यिर्मया
धडा 46
1 यिर्मया या संदेष्ट्याला जो संदेश मिळाला, तो वेगवेगळ्या राष्ट्रांसाठी होता.
2 हा संदेश मिसर देशासाठी आहे. फारो नखो ह्याच्या सैन्याविषयी हा संदेश आहे. नखो मिसरचा राजा होता. कर्कमीश शहराजवळ त्याच्या सैन्याचा पराभव झाला. कर्कंमीश फरात नदीच्या काठी आहे. योशीयाचा मुलगा योहयाकीम यहूदाचा राजा असताना त्याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने फारो नखोच्या सैन्याचा कर्कमीश येथे पराभव केला. परमेश्वराचा मिसरला पुढीलप्रमाणे संदेश आहे:
3 “तुमच्या लहान मोठ्या ढाली तयार ठेवा. लढण्यासाठी कूच करा
4 घोडे तयार ठेवा. सैनिकांनो, घोड्यावर स्वार व्हा, युद्धासाठी आपापल्या जागा धरा. शिरस्त्राण घाला. भाल्यांना धार करा. चिलखत घाला.
5 हे मी काय पाहतो? ते सैन्य भयभीत झाले आहे, सैनिक दूर पळून जात आहेत त्यांच्या शूर वीरांचा पराभव झाला आहे. ते घाईने पळून जात आहेत. ते मागे वळून पाहत नाहीत. सगळीकडे धोका आहे.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
6 चपळ लोक दूर पळून जाऊ शकणार नाहीत. बलवान सैनिक निसटू शकणार नाहीत. ते सगळे अडखळून पडतील. हे सगळे फरात नदीच्या उत्तरेस घडेल.
7 नील नदीप्रमाणे हा कोण येत आहे? त्या मोठ्या, वेगवान नदीप्रमाणे कोण बरे येत आहे?
8 उसळणाऱ्या नील नदीप्रमाणे मिसर येत आहे. प्रचंड, वेगवान नदीप्रमाणे तो येत आहे. मिसर म्हणतो, ‘मी येऊन पृथ्वीला व्यापून टाकीन. मी शहरे व त्यात राहणाऱ्या लोकांचा नाश करीन.’
9 घोडेस्वारांनो, चढाई करा. सारथ्यांनो, रथ वेगाने हाका. शूर सैनिकांनो, कूच करा. कूश व फूट येथील सैनिकांनो, ढाली सांभाळा. लूदच्या सैनिकांनो, धनुष्याचा उपयोग करा.
10 “पण त्या वेळी, आमच्या प्रभूचा, सर्वशक्तिमान परमेश्वराचाच जय होईल. तो त्यांना योग्य ती शिक्षा करील. परमेश्वराच्या शत्रूंना योग्य अशीच शिक्षा मिळेल. सर्वनाश होईपर्यंत तलवार वार करील. तलवारीला लागलेली रक्ताची तहान भागेपर्यंत ती लोकांना ठार करील. आमच्या प्रभूला, सर्वशक्तिमान परमेश्वराला बळी मिळावा म्हणून असे घडेल. हा बळी म्हणजे फरात नदीच्या काठी उत्तरेच्या प्रदेशात असलेले मिसरचे सैन्य होय.
11 “मिसर, गिलादला जा आणि काही औषध मिळव. तू खूप औषधे मिळवशील, पण त्याचा उपयोग होणार नाही तू बरा होणार नाहीस.
12 इतर राष्ट्रे तुझा आक्रोश ऐकतील. सर्व पृथ्वीवर तो ऐकू जाईल. एक ‘शूर योद्धा’ दुसऱ्या ‘शूर योधध्द्याला’ भिडेल. आणि दोघेही ‘शूर योद्धे’ बरोबरच खाली पडतील.”
13 परमेश्वराने यिर्मया या संदेष्ट्याला जो संदेश दिला, तो मिसरवर स्वारी करुन येणाऱ्या बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरबद्दल होता.
14 “मिसरमध्ये ह्या संदेशाची घोषणा कर. मिग्दोल, नोफ व तहपन्हेस येथे जाहीर कर ‘युद्धाला तयार व्हा. का? कारण तुमच्या भोवतालचे लोक तलवारीने मारले जात आहेत.’
15 “मिसर, तुझे बलवान सैनिक मारले जातील. ते उभेच राहू शकणार नाहीत कारण परमेश्वरच त्यांना खाली पाडेल.
