2 शमुवेल
धडा 23
1 दावीदाची ही अखेरची वचने;इशायपुत्र दावीदाचा हा संदेश देवामुळे ज्याला थोरवी प्राप्त झाली त्याचा हा संदेश. याकोबच्या देवाचा हा अभिषिक्त राजा इस्राएलचा गोड गळ्याचा गायक
2 परमेश्वराचा आत्मा माझ्या मार्फत बोलला त्याचे शब्द माझ्या मुखी होते.
3 इस्राएलचा देव हे बोलला इस्राएलचा दुर्ग मला म्हणाला, “जो न्यायाने राज्य करतो, जो देवाविषयी आदर बाळगून राज्य करतो.
4 तो माणूस उष: कालच्या प्रभे सारखा असेल, निरभ्र सकाळ असावी तसा असेल, पावसानंतर येणाऱ्या उन्हासारखा असेल, पाऊस कसा तर ज्याच्यामुळे जमिनीतून कोवळे गवत तरारून येतं असा.”
5 देवाने माझे घराणे बळकट व सुरक्षित केले. देवाने माझ्याबरोबर एक कायमचा करार केला. तो सर्व दृष्टींनी माझ्या भल्याकरताच आहे याची त्याने खातरजमा करून घेतली. त्याने असा मजबूत करार केला आणि आता तो त्याचा भंग करणार नाही. हा करार म्हणजे माझा उध्दारच होय. हा करार म्हणजेच मला हवे होते ते सर्व काही होय. परमेश्वर माझ्या घराण्याची. भरभराट करील.
6 पण दुष्ट माणसे काट्यांसारखी असतात. लोक काटा धरून ठेवत नाहीत, फेकून देतात.
7 त्याचा स्पर्श झाला तर लाकडी आणि पंचदातूचा भाला टोचावा तशा वेदना होतात. (होय, असा माणूस काट्यासारखा असतो) त्यांना आगीच्या भक्ष्य स्थानी टाकतील आणि ती जळून खाक होतील.
8 दावीदाच्या पदरी असलेल्या वीरांची नावे अशी:योशेब-बश्शेबेथ तखमोनी. हा रथावरच्या सेवकांचा मुख्य होता. असनी अदीनो म्हणूनही त्याला ओळखतात. त्याने एका वेळी आठशे जणांना ठार केले.
9 त्याच्या खालोखाल. अहोही येथील दोदय याचा मुलगा एलाजार. पलिष्ट्यांना आव्हान दिले त्यावेळी दावीदाबरोबर असलेल्या तीन वीरांपैकी एक. ते युध्दाच्या तयारीने आले, पण इस्राएल सैनिक पळून गेले होते.
10 थकून अंगात त्राण राहिलं नाही तोपर्यंत एलाजार पलिष्ट्यांशी लढत राहिला. तलवार घटृ पकडून त्याने लढा चालू ठेवला. परमेश्वराने त्या दिवशी मोठा विजय घडवून आणला. एलाजारची युध्दात सरशी झाल्यावर मग लोक तिथे आले. पण शत्रू सैनिकांच्या मृतदेहावरच्या वस्तू गोळा करायला तेवढे ते आले.
11 हरार येथील आगे याचा मुलगा शम्मा हा ही होता. पलिष्टी चालून आले तेव्हा एका कडधान्याच्या शेतात हे युध्द झाले. लोकांना पलिष्ट्यांसमोेरुन पळ काढला.
12 पण शम्मा शेताच्या ऐन मध्यावर उभा राहिला आणि त्याने एकट्याने त्यांना तोंड दिले. त्याने पलिष्ट्यंाचा पराभव केला. परमेश्वराने इस्राएलला त्यादिवशी मोठा विजय मिळवून दिला.
13 दावीद एकदा अदुल्लामच्या गुहेत होता आणि पलिष्टी सैन्याचा तळ खाली रेफाईच्या खोऱ्यात होता. त्यावेळी तीस शूरांपैकी तिघेजण दावीदाकडे जायला म्हणून थेट गुहेपर्यंत अक्षरश: सरपटत गेले.
14 नंतर एकदा दावीद गडावर असताना पलिष्ट्यांची टोळी बेथलहेम येथे होती.
15 दावीद आपल्या गावाचे पाणी पिण्यासाठी व्याकुळ झाला तो म्हणाला, “बेथलेहेमच्या वेशीजवळच्या विहिरीतले पाणी मला कुणी आणून दिले तर किती बरे होईल.” खरोखरच कोणी तसे करावे म्हणून तो बोलत नव्हता. तो आपला उगाच तसे म्हणाला.
