मत्तय
धडा 28
1 शब्बाथवारानंतरचा पहिला दिवस आला. पहाटेस मरीया मग्दालिया, मरीया नावाची दुसरी स्त्री कबर पाहावयास तेथे गेल्या.
2 त्यावेळी तेथे मोठा भूकंप झाला. देवाचा दूत स्वर्गातून तेथे आला. तो देवदूत कबरेकडे गेला. त्याने कबरेच्या तोंडावरची धोंड बाजूला केली. नंतर तो देवदूत त्या घोंडेवर बसला.
3 चमकणाऱ्या विजेसारखा तो देवदूत दिसत होता. त्याचे कपडे बफर्ासरखे शुभ्र होते.
4 कबरेवर पहारा करणारे शिपाई, देवदूत पाहून खूप घाबरले, ते थरथर कापू लागले. आणि ते मेलेल्या माणसासारखे झाले.
5 देवदूत म्हणाला, ʇभिऊ नका, ज्याला वधस्तंभावर खिळले होते त्या येशूला तुम्ही पाहत आहात.
6 पण तो तेथे नाही. तो म्हणाला होता, त्याप्रमाणे त्याला मरणातून उठविण्यात आले आहे. या आणि जेथे त्याचे शरीर ठेवले होते ती जागा पाहा.
7 आता ताबडतोब निघा आणि त्याच्या शिष्यांना सांगा : येशू मरणातून उठला आहे. तो गालीलात जाणार आहे. तो तुमच्या अगोदर तेथे जाईल, तुम्ही त्याला तेथे पाहाल.ʈनंतर देवदूत म्हणाला, ʇमी तुम्हांला सर्व काही सांगितले आहे.ʈ
8 म्हणून त्या स्त्रिया लगबगीने कबरेजवळून निघाल्या. त्या फार घाबरलेल्या होत्या. परंतु फार आनंदितही झाल्या होत्या. जे काही घडले ते सांगण्यासाठी त्या धावत निघाल्या.
9 अचानक येशू त्यांना भेटला आणि तो त्यांना म्हणाला, ʇशांती असो.ʈ त्या त्याच्याजवळ आल्या. त्यांनी त्याचे पाय धरले आणि त्याची उपासना केली.
10 मग येशू त्यांना म्हणाला, ʇमला अडवू नका. माझ्या भावांना सांगा की त्यांनी गालीलात जावे. तेथेच त्यांची माझी भेट होईल.ʈ
11 स्त्रिया शिष्यांना सांगण्यासाठी गेल्या. तेव्हा कबरेवरील पहारेकरी शिपायांतील काही जण नगरात गेले आणि त्यांनी घडलेले सर्व मुख्य याजकांना सांगितले.
12 नंतर याजक जाऊन वडीलजनांना भेटले. आणि त्यांनी एक बेत रचला. त्यांनी शिपायांना पुष्कळ पैसे देऊन असे म्हणण्यास सांगितले.
13 ते म्हणाले, ʇलोकांना असे सांगा की, आम्ही रात्री झोपेत असताना येशूचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे शरीर चोरुन नेले.
14 हे जर राज्यापालाच्या कानावर गेले तर आम्ही त्याला पटवून देऊ आणि तुम्हांला काही होऊ देणार नाही.ʈ
15 मग शिपायांनी पैसे घेतले व याजकांनी सांगितले तसे केले. आणि ही गोष्ट यहूदी लोकांत आजवर प्रचलित आहे.
16 अकरा शिष्य गालीलास निघून गेले. येशूने सांगितलेल्या डोंगरावर ते हजर झाले.
17 त्या डोंगरावर येशू त्यांना दिसला. त्यांनी त्याची उपासना केली. पण तो येशू आहे यावर शिष्यांपैकी काहींचा विश्वास बसला नाही.
18 तेव्हा येशू त्याच्याकडे आला आणि म्हणाला, ʇस्वर्गात आणि पृथ्वीवर मला सर्व अधिकार देण्यात आला आहे.
19 म्हणून तुम्ही जा आणि राष्ट्रातील लोकांस माझे शिष्य करा. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावाने बाप्तिस्मा द्या.
20 आणि जे काही मी तुम्हांला शिकविले आहे ते त्या लोकांना करायला शिकवा. आणि पाहा, काळाच्या शेवटापर्यंत मी सदोदित तुमच्याबरोबर राहीन.ʈ