2 थेस्सलनीकाकरांस

1 2 3

धडा 2

1 आता बंधूंनो, आम्ही तुम्हांला विनंति करतो, ती प्रभु येशू ख्रिस्ताच्या येण्याविषयी, आणि त्याच्याबरोबर आमच्या एकत्र भेटण्याविषयी.
2 आम्ही तुम्हांला विनंती करतो की, तुम्ही तुमचे मन पूर्णपणे अस्वस्थ होऊ देऊ नका किंवा सतत विचलित होऊ नका, जर तुम्ही ऐकले की, प्रभूचा दिवस आला आहे, काही लोक अशा प्रकारचे भविष्य वर्तवतील. किंवा काही लोक शिकवणुकीद्वारे किंवा काही लोक आम्हांकडून पत्र लिहिले आहे असे भासवून असा दावा करतील.
3 तर कोणीही तुम्हाला कोणत्याही प्रकारे फसवू नये. म्हणून सावध असा. मी असे म्हणतो कारण पहिल्यांदा मोठी बंडखोरी झाल्याशिवाय प्रभूचा दिवस येणार नाही. आणि जो नाशासाठी नेमला आहे, तो नियम मोडणारा प्रकट होईल.
4 तो विरोध करील आणि स्वत:ला सर्व गोष्टींच्या वर उच्च करील. त्याला देव किंवा उपासना करण्याची कोणतीही एखादी वस्तु असे म्हणतील. येथपर्यंत की तो देवाच्या मंदिरात जाईल आणि सिंहासनावर बसेल आणि तो स्वत:ला देव असे जाहीर करील.
5 मी तुमच्याबरोबरच होतो तेव्हा तुम्हाला मी ह्या गोष्टींबद्दल सांगत होतो. ते तुम्हाला आठवत नाही काय?
6 आणि म्हणून अशा प्रकारे त्याला कशाचा प्रतिबंध होत आहे हे तुम्हांला माहीत आहे. यासाठी तो योग्य वेळी प्रकट व्हावा.
7 मी हे म्हणतो कारण दुष्टपणाची रहस्यमय शक्ति आधीपासूनच जगात काम करीत आहे. पण असा एक आहे जो दुष्टाची रहस्यमय शक्ति थोपवीत आहे. आणि जोपर्यंत ती शक्ति मार्गातून काढून बाजूला टाकली जात नाही, तोपर्यंत तो ती शक्ति थोपवून धरील
8 आणि मग दुष्ट प्रकट होईल. प्रभु येशू त्याला आपल्या मुखातील श्वासाने मारुन टाकील आणि प्रभु जेव्हा त्याच्या येण्याच्या वेळी मोठ्या वैभवाने प्रकट होईल तेव्हा तो त्याचा नाश करील.
9 दुष्टाचे येणे सैतानाच्या सामर्थ्याने होईल आणि त्याच्या येण्याबरोबर खोटे चमत्कार, चिन्हे आणि अद्भुत गोष्टी घडतील.
10 आणि जे नरकाच्या वाटेवर आहेत त्यांच्याविरुद्ध प्रत्येक प्रकारची दुष्टता फसवणूक व्हावी म्हणून तो आणील, कारण त्यांनी सत्यावर प्रेम करण्याचे नाकारले. यासाठी की त्यांचे तारण होणे शक्य व्हावे.
11 आणि या कारणासाठी देवाने त्यांना भ्रम पडेल असे केले. यासाठी की, जे खोटे आहे त्यावर त्यांनी विश्वास ठेवावा.
12 आणि त्यांनी सत्यावर विश्वास ठेवला नाही तर दुष्टतेत आनंद मानला, त्यांना शिक्षा मिळावी.
13 पण आम्ही देवाकडे तुमच्याविषयी नेहमीच आभार मानले पाहिजेत. ज्यांच्यावर देव प्रेम करतो असे तुम्ही आमचे बंधु आहात. कारण आत्म्याच्या द्वारे शुद्धीकरण आणि सत्यावर विश्वास ठेवून तारण व्हावे म्हणून देवाने तुम्हाला प्रारंभापासून निवडले आहे.
14 आणि या तारणासाठीच, आम्ही सांगितलेल्या सुवार्तेद्वारेच देवाने तुम्हांला बोलाविले. यासाठी की, आमच्या प्रभु येशू ख्रिस्ताचे जे गौरव ते तुम्हांलाही मिळावे
15 म्हणून बंधूंनो, दृढ उभे राहा. आणि आमच्या तोंडच्या वचनाद्वारे किंवा आमच्या पत्राद्वारे जी परंपरा आम्ही तुम्हाला शिकविली आहे तिला धरुन उभे राहा.
16 आता प्रभु येशू ख्रिस्त स्वत: आणि देव आमचा पिता ज्याने आम्हावर प्रेम केले आणि ज्याने आपल्या कृपेमध्ये आम्हाला अनंतकाळचे समाधान आणि चांगली आशा दिली.
17 ते तुमच्या अंत:करणाला समाधान देवोत व तुम्ही ज्या प्रत्येक चांगल्या गोष्टी करता अथवा सांगता त्यामध्ये तुम्हाला बळकट करो.