1 शमुवेल 1

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31

धडा 12

1 शमुवेल सर्व इस्राएलांना उद्देशून म्हणाला, “मी सर्व काही तुमच्या म्हणण्याप्रमाणे केले आहे. तुमच्यावर राजा नेमला आहे.
2 तो आता तुमचे नेतृत्व करील. मी आता म्हातारा झालो, थकलो पण माझी मुल तुमच्या बरोबर आहेत. मी अगदी लहान असल्यापासून तुमचे नेतृत्व केले.
3 हा मी इथे आहे. माझ्या हातून काही चुकलेले असेल तर ते परमेश्वराला आणि तुम्ही निवडलेल्या राजाला सांगा. मी कोणाचा बैल किंवा गाढव चोरले आहे का? कोणाला दुखवले किंवा फसवले का? कोणाकडून मी कधी पैसाच काय पण जोडा तरी लाच म्हणून घेतला का? तसे असेल तर मी त्याची भरपाई करीन.”
4 यावर सर्व इस्राएलांनी उत्तर दिले, “नाही, तुमच्या हातून कोणतेही कुकर्म झालेले नाही. तुम्ही कधी आम्हाला फसवले नाहीत की लाच घेतली नाहीत.”
5 तेव्हा शमुवेल सर्वाना म्हणाला, “आज या घटनेला परमेश्वर आणि त्याने निवडलेला राजा साक्षी आहेत. तुमचे म्हणणे त्यांनी ऐकले आहे. माझ्याहातून काहीही वावगे घडले नसल्याचे तुमचे मत त्यांना माहीत आहे.” तेव्हा लोक एकमताने म्हणाले, “होय! परमेश्वर त्याला साक्षी आहे.”
6 मग शमुवेल म्हणाला, “काय काय घडले ते परमेश्वराला माहीत आहे. मोशे आणि अहरोन यांना त्यानेच नेमले. तुमच्या पूर्वजांनाही त्यानेच मिसरमधून सोडवले.
7 आता सर्वजण येथे शांत उभे राहा म्हणजे परमेश्वराने तुमच्यासाठी आणि तुमच्या पूर्वजांसाठी कोणकोणती सत्कृत्ये केली ती मी तुम्हाला सांगतो.
8 याकोब मिसरमध्ये गेल्यावर तेथील लोकांनी त्याच्या वंशजांचे जिणे कठीण केले तेव्हा त्यांनी परमेश्वराची करुणा भाकली. म्हणून परमेश्वराने मोशे आणि अहरोन यांना पाठवले. त्यानी मग त्या तुमच्या पूर्वजांना मिसरमधून सोडवले आणि या ठिकाणी आणले.
9 “पण तुमचे पूर्वज आपला स्वामी जो परमेश्वर त्याला विसरले. तेव्हा परमेश्वराने त्यांना सीसराचे गुलाम बनू दिले. सीसरा हा हासोर येथील सैन्याचा सेनापती होता. त्यानंतर परमेश्वराने त्यांना पलिष्टी आणि मवाबचा राजा यांचे गुलाम बनवले. हे सर्व तुमच्या पूर्वजांबरोबर घडले.
10 तेव्हा तुमच्या पूर्वजांनी परमेश्वराकडे मदतीची याचना केली. ते म्हणाले, “आमच्या हातून पातक घडले. परमेश्वराला सोडून बाल, अष्टारोथ या भलत्या दैवतांची आम्ही भक्ती केली. पण आता आमची शत्रूच्या तावडीतून सुटका कर म्हणजे आम्ही फक्त तुझीच सेवा करु.”
11 “तेव्हा मग परमेश्वराने यरुबाबेल (गिदोन), बदान, इफताह आणि शमुवेल यांना पाठवून शत्रूंपासून तुमची सुटका केली. तेव्हा तुम्हाला स्वस्थता लाभली.