16 ते पुन्हा पुन्हा धडपडतील. ते एकमेकावर पडतील ते म्हणतील, ‘उठा! आपण माघारी, आपल्या लोकांमध्ये जाऊ या आपण माय भूमीला परत जाऊ. या आपला शत्रू आपला पराभव करीत आहे. आपण दूर गेलेच पाहिजे.’
17 त्यांच्या मायभूमीत, ते सैनिक म्हणतील, ‘मिसरचा राजा फारो म्हणजे नुसताच राजावाजा आहे. त्याच्या वैभवाचा काळ संपला आहे.”
18 हा राजाकडून आलेला संदेश आहे. तो राजा म्हणजे सर्वशक्तिमान परमेश्वरच होय. “मी शपथपूर्वक वचन देतो की सामर्थ्यवान नेता येईल. तो ताबोर आणि समुद्राजवळील कर्मेल पर्वताप्रमाणे महान असेल.
19 मिसरच्या लोकांनो, गाशा गुंडाळा कैदेस तयार व्हा. का? कारण नोफचा नाश होऊन ते निर्जन होईल. त्या शहरांचा नाश केला जाईल. ती निर्जन होतील.
20 “मिसर सुंदर गायीप्रमाणे आहे. पण उत्तरेकडून एक गोमाशी तिला त्रास देण्यास येत आहे.
21 मिसरच्या सैन्यातील भाडोत्री सैनिक हे लठ्ठ वासराप्रमाणे आहेत. ते पाठ फिरवून पळून जातील. ते चढाईला समर्थपणे तोंड देणार नाहीत त्यांच्या नाशाची वेळ येत आहे. त्यांना लवकरच शिक्षा होईल.
22 मिसर, फूत्कारणाऱ्या व निसटून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या सापाप्रमाणे आहे. शत्रू जवळ जवळ येत आहे आणि मिसरचे सैन्य पळून जाण्याचा प्रयत्न करीत आहे. शत्रू मिसरवर कुऱ्हाडीने हल्ला करतील. ते लाकूडतोड्यां प्रमाणे असतील.”
23 परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो: “ते मिसरचे जंगल (सैन्य) तोडून टाकतील जंगलात (सैन्यात) खूप झाडे (सैनिक) आहेत. पण ती सर्व तोडली जातील. टोळापेक्षा तेथे जास्त सैनिक आहेत. कोणीही मोजू शकणार नाही एवढे सैनिक येथे आहेत.
24 मिसरची स्थिती लज्जास्पद होईल. उत्तरेचा शत्रू तिचा पराभव करील.”
25 सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “लवकरच मी नोच्या आमोन देवतेला शिक्षा करीन. मी फारो, मिसर आणि तिचे दैवत यांनाही शिक्षा करीन. मी मिसरच्या राजाला सजा देईन आणि फारोवर अवलंबून असलेल्या लोकांना शिक्षा करीन.
26 मी ह्या सर्व लोकांचा त्यांच्या शत्रूंच्या हातून पराभव करीन. त्या शत्रूंची त्यांना मारण्याची इच्छा आहे. मी त्या लोकांना बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर व त्याचे सेवक ह्यांच्या हवाली करीन.”“फार पूर्वी, मिसरला, शांतता होती. ह्या संकटकाळानंतरही मिसरला शांतता नांदेल.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
27 “याकोब, माझ्या सेवका, घाबरु नकोस. इस्राएल, भिऊ नकोस. दुरच्या ठिकाणाहून मी तुला वाचवीन. निरनिराळ्या देशांत कैदी म्हणून नेलेल्या तुझ्या मुलांचे मी रक्षण करीन. याकोबला पुन्हा शांतता व संरक्षण लाभेल. कोणीही त्याला भीती दाखविणार नाही.”
28 परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो, “याकोब, माझ्या सेवका घाबरु नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे मी तुला खूप निरनिराळ्या ठिकाणी पाठविले पण मी तुझा संपूर्ण नाश करणार नाही. इतर राष्ट्रांचा मात्र मी नाश करीन. तुझ्या दुष्कृत्यांबद्दल तुला शिक्षा झालीच पाहिजे. म्हणून तुझ्या शिक्षेतून मी तुला सूट देणार नाही. मी तुला शिस्त लावीन हे खरे! पण ती न्याय्यपणाने लावीन.”