निर्गम

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40

धडा 37

1 मग बसालेलाने बाभळीच्या लाकडाचा एक पवित्र कोश (पेटी) बनविला; तो पंचेचाळीस इंच लांब, सत्तावीस इंच रुंद व सत्तावीस इंच उंच होता.
2 त्याने तो आतून बाहेरून शुद्ध सोन्याने मढविला आणि त्याच्या सभोवती सोन्याचा काठ केला.
3 त्याने सोन्याच्या चार कड्या केल्या व त्या चारी कोपऱ्यांना लावल्या पेटी उचलून नेण्यासाठी त्यांचा उपयोग झाला प्रत्येक बाजूला दोन कड्या होत्या.
4 मग कोश वाहून नेण्याकरता त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे करुन ते शुद्ध सोन्याने मढविले.
5 ते दांडे कोशाच्या दोन्ही बाजूंच्या कड्यात घातले.
6 नंतर त्याने शुद्ध सोन्याचे दयासन बनविले; ते पंचेचाळीस इंच लांब व सत्तावीस इंच रुंद होते.
7 मग त्याने सोने घडवून दयासनाच्या दोन्ही टोकासाठी दोन करुब दूत बनविले.
8 त्याने एक करूब दूत एका टोकासाठी व दुसरा करूब दूत दुसऱ्या टोकासाठी बनवून असे जडविले की करुब दूत व दयासन हे सोन्याच्या एकाच अखंड तुकड्यापासून बनविलेले दिसू लागले
9 करुबांचे पंख वर आकाशाकडे पसरवलेले होते व त्या पंखांनी दयासन झाकले होते; करुब दूतांची तोंडे समोरासमोर असून त्यांची दृष्टी दयासनाकडे लागलेली होती.
10 त्याने बाभळीच्या लाकडाचे मेज बनविले, ते छत्तीस इंच लांब, अठरा इंच रुंद व सत्तावीस इंच उंच होते.
11 त्याने ते शुद्ध सोन्याने मढविले व त्याच्या सभोवती सोन्याचा काठ केला;
12 आणि त्याने त्याच्यासाठी तीन इंच रुंदीची एक पाळ केली व त्या पाळीस सभोवती सोन्याचा काठ केला.
13 त्याच्यासाठी सोन्याच्या चार गोल कड्या करुन त्याच्या पायावरच्या चार कोपऱ्यांना त्या लावल्या.
14 ह्या गोल कड्या त्या पाळीजवळ ठेवल्या, त्या मेज उचलावयाच्या दांड्यासाठी होत्या.
15 मग मेज उचलण्यासाठी त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे केले व ते सोन्याने मढविले;
16 नंतर त्याने मेजावरची पात्रे म्हणजे तबके, चमचे, धूपपात्रे व पेयार्पणे ओतण्यासाठी कटोरे व सुरया ही सर्व शुद्ध सोन्याची बनविली.
17 मग त्याने शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष बनविला; हा दीपवृक्ष त्याची बैठक, त्याचा दांडा, त्याच्या फुलासारख्या वाट्या, त्याच्या कव्व्या व पाकव्व्या ही सर्व एकाच अखंड तुकड्याची घडविली.
18 त्या दीपवृक्षाला एका बाजूला तीन व दुसऱ्या बाजूला तीन अशा सहा शाखा होत्या.
19 प्रत्येक शाखेला बदामाच्या फुलासारख्या तीन तीन वाट्या, कव्व्या व पाकव्व्यासहित होत्या.
20 दीपवृक्षाच्या दांड्याला आणखी चार, बदामाच्या फुलांसारखी फुले, कव्व्या पाकव्व्या होत्या.
21 ह्या दीपवृक्षावर दांड्याच्या एका बाजूला तीन व दुसऱ्या बाजूला तीन अशा सहा शाखा होत्या; जेथे शाखा मुख्य दांड्याला जोडलेली होती त्या प्रत्येक जोडाखाली कव्व्या व पाकव्व्यासहित एक फूल होते.
22 शाखा व फूले असलेला हा संपूर्ण दीपवृक्ष शुद्ध सोन्याच्या एकाच अखंड तुकड्यातून घडविलेला होता.
23 ह्या दीपावृक्षावर त्याने सात दिवे बनविले; मग त्याने दिवे मालवण्याचे चिमटे व त्यांच्या ताटल्या ही सर्व शुद्ध सोन्याची बनविली.
24 हा दीपवृक्ष व त्याच्या बरोबरची सर्व उपकरणे एक किक्कार म्हणजे सुमारे चौतीस किलोग्रम शुद्ध सोन्याची त्याने बनविली.
25 मग त्याने बाभळीच्या लाकडाची एक चौरस वेदी केली; ती अठरा इंच लांब, अठरा इंच रुंद व छत्तीस इंच उंच होती; वेदीवर प्रत्येक कोपऱ्याला एक याप्रमाणे चार शिंगे होती. ती वेदीला अशी जोडली होती की वेदी व शिंगे एका अखंड तुकड्याची बनविलेली दिसत होती.
26 त्याने त्या वेदीचा वरचा भाग, तिच्या चारही बाजू व तिची शिंगे सोन्याने मढविली व तिला सभोवती सोन्याचा काठ केला;
27 त्या काठाच्याखाली तिच्या दोन्ही बाजूस, त्याने वेदी वाहून नेण्यासाठी दांडे घालण्याकरता सोन्याच्या दोन दोन गोल कड्या केल्या.
28 त्याने बाभळीच्या लोकडाचे दांडे केले व ते सोन्याने मढविले.
29 नंतर त्याने अभिषेकाचे पवित्र तेल तसेच सुगंधी शुद्ध धूप सुंगधीलोक बनवितात त्या प्रमाणे बनविला.