उपदेशक
धडा 5
1 देवाची उपासना करायला जाताना काळजी घ्या. मूर्ख लोकांप्रमाणे यज्ञ करण्यापेक्षा देवाचे ऐकणे चांगले आहे. मूर्ख लोक बरेचदा वाईट गोष्टी करतातत आणि ते त्यांना कळत देखील नाही.
2 देवाला वचन देताना तुम्ही काळजी घ्या. देवाशी बोलताना काळजी घ्या. भावनाशील होऊन लगेच बोलायला सुरुवात करू नका. देव स्वर्गात असतो आणि तुम्ही पुथ्वीवर. म्हणून देवाला फक्त काही मोजक्या गोष्टीच सांगायची आवश्यकता असते. ही म्हण खरी आहे:
3 खूप काळजी केल्यामुळे वाईट स्वप्रे पडतात आणि मूर्खाकडून खूप शब्द बोलले जातात.
4 जर तुम्ही देवाला वचन दिले असेल तर ते पाळा. ती वचने पाळायला वेळ लावू नका. देव मूर्खांबद्दल आनंदी नसतो. जे देण्याचे वचन तुम्ही देवाला दिले होते ते त्याला द्या.
5 कसलेच वचन न देणे हे काही तरी वचन देऊन त्याची पूर्तता न करण्यापेक्षा चांगले असते.
6 म्हणून तुमच्या शब्दामुळे स्वत:ला पाप करायला लावू नका. “मी जे बोललो ते मला बोलायचे नव्हते.” असे याजकाला म्हणू नका. तुम्ही जर असे केलेत तर देव तुमच्या शब्दांवर खरोखरच रागावेल आणि तुम्ही ज्याच्यासाठी कष्ट केलेत त्या सर्वाचा नाश करील.
7 तुमची निरर्थक स्वप्रे आणि पोकळ बडबड तुम्हाला संकटात लोटणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही देवाला मान द्यायला हवा.
8 काही देशांत गरीब लोकांवर खूप कष्ट करायची सक्ती केली जाते. गरीबांच्या बाबतीत हे अन्यायकारक आहे हे तुम्ही जाणाता. हे गरीबांच्या हक्काविरुध्द आहे. पण आश्चर्य वाटून घेऊ नका. जो राजा त्यांना हे करायला भाग पाडतो त्याला भाग पाडणारा ही एक राजा आहे. आणि या दोघांना भाग पाडायला लावणारा आणखी एक राजा आहे.
9 राजाही गुलाम आहे-त्याचा देशच त्याचा मालक आहे.
10 जो माणूस पैशावर प्रेम करतो तो त्याच्याजवळ असलेल्या संपत्ती बद्दल कधीही समाधानी राहू शकणार नाही. जो माणूस संपत्तीवर प्रेम करतो त्याला अधिक संपत्ती मिळाली तरी तो समाधानी राहणार नाही. हा ही अविचार आहे.
11 एखाद्याकडे जास्त संपत्ती असेल तर ती खर्च करण्यासाठी त्याला मित्रांची आवश्यकता असते. त्यामुळे श्रीमंत माणसाला काहीच लाभ होत नाही. तो फक्त त्याच्या संपत्ती कडे पाहू शकतो.
12 जो माणूस दिवसभर कष्ट करतो तो घरी येऊन शांतपणे झोपतो. त्याला खायला कमी असले किंवा नसले तरी ते महत्वाचे नसते. पण श्रीमंत माणूस त्याच्या संपत्तीची चिंता करतो आणि त्यामुळे त्याला झोप येत नाही.
13 मी या आयुष्यात एक अतिशय वाईट गोष्ट घडलेली पाहिली. माणूस भविष्यासाठी पैसे साठवतो.
14 पण काही तरी वाईट घडते आणि त्याची संपत्ती जाते. त्यामुळे त्याच्या मुलाला द्यायला त्याच्यावजळ काहीही राहात नाही.
15 माणूस त्याच्या आईच्या उदरातून जगात येतो तेव्हा काहीही न घेता येतो. आणि तो माणूस जेव्हा मरतो तेव्हाही तो त्याच प्रकारे जातो. काहीही न घेता. तो गोष्टी मिळवण्यासाठी खूप कष्ट करतो पण तो जेव्हा मरतो तेव्हा तो बरोबर काहीही नेत नाही. तो ज्या रीतीने जगात येतो त्याच रीतीने जातो.
16 हे फारच वाईट आहे म्हणून “वारा पकडण्याचा प्रयत्न करण्यात माणसाला काय मिळते?”
17 त्याला फक्त दुःखाने आणि खिन्नतेने भरलेले दिवस मिळतात. आणि शेवटी तो निराश, आजारी आणि रागीट बनतो.
18 मी पाहिले आहे की, माणूस करू शकेल अशी चांगली गोष्ट पुढीलप्रमाणे आहे: माणासाने पृथ्वीवरील त्याच्या लहानशा आयुष्यात खावे. प्यावे आणि काम करण्यात आनंद मिळवावा. देवाने त्याला काही दिवसांचेच आयुष्य दिले आहे आणि फक्त तेव्हढेच त्याच्याजवळ आहे.
19 जर देवाने एखाद्याला संपत्ती, मालमत्ता आणि या गोष्टींचा उपभोग घेण्याची शक्ती दिली असेल तर त्याने त्याचा उपभोग घेतला पाहिजे. त्याच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्यांचा स्वीकार त्याने केला पाहिजे, आणि त्याचे कामही आनंदाने केले पाहिजे. ती देवाने दिलेली भेट आहे.
20 माणसाला जगण्यासाठी खूप वर्षे नसतात. म्हणून त्याने आयुष्यभर या सगव्व्या गोष्टींची आठवण ठेवली पाहिजे. देव त्याला त्याचे आवडते काम करण्यात गुंतवून ठेवील.