1 थेस्सलनीकाकरांस
धडा 3
1 म्हणून, आम्हाला अधिक वाट पाहणे शक्य नसल्याने, आम्ही अथेन्स येथेच राहण्याचे ठरविले.
2 आणि आम्ही तीमथ्याला पाठविले, जो आमचा भाऊ आणि देवाच्या कामाकरीता ख्रिस्ताच्या सुवार्तेची घोषणा करण्याकरीता सहकाही असा आहे, आम्ही त्याला तुम्हाला दृढ करण्यासाठी आणि तुमच्याविषयीच्या विश्वासात तुम्हाला उत्तेजन देण्यासाठी पाठविले आहे.
3 यासाठी की, सध्या होणाऱ्या छळामुळे तुम्ही कोणी अस्वस्थ होऊ नये. कारण तुम्हाला स्वत:लाच माहीत आहे की, यासाठीच आमची दैवी नेमणूक झाली आहे.
4 खरे तर जेव्हा आम्ही तुमच्याबरोबर होतो तेव्हा आम्ही तुम्हांला अगोदरपासूनच सातत्याने सांगत होतो की, आपला छळ होणार आहे आणि तुम्हांला माहीत आहे की, नेमके तसेच घडले आहे.
5 म्हणून मी अधिक काळ वाट पाहू शकत नसल्याने तुमच्या विश्वासाविषयी माहिती करुन घेण्याविषयी तीमथ्याला पाठविले. कारण मोहात टाकणाऱ्याने तुम्हाला मोहात टाकले असेल आणि आमचे श्रम व्यर्थ गेले असतील अशी मला भीति वाटत होती.
6 पण तीमथ्य आताच तुमच्याकडून परत आला आहे. आणि त्याने आम्हांला तुमचा विश्वास व प्रिति याविषयी चांगली बातमी सांगितली आहे. त्याने आम्हाला सांगितले की, तुम्ही नेहमीच आमच्याविषयीच्या चांगल्या आठवणी काढता आणि ज्याप्रमाणे आम्ही तुम्हांला भेटण्यासाठी आतुर झालो आहोत, तसे तुम्हीही झाला आहात.
7 म्हणून आमच्या सर्व अडचणीत व त्रासात बंधूंनो, तुमच्याविषयी आम्ही उत्तेजित झालो याला कारम म्हणजे तुमचा विश्वास.
8 होय आम्हाला माहीत आहे तुम्ही प्रभूमध्ये भक्कमपणे उभे आहात आणि ही गोष्ट आमच्यासाठी जीवनदायी श्वास आहे.
9 तुमच्यामुळे आमच्या देवासमक्ष ज्या सर्व आनंदाचा अनुभव आम्ही घेत आहोत त्याबद्दलचे देवाकडे तुमच्यासाठी आम्ही पुरेसे आभार कसे मानायचे?
10 दिवस आणि रात्र आम्ही कळकळीने प्रार्थना करीत आहोत की, आम्हाला तुमची व्यक्तिश: भेट घेणे शक्य व्हावे आणि अजुनही तुमच्या विश्वासात जी उणीव आहे ती पुरवावी.
11 आता देव स्वत: आमचा पिता आहे आणि आमचा प्रभु येशू ख्रिस्त तो आम्हांला तुमच्याकडे येण्याचा मार्ग दाखवो.
12 प्रभु करो आणि तुम्हाला प्रीतीत वाढवो. आणि भरुन टाको. जसे आम्ही तुम्हावरील प्रेमाने भरभरुन वाहत आहोत तसे तुम्हीही एकमेकासाठी व सर्वांसाठी प्रीतीने भरभरुन वाहावे.
13 यासाठी की, जेव्हा आमचा प्रभु येशू त्याच्या पवित्र जनांसह येतो तेव्हा तो अशा प्रकारे तुमची अंत:करणे बळकट करो आणि त्यांना पवित्रतेने निर्दोष करो.