योएल

1 2 3

धडा 1

1 पथूएलचा मुलगा योएल ह्याला परमेश्वराकडून पुढील संदेश मिळाला:
2 नेत्यांनो, हा संदेश ऐका! ह्या देशात राहणाऱ्या सर्व लोकानो, माझे ऐका! तुमच्या आयुष्यात पूर्वी, असे काही घडले आहे का? नाही. तुमच्या वडिलांच्या काळात असे काही घडले का? नाही.
3 तुम्ही तुमच्या मुलांना ह्या गोष्टी सांगाल. तुमची मुले, त्यांच्या मुलांना व तुमची नातवंडे त्यांच्या पुढच्या पिढीला ह्या गोष्टी सांगतील.
4 जे नाकतोड्याने खाल्ले व जे कुसरूडाने सोडले, ते घुल्याने खाल्ले.
5 मद्यप्यांनो, जागे व्हा व रडा! सर्व दारूड्यांनो, रडा! का? कारण तुमचे गोड मद्य संपले आहे. पन्हा तुम्हाला त्याची चव चाखता येणार नाही.
6 माझ्या राष्ट्राबरोबर लढण्यासाठी एक मोठा व शक्तिशाली देश येत आहे. त्यांचे सैनिक अगणित आहेत. ते टोळ (शत्रू-सैनिक) तुमचा नाश करण्यास समर्थ आहेत. त्यांचे दात सिंहाच्या दाताप्रमाणे आहेत
7 माझ्या द्राक्षवेलीवरची सर्व द्राक्षे ते ‘टोळ’ खातील. चांगल्या द्राक्षवेली जळाल्या व मेल्या माझी झाडे, ते, सोलून खातील. त्या झाडांच्या फांद्या पांढऱ्या पडून त्यांचा नाश होईल.
8 एखाद्या तरुण वाग्दत्त वधूचा भावी पती मारला गेल्यावर ती जशी रडते, तसे रडा!
9 याजकांनो, परमेश्वराच्या सेवकांनो, शोक करा! का? कारण परमेश्वराच्या मंदिरात अन्नार्पणे व पेयार्पणे होणार नाहीत.
10 शेतांचा नाश झाला आहे. भूमीसुध्दा रडत आहे. का? कारण धान्याचा नाश झाला आहे, नवे मद्य सुकून गेले आहे आणि जैतुनाचे तेल नाहीसे झाले आहे.
11 शेतकऱ्यांनो, दु:खी व्हा! द्राक्षमळेवाल्यांनो, मोठ्याने रडा! का? कारण शेतातील पीक नाहीसे झाले आहे.
12 वेली सुकून गेल्या आहेत, अंजिराचे झाड वठत आहे, डाळींब, खजूर, सफस्चंद अशी सर्वच बागेतील झाड सुकत आहेत आणि लोकांमधील आनंद लोपला आहे.
13 याजकांनो, शोकप्रदर्शक कपडे चढवून मोठ्याने रडा. वेदीच्या सेवकांनो, मोठ्याने शोक करा. माझ्या परमेश्वराच्या सेवकानो, शोकप्रदर्शक कपडे घालूनच तुम्ही झोपाल. का? कारण परमेश्वराच्या मंदिरात यापुढे अन्नार्पणे व पेयार्पणे होणार नाहीत.
14 ‘उपवासाची एक विशिष्ट वेळ असेल’, असे लोकांना सांगा. खास सभेसाठी लोकांना एकत्र बोलवा. देशात राहणाऱ्या लोकांना व नेत्यांना एकत्र गोळा करा. त्यांना प्रभूच्या, तुमच्या परमेश्वराच्या मंदिरात आणा, व परमेश्वराची प्रार्थना करा.
15 शोक करा! का? कारण परमेश्वराचा खास दिवस जवळच आहे. त्या वेळी, सर्वशक्तिमान परमेश्वराची शिक्षा हल्ल्याप्रमाणे अचानक येईल.
16 आमचे अन्न तुटले आहे. आमच्या परमेश्वराच्या मंदिरातून आनंद व सुख निघून गेले आहे.
17 आम्ही बियाणे पेरले पण ते मातीतच सुकून मरून गेले. आमची झाडे वाळली व मेली आहेत. आमची धान्याची कोठारे रिकामी झाली आणि कोसळत आहेत.
18 प्राणी भुकेन व्याकूळ होऊन कण्हत आहेत. गुरांचे कळप गांगरून जाऊन, इतस्तत: भटकत आहेत. त्यांना खाण्यास चारा नाही. मेंढ्या मरत आहेत.
19 हे परमेश्वरा, मी तुझा मदतीसाठी धावा करतो. आगीने आमच्या हिरव्या रानांचे वाळवंटात रूपांतर केले आहे.
20 हिंस्र पशूसुध्दा तहानेने व्याकूळ झालेले आहेत आणि ते तुझ्या मदतीसाठी आक्रोश करत आहेत. झरे आटले आहेत-कोठेही पाणी नाही. आगीने आमच्या हिरव्या रानांचे वाळवंट केले आहे.