16 पण या तीन शूरांनी पलिष्ट्यांच्या ठाण्यातून धाडसाने तोंड देत मार्ग काढला आणि बेथलहेमच्या वेशीजवळच्या विहिरीतले पाणी काढून दावीदाला प्यायला आणून दिले. दावीदाने ते प्यायचे नाकारले. त्याने ते परमेश्वराला अर्पण म्हणून जमिनीवर ओतून टाकले.
17 दावीद म्हणाला, “परमेश्वरा, हे मी कसे पिऊ? हे पाणी मी प्यायलो तर ज्यांनी आपले प्राण माझ्यासाठी धोक्यात घातले त्यांचे रक्तच मी प्राशन केल्यासारखे होईल.” म्हणून तो ते पाणी प्याला नाही. त्या तीन शूर वीरांनी यासारखी अनेक धाडसे केली.
18 सरूवेचा मुलगा यवाब याचा भाऊ म्हणजे अबीशय. अबीशय या तीन वीरांचा नायक होता. आपल्या भाल्याने त्याने तीनशे शत्रू सैनिकांना ठार केले. आणि त्या तिघांमध्ये नाव मिळवले.
19 त्या तिघांमध्ये तो सर्वाधिक प्रसिद्ध होता. त्यांचा तो नायकही होता. पण तो त्यांच्यापैकी नव्हता.
20 यहोयादा याचा मुलगा बनाया हाही एक होता. तो एका पराक्रमी माणसाचा पुत्र होता. तो कबसेल इथून आलेला होता. बनायाने बरेच पराक्रम गाजवले. मवाबमधील अरीएलच्या दोन मुलांना त्याने मारले. एकदा बर्फ पडत असताना त्याने गुहेत शिरून सिंह मारला.
21 एका धिप्पाड मिसरी माणसालाही त्याने मारले. या मिसरी माणसाच्या हातात भाला होता तर बनायाच्या हातात फक्त काठी. बनायाने त्याचा भाला हिसकावून घेतला आणि त्याच्याच भाल्याने त्या मिसरी माणसाचा जीव घेतला.
22 बनायाने अशी बरीच कृत्ये केली. त्यानेही या तिघांइतकाच नावलौकिक मिळवला.
23 तो तीस वीरांच्या (तीस वीर-दावीदाच्या अतिशय शूर सैनिकांचा गट म्हणजे हे लोक होत.) पेक्षा अधिक प्रसिद्ध होता. पण तरी पहिल्या तिघांच्या पदाला तो पोचला नाही. दावीदाने त्याला आपल्या अंगरक्षकांचा प्रमुख म्हणून नेमले.
24 यवाबाचा भाऊ असाएल हा त्या तिसातला एक होता. बाकीच्या वीरांची नावे पुढीलप्रमाणे:बेथलहेममधील दोदो याचा मुलगा एलहानान,
25 शम्मा हरोदी, अलीका हरोदी,
26 हेलस पलती, इक्केश तकोई याचा मुलगा ईरा,
27 अबीयेजर अनाथोथी, मबुन्नय हुशाथी,
28 सलमोन अहोही, महरय नटोफाथी,
29 बाना नटोफाथी याचा मुलगा हेलेब, बन्यामीनच्या वंशातील, गिबामधला रीबय याचा मुलगा इत्तय,
30 बनाया पिराथोनी, गाश झऱ्याजवळचा हिद्दय,
31 अबी-अलबोन अर्वाथी, अजमावेथ बरहूमी,
32 अलीहाबा शालबोनी, याशेन घराण्यातला योनाथान,
33 शम्मा हारारी, शारार अरारी याचा मुलगा अहीयाम,
34 माकाथीचा मुलगा अहसबय याचा मुलगा अलीफलेट, अहिथोफेल गिलोनी याचा मुलगा अलीयम,
35 हेस्री कर्मेली, पारय अर्बी
36 सोबा मधील नाथोन याचा मुलगा इगाल, बानी यादी,
37 सेलक अम्मोनी, सरुवेचा मुलगा यवाब याचा शस्त्रवाहक नहरय बैरोथी,
38 ईर इथ्री, गारेब इथ्री,
39 उरीया हित्ती, असे एकंदर सदतीस.