मीखा
धडा 3
1 मग मी म्हणालो, “याकोबच्या नेत्यांनो, इस्राएल राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांनो, न्याय म्हणजे काय” हे तुम्हाला माहीत असावे!
2 पण तुम्ही चांगल्याचा तिरस्कार करता आणि वाईटावर प्रेम करता. तुम्ही लोकांची चामडी सोलता. त्यांच्या हाडांवरुन मांस ओढून काढता.
3 तुम्ही माझ्या माणसांचा नाश करीत आहात.तुम्ही त्यांची कातडी सोलता आणि हाडे मोडता. भांड्यात घालण्यासाठी ज्याप्रमाणे मांस चिरतात, त्याप्रमाणे तुम्ही त्यांच्या हाडांचे तुकडे तुकडे करता.
4 आता, तुम्ही कदाचित परमेश्वराची प्रार्थना कराल. पण तो तुम्हाला ओ देणार नाही. नाही, परमेश्वर तुमच्यापासून तोंड लपवेल. का? कारण तुम्ही दुष्कृत्ये करता.”
5 भोंदू वा खोटे संदेष्टे परमेश्वराच्या लोकांना खोेट्यागोष्टी सांगत आहेत. परमेश्वर ह्या संदेष्ट्यांबद्दल पुढीलप्रमाणे उद्गार काढतो.“हे संदेष्टे पोटाद्वारे चालतात. जर लोकांनी ह्या संदेष्ट्यांना खायला घातले तर ते ओरडतात, शांती नांदेल. पण जर लोकांनी त्यांना खायला दिले नाही तर हे संदेष्टे किंचाळतात, “युध्दाला तयार राहा!”
6 म्हणून ही जणू काही तुमची रात्र आहे. म्हणूनच तुम्हाला दृष्टांन्त होत नाहीत. भविष्यात काय घडणार हे तुम्ही पाहू शकत नाही, म्हणून तुम्ही जणू अंधारातच आहात. संदेष्ट्यांच्या माथ्यांवरचा सूर्य मावळला आहे. तेव्हा भविष्यात घडणाऱ्या गोष्टी ते पाहू शकत नाहीत. म्हणजेच त्यांच्यापुढे जणू अंधार पसरलाय!
7 द्रष्टे लज्जित झालेत ज्योतिषी ओशाळलेत. ते काहीच बोलणार नाहीत. का? कारण परमेश्वर त्यांच्याशी बोलणार नाही.
8 पण परमेश्वराच्या आत्म्याने मला अधिकार, चांगुलपणा व सामर्थ्याने भरुन टाकले आहे. मी याकोबला त्याच्या पापांबद्दल सांगीत. हो! मी इस्राएलशी त्याच्या पापांविषयी बोलेन.”
9 याकोबच्या नेत्यांनो आणि इस्राएलच्या शास्त्यांनो, माझे ऐका! तुम्ही योग्य चालीरीतीचा तिरस्कार करता. सरळ गोष्टीला तुम्ही वाकडी करता.
10 लोकांना मारुन तुम्ही सियोनची उभारणी केली. तुम्ही लोकांना फसवून यरुशलेम उभे केले.
11 यरुशलेमचे न्यायाधीश, न्यायालयात कोणी जिंकायचे, हे ठरविण्यासाठी लाच घेतात. यरुशलेममधील याजकांना लोकांना शिकवण देण्यापूर्वी लोकांनी पैसे द्यावेच लागतात. भविष्य बघण्यापूर्वीच संदेष्ट्यांना पैसे चारावे लागतात. आणि मग हे नेते अपेक्षा करतात की परमेश्वराने त्यांना मदत करावी. ते म्हणतात, “आपले काहीही वाईट होणार नाही. कारण परमेश्वर आपल्याबरोबरच राहतो!”
12 नेत्यांनो, तुमच्यामुळे सियोनचा नाश होईल. ती नांगरट जमीन होईल. यरुशलेम म्हणजे दगडधोड्यांची रास होईल. मंदिर ज्या टेकडीवर आहे, ती टेकडी निर्जन होईल व त्यावर घनदाट रान माजेल.”