कलस्सैकरांस
धडा 3
1 म्हणून जसे तुम्हांला ख्रिस्ताबरोबर मेलेल्यामधून उठविले गेले आहे तर, स्वर्गतील म्हणजे ज्या वरील गोष्टी आहेत त्यासाठी प्रयत्न करा. जेथे ख्रिस्त देवाच्या उजव्या हाताला बसलेला आहे.
2 ज्या वरील (स्वर्गातील) गोष्टी आहेत त्याबद्दलचा विचार करा. ज्या गोष्टी पृथ्वीवरच्या आहेत त्यांचा विचार करु नका.
3 कारण तुम्ही मेलेले आहात आणि तुमचे नवे जीवन देवामध्ये ख्रिस्ताबरोबर लपलेले आहे.
4 जेव्हा ख्रिस्त. जो आमचे जीवन आहे. त्याच्या दुसऱ्या येण्याच्या वेळेस प्रगट होईल. तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रकट व्हाल.
5 म्हणून तुमच्यामध्ये पृथ्वीतलावरील जे काही आहे ते सर्व जिवे मारा. जारकर्म, अशुद्धता, लोभ, दुष्ट इच्छा, अधाशीपणा, जी एक प्रकारची मूर्तिपूजा आहे.
6 कारण या गोष्टींमुळे देवाचा राग ओढवणार आहे.
7 तुम्हीसुद्धा असेच जीवन जगत होता जेव्हा तुम्ही अशा गोष्टी करीत होता.
8 पण आता, तुम्ही या सर्व गोष्टी बाजूला केल्या पाहिजेत: राग, क्रोध, दुष्टता, निंदा आणि तुमच्या मुखातील लज्जास्पद बोलणे, या सर्व गोष्टी तुम्ही दूर केल्याच पाहिजेत.
9 एकमेकाशी लबाडी करु नका. कारण तुम्ही जुना मनुष्य त्याच्या कृतीसह काढून टाकला आहे.
10 आणि तुम्ही नवीन मनुष्य धारण केला आहे. हे नवे रुप त्याच्या निर्माणकर्त्याच्या प्रतिमेप्रमाणे सतत नवे होत जाते. यासाठी की या नव्या मनुष्याला देवाचे पूर्ण ज्ञान मिळावे.
11 परिणाम म्हणून यहूदी व विदेशी असा कोणताही फरक नाही. एखाद्याची सुंता झालेला किंवा एखाद्याची सुंता न झालेला, बेताल, व असंस्कृत, गुलाम आणि स्वतंत्र मनुष्य असा कोणताही फरक नाही, पण ख्रिस्त हाच सर्व काही आहे आणि तो सर्व विश्वासाणाऱ्यात आहे.
12 म्हणून, जसे देवाचे निवडलेले लोक जे पवित्र आहेत, तसे करुण, दयाळूपणा, नम्रता, सौम्यता, आणि धीर हे परिधान करावे.
13 एकमेकांचे सहन करा. जशी प्रभुने तुम्हांला क्षमा केली तशी एखाद्याविरुद्ध तक्रार असेल तर एकमेकांना क्षमा करा.
14 या सर्वांवर प्रीतिचे वस्त्र परिधान करा. जे त्या सर्वांना एकत्र ठेवते आणि त्यांना परिपूर्ण करते.
15 आणि ख्रिस्ताची शांति जिच्यासाठी तुम्ही जे एका देहातील लोक त्या तुम्हांला बोलाविले होते ती तुमच्या अंत:करणावर राज्य करो आणि नेहमी उपकार मानणारे व्हा.
16 ख्रिस्ताचा संदेश तुमच्यामध्ये त्याच्या सर्व वैभवाने राहावा. एकमेकांना महान असा शहाणपणाने शिकवा व बोध करा. स्तोत्रे, व गीते गा, आणि आध्यात्मिक गीते गाऊन उपकारस्तुतीसह आपल्या अंत:करणात देवाला गीते गा.
17 आणि प्रत्येक गोष्ट जी तुम्ही बोलता किंवा करता ते प्रभु येशूच्या नावात करावे. यामुळे तुम्ही देवपित्याचे त्याच्याद्धारे आभार मानता.
18 पत्नींनो, जसे प्रभूमध्ये योग्य आहे तसे तुम्ही आपल्या पतींच्या अधीन राहा.
19 पतींनो, आपल्या पत्नीवर प्रेम करा आणि त्यांच्याबरोबर कठीणतेने वागू नका.
20 मुलांनो, सर्व गोष्टीत आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळा. कारण प्रभूच्या अनुयायांचे असे वागणे देवाला आनंद देणारे आहे.
21 वडिलांनो, आपल्या मुलाला चिडवू नका, म्हणजे ते निराश होणार नाहीत.
22 गुलामांनो, तुमच्या जगिक मालकाच्या सर्व आज्ञा पाळा आणि मनुष्याला संतोषविणाऱ्या, डोळ्यांनी देखरेख करण्यासाठी नव्हे तर त्याऐवजी पूर्ण मनाने प्रभूला भिऊन आज्ञा पाळा. कारण तुम्ही प्रभूचा आदर करता.
23 तुमच्या अंत:करणापासून काम करा. जणू काय तुम्ही प्रभूसाठी काम करीत आहात, मनुष्यांसाठी नव्हे असे काम करा.
24 लक्षात ठेवा, प्रभू तुम्हांला तुमच्या स्वर्गीय वारशाचे बक्षीस देईल. ख्रिस्त जो तुमचा खरा धनी त्याची सेवा करीत राहा.
25 कारणे जो कोणी वाईट करतो, त्याचेसुद्धा तसेच होईल. देव असेच वागवील कारण त्याच्याकडे पक्षपात नाही.