लेवीय
धडा 16
1 अहरोनाचे दोन मुलगे परमेश्वरासमोर धूप दाखविण्यासाठी गेले असताना मरण पावले. त्यानंतर परमेश्वर मोशेशी बोलला.
2 तो म्हणाला, “तुझा भाऊ अहरोन ह्याला सांग की त्याने वाटेल त्यावेळी परमपवित्रस्थानात अंतरपटाच्या आत पवित्र कोशावर असलेल्या दयासनापुढे जाऊ नये; तेथे दयासनावरील ढगात मी दर्शन देत असतो; अहरोन जर तेथे जाईल तर तो मरेल!
3 “परमपवित्रस्थानात जाण्यापूर्वी त्याने पापार्पणसाठी एक गोऱ्हा व होमार्पणासाठी एक मेंढा आणावा.
4 त्याने पाण्याने स्नान करावे मग तागाचा पवित्र सदरा व तागाचे चोळणे आपल्या अंगात घालावे; तागाच्या कमरपट्ट्याने आपली कमर कसावी आणि तागाचा फेटा बांधावा; ही पवित्र वस्त्रे आहेत.
5 “अहरोनाने इस्राएलाच्या मंडळीकडून पापार्पणाकरिता दोन बकरे व होमार्पणाकरित एक मेंढा घ्यावा.
6 त्यांने पापार्पणाचा गोऱ्हा अर्पण करुन स्वत:साठी व आपल्या घराण्यासाठी प्रायश्चित करावे.
7 “मग त्याने ते दोन बकरे घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर उभे करावेत.
8 अहरोनाने त्या दोन बकऱ्यावर चिठ्ठ्या टाकाव्या; एक चिठ्ठी परमेश्वरासाठी व अजाजेलसाठी.
9 “परमेश्वरासाठी म्हणून, चिठ्ठी निघालेला बकरा अहरोनाने पापार्पण म्हणून अर्पण करावा;
10 पाप वाहून नेण्यासाठी अशी चिठ्ठी निघालेला बकरा परमेश्वरासमोर जिवंत उभा करावा व तो लोकांकरिता प्रायश्चित म्हणून पाप वाहून नेण्यासाठी रानात सोडून द्यावा.
11 “मग अहरोनाने पापार्पणाच्या गोऱ्ह्याचा वध करुन स्वत:साठी व स्वत:च्या घराण्यासाठी प्रायश्चित करावे.
12 नंतर त्याने परमेश्वरासमोर असलेल्या वेदीवरील निखाऱ्यांनी भरलेले धुपाटणे घ्यावे आणि कुटून बारीक केलेला ओंजळभर सुगंधी धूप अंतरपटामागील आतल्या खोलीत आणावा.
13 त्याने तो परमेश्वरासमोर अग्नीवर, इतका घालावा की त्याच्या धुराने आज्ञापटावरील दयासन व्यापून टाकावे म्हणजे मग तो मरणार नाही;
14 त्याचप्रमाणे त्याने गोऱ्ह्याचे काही रक्त घेऊन ते दयासनाच्या पूर्वबाजूला बोटाने शिंपडावे आणि काही रक्त दयासनासमोर बोटाने सात वेळा शिंपडावे.
15 “मग अहरोनाने लोकांसाठी आणलेला पापार्पणाचा बकरा वधावा; त्याचे रक्त अंतरपटाच्या आतल्या दालनात आणावे आणि त्याने गोऱ्ह्याच्या रक्ताचे जसे केले तसेच बकऱ्याच्या रक्ताचे करावे म्हणजे ते दयासनावर व दयासनासमोर शिंपडावे.
16 ह्या प्रकारे त्याने इस्राएल लोकांची अशुद्धता, त्यांचे अपराध व त्यांची पापे ह्या सर्वोबद्दल परमपवित्रस्थान पवित्र करावे; आणखी अशुद्ध लोकांच्या परिसरात मध्यभागी वसत असलेल्या दर्शनमंडपासाठीही त्याने असेच करावे.
17 अहरोन प्रायश्चित करण्यासाठी जेव्हा परमपवित्रस्थानात जाईल तेव्हापासून, तो स्वत:च्या घराण्यासाठी आणि इस्राएल लोकांसाठी प्रायश्चित करुन बाहेर येईपर्यंत दर्शनमंडपात कोणी नसावे व कोणी तेथे जाऊ नये.