12 पण मग अम्मोन्यांचा राजा नाहाश याला तुमच्यावर चाल करुन येताना तुम्ही पाहिले आणि तुम्हाला संरक्षणासाठी राजा असाव असे वाटले. प्रत्यक्ष परमेश्वर तुमचा देव राजा असतानाही तुम्हाला असे वाटले.
13 तेव्हा तोही तुम्हाला मिळाला. परमेश्वरानेच त्याची निवड केली.
14 परमेश्वर तुमचे सतत रक्षण करील पण तुम्ही मात्र त्यासाठी खालील गोष्टी पाळल्या पाहिजेत; सन्मानपूर्वक परमेश्वराची सेवा करा. त्याच्या आज्ञेविरुध्द जाऊन कोणाशी लढू नका. तुम्ही व तुमचा राजा यांनी परमेश्वर देवालाच मानावे. असे वागल्याने परमेश्वर तुमचे रक्षण करील.
15 पण त्याचा अवमान केलात, त्याच्या आज्ञेविरुध्द बंड केलेत तर तो तुमच्याकडे पाठ फिरवील. तुमचा व तुमच्या राजाचा नाश करील.
16 “आता स्तब्ध उभे राहा आणि परमेश्वराचे महान कृत्य आपल्या डोळ्यांदेखत पाहा.
17 सध्या गव्हाच्या कापणीचे दिवसआहेत. मी परमेश्वराची प्रार्थना करतो. त्याने ढगांच्या गडाडाटासह पाऊस पाडावा अशी मी विनंती करतो. तेव्हा, राजाची मागणी करुन आपण परमेश्वराच्या दृष्टीने दुष्कृत्य केले आहे हे तुम्हाला कळेल.”
18 आणि शमुवेलने परमेश्वराची प्रार्थना केली. त्याच दिवशी मेघगर्जनेसह जोरदार वृष्टी झाली. त्यामुळे लोकांनी परमेश्वराची आणि शमुवेलची धास्ती घेतली.
19 ते शमुवेलला म्हणाले, “आम्हा दासांच्या वतीने तुम्ही परमेश्वराची प्रार्थना करा. आम्हाला मरु देऊ नका. आमच्या हातून अनेक पातके घडली आहेत. राजाची मागणी करुन तर आम्ही त्यात आणखी भरच घातली आहे.”
20 शमुवेल त्यांना म्हणाला, “तुमच्या हातून पापे घडली आहेत हे खरे, पण घाबरुन जाऊ नका. परमेश्वराला अनुसरायचे सोडू नका. मनोभावे त्याची सेवा करा.
21 मूर्ती म्हणजे निरर्थक वस्तू. निळळ पुतळे. तेव्हा त्यांची पूजा करु नका. मूर्ती तुमचे रक्षण करत नाहीत की मदतीला येत नाहीत त्या व्यर्थ होत.
22 “पण परमेश्वर आपल्या लोकांचा त्याग करत नाही. उलट त्याने मोठ्या प्रेमाने तुम्हाला आपले मानले आहे. तेव्हा त्याच्या मोठ्या नावाखातर तो तुम्हाला सोडून देणार नाही.
23 आणि माझे म्हणाल, तर मी तुमच्या वतीने नेहमीच प्रार्थना करत राहीन. तसे मी केले नाही तर परमेश्वराच्या दृष्टीने ते मोठे पाप ठरेल. चांगले आयुष्य जगायचा योग्य मार्ग मी तुम्हाला दाखवत राहीन.
24 पण तुम्ही परमेश्वराला मानले पाहिजे. मनापासून त्याचीच सेवा केली पाहिजे. त्याने तुमच्यासाठी जे चमत्कार केले ते आठवले पाहिजेत.
25 पण तुम्ही आडमुठेपणा आणि दुष्टपणा दाखवलात तर मात्र केरसुणीने केर झटकावा तसा, तुम्हाला तुमच्या राजासह परमेश्वर नष्ट करुन टाकील.”