही माणसे आहेत.
9 ते पुढे अधिक प्रगती करणार नाहीत. कारण जसा यान्रेस व यांब्रेस यांचा मूर्खपणा प्रकट झाला तसा यांचा मूर्खपणा सर्वांना प्रकट होईल.
10 तरीही तू माझी शिकवण, वागणूक, जीवनातील माझे ध्येय, माझा विश्वास, माझा धीर, माझी प्रीति, माझी सहनशीलता ही पाळली आहेस.
11 अंत्युखिया, इकुन्या, आणि लुस्त्र येथे ज्या गोष्टी माझ्या बाबतीत घडल्या, जो भयंकर छळ मीसोसला ते माझे दु:ख तुला माहीत आहे! परंतु प्रभूने या सर्व त्रासांपासून मला सोडविले.
12 खरे पाहता, जे जे ख्रिस्त येशूमध्ये शुद्ध जीवन जगू इच्छितात, त्या सर्वांचा छळ होईल.
13 पण दुष्ट लोक व भोंदू लोक इतरांना वरचेवर फसवीत राहतील आणि स्वत:ही फसून अधिक वाईटाकडे जातील.
14 पण तुझ्या बाबतीत, ज्या गोष्टी तू शिकलास व ज्याविषयी तुझी खात्री झाली आहे त्या तू तशाच पुढे चालू ठेव. ती सत्ये ज्या कोणापासून तू शिकलास ते तुला ठाऊक आहे. तू त्यांच्यावर विश्वास ठेवू शकतोस.
15 तुला माहीत आहे की, तू आपल्या अतिबाल्यावस्थेत असल्यापासूनच तुला पवित्र शास्त्र वचनांची माहिती आहे. त्यांच्या ठायी तुला शहाणे बनविण्याचे व तारणाकडे घेऊन जाण्याचे सामर्थ्य आहे. ते तुला तारणाकडे नेण्यासाठी लागणारे ज्ञान देण्यास समर्थ आहे.
16 प्रत्येक शास्त्रलेख देवाच्या प्रेरणेने लिहिला असल्यामुळे तो सत्य समजण्यास, वाईटाचा निषेध करण्यास, चुका सुधारण्यास व योग्य जीवन जगण्याचे मार्गदर्शन करण्यास उपयुक्त आहे.
17 यासाठी की, देवाचा माणूस प्रवीण होऊन पूर्णपणे प्रत्येक चागंल्या कामासाठी सज्ज व्हावा.