18 मग त्याने तेथून निघून परमेश्वरसमोरील वेदीपाशी जावे व तिच्यासाठी प्रायश्चित करावे, त्याने गोऱ्ह्याचे काही रक्त व बकऱ्याचे काही रक्त घेऊन त्या वेदीच्या चारही बाजूच्या शिंगांना लावावे.
19 मग त्याने काही रक्त घेऊन आपल्या बोटाने ते सात वेळा तिच्यावर शिंपडावे; अशा प्रकारे त्याने इस्राएल लोकांच्या अशुद्धतेपासून ती शुद्ध व पवित्र करावी.
20 “तेव्हा परमपवित्रस्थान, दर्शनमंडप आणि वेदी ह्यांच्याकरिता प्रायश्चित करण्याचे संपविल्यावर त्याने जिवंत बकरा सादर करावा.
21 अहरोनाने आपले दोन्ही हात त्या जिवंत बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून इस्राएल लोकांची सर्व पापे व अपराध ह्यांचा अंगिकार करावा; व ती त्या बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून त्याला घेऊन जाण्यासाठी तयार असलेल्या माणसाच्या हाती रानात पाठवून द्यावे.
22 तेव्हा तो बकरा त्या लोकांच्या सर्व पापकर्माचा भार घेऊन निर्जन रानात वाहून नेईल; त्या माणसाने त्या बकऱ्याला रानात सोडून द्यावे.
23 “मग अहरोनाने दर्शनमंडपात येऊन परमपवित्र स्थानात जाण्यापूर्वी घातलेली तागाची वस्त्रे उतरुन तेथे ठेवावी.
24 मग त्याने एखाद्या पवित्र ठिकाणी पाण्याने आंघोळ करावी, आपली वस्त्रे घालावी व तेथून बाहेर येऊन स्वत:साठी होमार्पण करावे, लोकांसाठी होमार्पण करावे आणि स्वत:साठी व लोकांसाठी प्रायश्चित करावे.
25 मग त्याने पापार्पणाच्या चरबीच्या वेदीवर होम करावा.
26 “ज्या माणसाने पाप बाहून नेण्यासाठी निवडलेला बकरा रानात सोडून दिला त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने आंघोळ करावी व त्यानंतर छावणीत यावे.
27 “पापार्पणाच्या ज्या गोऱ्ह्याचे व बकऱ्याचे रक्त अहरोनाने प्रायश्चितासाठी पवित्रस्थानात नेले होते त्या दोन्ही पशूंना छावणीच्या बाहेर न्यावे आणि त्यांचे कातडे. मांस व शेण ही अग्नीत जाळून टाकावीत.
28 ती जाळून टाकणाऱ्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने आंघोळ करावी व मग छावणीत यावे.
29 “तुमच्यासाठी हा एक कायमचा विधीनियम असावा; सातव्या महिन्याच्या दशमीस तुम्ही अन्न न घेता,जिवास दंडन करावे, तुम्ही नम्र व्हावे; त्या दिवशी तुम्ही तसेच तुमच्या देशात राहणारे परके किंवा परदेशी ह्यापैकी कोणीही कसलेच काम करु नये;
30 कारण त्या दिवशी तुम्ही पापापासून शुद्ध व्हावे म्हणून याजक तुमच्यासाठी प्रायश्चित करील, मग परमेश्वरासमोर तुम्ही पापापासून शुद्ध ठराल.
31 तुमच्यासाठी हा फार महत्वाचा व पूर्ण विसाव्याचा शब्बाथ दिवस आहे; तुम्ही अन्न न घेता आपल्या जिवास दंडन करावे. तुम्ही नम्र व्हावे; हा कायमचा विधी नियम होय.
32 तेव्हा आपल्या पित्याच्या जागी मुख्य याजक म्हणून ज्याची निवड होऊन ज्याचा अभिषेक होईल त्याने तागाची पवित्र वस्त्रे घालून प्रायश्चित करावे.
33 त्याने परमपवित्रस्थान, दर्शनमंडप व वेदी तसेच याजकवर्ग आणि सर्व इस्राएल लोक ह्यांच्यासाठी प्रायश्चित करावे.
34 इस्राएल लोकांसाठी त्यांच्या पापाबद्दल वर्षातून एकदा प्रायश्चित करण्याकरिता हा कायमचा विधीनियम होय.”परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे त्यांनी ते सर्व केले.